Monday, September 24, 2007

चक दे इंडिया

भारताने ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटचा पहिला विश्वचषक जिंकला!

टीम इंडियामध्ये सगळी विशी-पंचविशीची पोरं. झिपरा धोनी कर्णधार, कोच गायब. शिवाय ऑस्ट्रेलिया होतीच, म्हणजे खरं तर उपविजेताच निवडायचा होता. अशात ही टीम काय दिवे लावणार असं वाटत असतानाच ही मंडळी चक्क जिंकली फायनलमध्ये. क्या बात है!

ट्वेंटी-ट्वेंटी मध्ये जिंकले आता कसोटीत किती चांगले खेळणार असे प्रश्न कृपया कोणी विचारु नका. बेसबॉल आणि टेनिसची तुलना करतं का कोणी कधी? ट्वेंटी-ट्वेंटी आणि कसोटी, दोन्हीचा पिंड वेगळा. मानसिकता वेगळी. पाच दिवस आणि पाच तास यात जेव्हढा फरक तेव्हढाच यातही.

बाकी फायनल मोठी झकास झाली. जिंकणार की नाही याची गोपनीयता शेवटच्या बॉलपर्यंत राखणं फक्त टीम इंडियालाच जमू शकतं. धोनी, युवराज, पठाण, शर्मा, सिंग सगळेच चमकले.

आणि ट्वेंटी-ट्वेंटी च्या मॅचेस म्हणजे तद्दन फिल्मी प्रकार होता. कमी षटकांबरोबरच मैदानातच कडेला बसलेल्या टीम्स, रॅंडम मेसेजेस दाखविणारा स्कोअरबोर्ड, फटाके इतकं सगळं कमी होतं की काय म्हणून प्रत्येक फ़ोर, सिक्सला नाचायला नाच्ये पण आणलेले. पण मजा आली.

मुख्य म्हणजे आपण पाकिस्तानला हरवून जिंकलो!

गणपती चालले गावाला...

आमच्याकडे गौरी-गणपती असतात.

म्हणजे कधी पाच दिवस तर कधी सहा दिवस. मला आठवतं, एकदा गणपती सात दिवस होते. सातही दिवस मी हर्षवायू झाल्यासारखा करत होतो. आणि परत सातव्या दिवशी ’दिवस किती भरभर संपतात’ही कुरकूर!

आमच्याकडचा गणपती हा परंपरेने चालत आलेला. त्यामुळे केवळ हौसेच्या, उत्साहाच्या भरातही आजी, आई सोवळं, काही नियम पाळायला लावायच्या. सोवळ्यात नसताना गणपतीच्या जवळजवळ जायचं नाही, नैवेद्य दाखवायच्या आधी मोदकांवर डोळा ठेवायचा नाही वगैरे वगैरे. या गोष्टी साध्याच असतात पण त्याचं स्तोम न माजवता त्यामागची भावना लक्षात घेतली की उत्सवाचा आनंद वाढतोच.

गणपती बसविण्यापासून ते विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या हातावर दही घालेपर्यंत, सगळं काही साग्रसंगीत होतं. आणि हो, हव्या असणाऱ्या, नको असणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या यादीचं पठण बाप्पासमोर अथर्वशीर्षाच्या आवर्तनांपेक्षा जास्त वेळा झालेलं असतंच. आजकाल बहुतेक सर्वच सर्व गणपती नवसाला पावणारे असतात, पण ह्या घरच्या गणपतीने मात्र नवस न करताच खूप काही भरभरुन दिलं आहे आतापर्यंत!

आमच्याकडचं डेकोरेशनही अगदी ठरलेलं. तेच पडदे, त्याच समया आणि त्याच सुरयांतून लावलेली फुलं. बालसुलभ उत्साहाच्या भरात फार पूर्वी कधीतरी एकदा मखर करायचा ’प्रयत्न’ केला होता. पण शेवटी जे काही तयार झाले होते ते पाहून परत त्याच्या वाटेला काही गेलो नाही. शिवाय पुढं ’थर्मोकोल एको फ़्रेंड्ली नसतो’ अशी सबळ कारणं मदतीला धावून आलीच!

ही सजावट साधीच असली तरीही एकदा का बाप्पा विराजमान झाले की सगळं काही बदलून जातं. जादूची कांडी फिरावी तसं. समयांचा मंद प्रकाश, धूपाचा दरवळणारा गंध, सुबक फुलं आणि सगळी सजावट फिकी पडावी अशी ती गणेशाची प्रसन्न तेजस्वी मूर्ती! क्षणभराचे हे दर्शनही माझी बॅटरी पुढच्या संपूर्ण वर्षासाठी चार्ज करतं.

आठवतंय तेव्हापासून सगळ्या उत्सवात ’गणेशोत्सव’ अति प्रिय. आणि याचं नेमकं कारण शब्दांत मांडणंही कठीण. आस्तिक-नास्तिक वादाची ओळख होण्याआधीच (म्हणजे थोडक्यात पुरेशी व्यावहारिक अक्कल येण्याआधी!) हा बाप्पा जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता. बुद्धीदेवता, सर्व शास्त्रे-विद्या-कलांचा हा स्वामी. शक्तीबरोबरच युक्तीचाही डोस देणारा. माझा एक शंभर टक्के नास्तिक मित्र आहे. तो वर्षातून फक्त गणपतीचे दीड दिवस नास्तिक नसतो. नेमकं कारण त्यालाही सांगता येत नाही.

घरी राहायला आलेले आवडते पाहुणे जायला निघाले की लहान मुलं रडतात. मात्र गणपती निघाले की सगळ्यांच्याच पोटात कालवाकालव होते. त्यावर उपाय एकच, सगळ्यांच्या सुरात आपणही सूर मिसळायचा,
"गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!"