Saturday, March 29, 2008

आणखी एक यादी

नविन वर्ष सुरु होताना नविन resolutions करणं मला फारसं मानवत नाही. पण गेल्या वर्षीचा डिसेंबर काही अशा घटनांचा होता की मी खरंच विचारात पडलो.

गेली काही वर्षे, आला दिवस साजरा करण्यातच मी इतका बिझी झालोय... म्हणजे जॉब एकदम मजेत चाललाय. (जेव्हा तो कंटाळवाणा होतोय असं वाटलं तेव्हा तो बदललाही होता.) काम interesting आहे. शिवाय ते भरपूरही आहे. सोमवार उजाडला की शुक्रवार कुठे संपतो ते कळतही नाही. रोज सकाळी उठायचं, जमेल तेव्हा जिमला हात लावून यायचा, ऑफिसला पळायचं. मग दिवसभर कधी मजेत तर कधी एकदम धावपळीत काम एक्के काम. बॅकग्राउंडला गाणी-गप्पा चालू असतात, पण ते तेव्हढ्यापुरतच. संध्याकाळी घरी आलं की थोडावेळ टीव्ही, जेवण, कधी काही वाचलं तर नाहीतर एकदम झोप.
हे काय life आहे?

म्हणजे करियरचे प्लानिंग वगैरे चालुच असतं. त्यापासून कधी सुटका नसतेच.

दोन वर्षांपूर्वी गिटार शिकायला सुरुवात केली होती. नक्की कधी बंद पडली, आठवतच नाहिये. शेवटचं पुस्तक बहुतेक The monk Who Sold his Ferrari. ते पण अर्ध्यातच सोडलं होतं. बरंच फिल्मी वाटलं होतं. पुस्तक हातात पडल्यावर ते अधाश्यासारखं संपवण्यातही एक मजाच असते. पण आपण काय करू शकतो यापेक्षा आणखी काय काय करता येईल ही गोष्ट मला जास्त exciting वाटते.

म्हणजे असं नाही की, एक ना धड भाराभर चिंध्या.

पण I like to push myself to limits.

आणि यासाठी मी काहीही करत नाहिये हे डिसेंबरमध्ये लक्षात आलं.

दिवस भुर्रकन उडून जातात आणि मग हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, असं स्वत:लाच torture करणं सुरु होतं. मग त्यापेक्षा आळस झटकून काहीतरी productive का करू नये असा किडा डोक्यात वळवळला आणि खरी मजा सुरु झाली. थोडक्यात काय काय करायचं आहे याची यादी बरीच मोठी आहे.

पण काही गोष्टी या वर्षात करायच्याच असं ठरवलंय. त्यातल्या काही गोष्टी अशा..

गिटारवरची धूळ पुन्हा एकदा झटकायची.

एखादी नविन भाषा शिकायची.

कुठेतरी फिरायला जायचं. नवा गाव किंवा नविन देश! (हे जरा जास्त होतंय आता)

टेक्नॉलॉजीमध्येच बरंच काही वाचायचंय.

नियमितपणे काहीतरी लिहायचं.

गाणंही शिकायचंय. (पण प्रत्येक वेळी मी माझाच आवाज ऐकून हा विचार सोडून देतो!)

मग रेडिओ जॉकी बनणं जरा फारच झालं, पण निदान नॅशनल जिऑग्राफिकच्या एखाद्या फिल्मसाठी व्हॉइस-ओव्हर वगैरे.
एखाद्या NGO साठी काम करायचं. जे वाटतं त्यात आपण प्रत्यक्ष जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या नुसत्या वाटण्याला काय अर्थ आहे? मग भले NGO नाही सापडला तरी एखादं पाऊल टाकायचं.

आणखी बरंच काही.. लिहिलंय त्यातल्या अर्ध्या गोष्टी जरी झाल्या तरी मग आणखी एक यादी बनवायला हरकत नाही.

Sunday, March 23, 2008

एका लग्नाची गोष्ट

धनेशचं, माझ्या मोठ्या भावाचं लग्न होऊन आता चार वर्षं झाली. म्हणजे ’लग्न’ या विषयावरून माझा छळ सुरु झाल्यालाही आता चार वर्षं झाली! मला अगदी स्पष्ट आठवतंय, मी रिसेप्शनच्या हॉलच्या गेटवर सर्वांना रिसिव्ह करायला उभा होतो. आई-बाबा गर्दीत कुठेतरी गायब झाले होते. धनेश स्टेजवर उभा होता. सगळे काका/मामा/आत्या/मावश्या मला सपोर्ट म्हणून माझ्याबरोबर उभे होते पण सव्वातीन मिनिटांच्या वर एका जागी टिकत नव्हते. ओळखीच्या झाडून सर्वांना बोलावल्याचा हा परिणाम.

मग माझा बाजीप्रभू देशपांडे! कारण लोकांना रिसिव्ह करणं सोपं होतं पण एका (भोचक) काका-काकूंनी माझं स्वागत स्वीकारत आजूबाजूच्या वीस जणांना ऐकू जाईल अशा आवाजात विचारलं, "आता धनेशचं झालं, तुझं केव्हा?" एक तर ओळखीच्या आणि बिना-ओळखीच्या लोकांचं बत्तिशी दाखवत स्वागत करा आणि वर हे असले प्रश्न.

शिवाय असले प्रश्न मोठे अडचणीत पाडणारे असतात. हो म्हणावं तरी झोल (’गुडघ्याला बाशिंग’ वाला प्रकार) आणि नाही म्हणावं तरी ’काय मूर्ख आहे हा, आता सगळ्यांची लग्नं होतातच, मग मुलं होतातच...’ असल्या नजरांना सामोरं जावं लागतं. तेव्हा मी नुसतं हसून वेळ मारून नेली होती. पण ’आता तुझं केव्हा?’ (लग्न हो!) हा प्रश्न मला चिकटला तो चिकटला. मग काही दिवस ’भारतात बालविवाह करायला बंदी आहे’ वगैरे उत्तरंही देऊन झाली. पण आता बहुतेक डोक्यावर अक्षता पडेपर्यंत त्यापासून सुटका नाही.

मी काही लग्न करण्याच्या विरोधात नाही, पण काहीवेळा इतरच माझ्या लग्नाची घाई झाल्यासारखे वागतात. सोनालीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा जमलेल्या मित्रमंडळींपैकी एखाद-दुसरा (म्हणजे मीसुद्धा त्यातच!) सन्माननीय अपवाद वगळता बाकी सगळे मित्र सपत्निक किंवा मैत्रिणी सपती आल्या होत्या. मग चेतन म्हणाला पण, ’ आम्ही सगळे जोडीने आलोय आणि तू एकटा. किती अवघडल्यासारखं वाटतय ना?’ आता घ्या.. अवघडल्यासारखं वाटायला पाहिजे मला आणि मी मात्र मजेत म्हणून हे लोकं मलाच शिव्या घालताहेत. इतने साल की गेहरी (वगैरे) दोस्ती आणि लग्न होताच सगळ्यांची पार्टी चेंज!

माझ्या मावशीने आणि तिच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीने (ही म्हणजे एकदम अधिकार वगैरे गाजवणारी माझी ताई) तर मला स्वतंत्रपणे गंभीर धमकी दिली आहे. गंमतीची गोष्ट अशी की दोन्ही धमक्यांमधील Terms and Conditions सारख्याच आहेत आणि त्या म्हणजे, माझं लग्न ठरल्याचं मी आधी तिलाच सांगायचं (Applicable to both!) आणि माझ्या होणाऱ्या बायकोला तीच आधी भेटणार! (Again applicable to both!!) म्हणजे मधल्या मधे माझाच बळी जाणार.

सगळ्यात कहर झाला गेल्या आठवड्यात. माझा एक मित्र आहे. आता त्याला आपण ’क्ष’ म्हणू. तर या ’क्ष’चं लग्न होऊन झाले असतील सहा महिने. लग्न झाल्यापासून अगदी सभ्यतेचा पुतळाच झालाय जणू. अधून-मधून आम्ही त्याला त्याच्या ’मर्द बन’च्या दिवसांची आठवण करून देतो पण शेवटी होम मिनिस्ट्रीपुढे काय करणार बिचारा. तर त्याने मला फोन केला. बऱ्याच दिवसांनी बोलणं होत असल्याने रिवाजानुसार मी ’भ’कारांत विशेषणांनी त्याची विचारपूस केली. नेहमीचे रीति-रिवाज उरकल्यावर म्हणाला, ’बायको मागे लागली आहे, की तुझा मित्र लग्नाचं पाहतो आहे का ते विचार म्हणून.’ पुन्हा एकदा विशेष विशेषणांची उकळी आली, त्याला म्हणालो, ’गधड्या, आपल्यात तुझं लग्न आधी झालं तर बिनलग्नाचे इतर चारजण आत्महत्या करणार होते. आता तुझे दोनाचे चार झाले म्हणून हा तोरा का?’

त्यावर म्हणाला, ’अरे बाबा, ’क्षा(म्हणजे त्याची बायको)’ची एक खास मैत्रीणपण लग्नाची आहे म्हणून ही चौकशी..’ तरीच म्हणलं, हा एव्हढा समाजोपयोगी कामं कधीपासून करायला लागला.

बरं ही चौकशी तेव्हढ्यातच थांबेल असं वाटलं होतं. पण दोन दिवसांनी ’क्षा’चा फोन! पुढे काय आणि कसं करायचं म्हणून विचारायला. तीपण म्हणालीच की तुझा मित्र किती कामाचा आहे ते माहित आहे म्हणून मीच फोन केला. आता ’क्ष’ला असले अनेक गुन्हे मी माफ केले आहेत. पण मुद्दा तो नाही. लग्न झालेल्यांना बिनलग्नाच्यांचं सुख बघवत नाही का माहित नाही. पण मुद्दा तोही नाही. अशावेळी नक्की काय करावं याचं अधिकृत प्रशिक्षण मी घेतलेलं नाही. कुछ करना पडेगा..

आजूबाजूच्या वातावरणात हे अचानक झालेले बदल दखलपात्र आहेत हे नक्की. तेव्हा आता आमची विकेटही लवकर पडणार काय असं वाटायची वेळ आली आहे. Howz that?

Sunday, March 16, 2008

बासरी आणि संतूर

आज सकाळी दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसलो होतो. आजकाल काहीसुद्धा न करता डोळे मिटून शांत बसणं हे केवळ झोप या प्रकारातच मोडतं. पण रविवारची सकाळ आणि त्यामुळे वाटेल तेव्हा बिछान्याचा निरोप घेण्याची मुभा असल्याने, सहजी लोळताना कालची संध्याकाळ आठवली.

दहा-बारा दिवसांपूर्वी ’सिलसिला - सुरों का’ ही पेपरमध्ये आलेली जाहिरात पाहूनच ’हा कार्यक्रम चुकवायचा नाही!’ असं ठरवलं होतं. हरीप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांच्या बासरी आणि संतूरच्या जुगलबंदीचा कार्यक्रम. आजवर हरीप्रसादांची बासरी आणि शिवकुमरांचा संतूर पुष्कळ वेळा ऐकला होता. अगदी त्यांची जुगलबंदीसुद्धा. पण केवळ कॅसेट, सीडी किंवा टीव्हीवर. प्रत्यक्षात कधीच नाही.

खरंतर किती वेगळ्या जातीची ही वाद्यं. संतूर म्हणजे मधुर सुरांचा दाणा न दाणा स्पष्ट ऐकू येणार आणि किंचित घोगऱ्या आवाजाची बासरी काळजाचा ठाव घेणार. अर्थात सूर पेलणारा वादकही तेव्हढ्याच तयारीचा हवा. पण शिव-हरी ही जोडी असताना कार्यक्रम एकदम ’वसूल’ होणार याचीही खात्री होतीच. कार्यक्रमही तसा बऱ्यापैकी वेळेत सुरु झाला. प्रथम चरण केवळ संतूरचा! शिवकुमार शर्मांचे व्यक्तिमत्त्वच इतके प्रसन्न आहे की मांडीवर संतूर तोलत ऐटीत बसलेली त्यांची मूर्ती पाहूनच आपण खुश! मग अगदी शालीन, नम्र आवाजात त्यांची प्रस्तावना. कोणता राग सादर करणार आहोत, त्याची उलगड कशी होईल, पखवाजाची साथ नक्की कुठून सुरु होईल याची माहिती. शिवाय आम्ही संथ लयीत सुरुवात करतो आणि काय करता येईल याचा अंदाज बांधत लय, द्रुत लय पकडत नजाकती पेश करतो हेसुद्धा सांगितले. (ही सूचना विशेषत:, कार्यक्रम मुंबईत होता म्हणून असावी!)

आणि मग सुरु झाली संतूरच्या सुरांची कशिदाकारी. काश्मिरच्या खोऱ्यातल्या या वाद्याच्या सुरावटी अगदी तलम रेशमी वस्त्रावर त्याहून अधिक तलम कशिदाकारी उमटत जावी तशाच उलगडत गेल्या. पखवाजाची साथ भवानीशंकरांची. संतूरच्या सूरांनी टाळ्या घेतल्या नसत्या तरच नवल.

लाजवाब कारागिरी!

मग द्वितीय चरण बासरीचा. एकदम टिपिकल भैया पिवळ्या रंगाचा झब्बा घातलेले हरिप्रसाद चौरसिया पाहून मनात पहिली प्रतिक्रिया उमटते ती म्हणजे, ’किती साधा आहे हा माणूस!’. आणि सुरुवातही तशीच. काहीही निवेदन नाही, काही नाही. निवेदिकेनंच ते कोणता राग सादर करणार आहेत याची माहिती दिलेली. विशेष म्हणजे, हरिप्रसादांची कला ही त्यांनी स्वकर्त्ऱुत्त्वावर विकसित केलेली. बासरी ही काही त्यांची पिढीजात संपत्ती नव्हे. मला हे माहित नव्हतं. सुरांचा उत्तुंग इमला त्यांनी स्वबळावर बांधला तर. अशी लोकं मला जरा जास्तच इंप्रेस करतात!

काहीही न बोलता त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीच्या काही घोगऱ्या सुरांनंतर त्यांनी चक्क एक कॅनव्हास रंगवायला घेतला. दऱ्या-खोरं, नजर पोहोचेल तिथवर दिसणारी हिरवीकंच कुरणं, विस्तीर्ण जलाशय आणि बहारदार अरण्यं. सगळं काही स्पष्ट उभं झालं त्या सुरांतून. तबल्याची साथ विजय घाटे यांची. एकदम flawless performance. या दोघांनी एक छोटीशी जुगलबंदी रंगवली ती तर त्या कॅनव्हासवर सगळ्या रंगांची अचूक उधळण करून गेली! इथवरचा कार्यक्रमच पूर्ण वसूल होता. इथून पुढे फक्त बोनस.

अंतिम चरण जुगलबंदीचा. कार्यक्रम बासरी आणि संतूरचा असला तरी पखवाज आणि तबला वाजवणारेही दिग्गजच. थोडक्यात काय तर चौघेही ’पंडित’ बिरुदावली मिरवणारे! शिवकुमारांनी, त्यांच्या हरिप्रसादांबरोबरच्या असणाऱ्या, जुगलबंदी किंवा स्वरांपलीकडे गेलेल्या मैत्रीविषयी सांगत सुरुवात केली. त्यावर हरिप्रसाद म्हणाले, ’अशीच मैत्री तबला आणि पखवाज यातही आज दिसावी अशी मी आशा करतो कारण वाजवणारे दोघेही महारथी आहेत, त्यामुळे कोणी कोणाचे ऐकावे असा प्रश्न न येवो!’ कमी बोलणारी माणसं शालजोडीतला हाणतात ती अशी!

आतापर्यंत केवळ तलम कशिदाकारी असणारं रेशमी वस्त्र, बेहद लाजवाब निसर्गसौंदर्यच पाहिलं होतं. पण जुगलबंदी सुरु झाली आणि जे काही अनुभवलं ते अवर्णनीय होतं. थोडक्यातच सांगायचं झालं तर ते तलम कशिदाकारीचं वस्त्र ल्यायलेली कोणी सुंदरा त्या अफाट अरण्यात त्या जलाशयाच्या काठानं बेभान धावत होती!

Simply marvelous...