Saturday, November 22, 2008

इंडिया शायनिंग

काल ऑफिसला जाताना गाडी सिग्नलवर थांबली होती. हा सिग्नल भीक मागणारे भिकारी, काहीतरी विकायचा प्रयत्न करणारे भिकारी, तृतीयपंथी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि हो, वाहनांसाठी हिरवा सिग्नल चालू असताना रस्ता क्रॉस करायसाठी धावणाऱ्या माणसांसाठीही अर्थातच!

तर गाडी थांबली आणि पुढचे वीस सेकंद काय कारायचं म्हणून इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. शेजारीच एक बाईक येऊन थांबली. चालवणारा आपला देसी dude च होता. भर उन्हात काळ्या गॉगलबरोबरच लेदर जॅकेटही घातलं होतं त्यानं. असले प्रकार सहसा हास्यास्पदच असतात.

पण त्याच्या इतक्या सजण्या-सवरण्याचं कारणही त्याच्या मागेच बसलं होतं. कारण एक सुंदर गौरांगना होती. फॉरेन मेड सुंदरी! मी मनात म्हणलं, नशिब आहे साल्याचं, तेव्हा घालेना का लेदर जॅकेट भर उन्हात..

बाईक थांबली म्हणून लगेच त्या दोघांचं कूजन सुरु झालं आणि मधुर प्रसंगात एका तृतीयपंथीयाने एन्ट्री घेतली, अगदी कमला का हमला स्टाईलमध्ये!

पहिली जोरदार टाळी वाजली आणि आजूबाजूच्या किमान पन्नासजणांना ऐकू जाईल अशा आवाजात कमलानं तिला (किंवा त्याला) पैसे दिल्यास देसी dude आणि फिरंगी ललना यांचा संसार कसा सुखाचा होईल, त्यांची मुलं कशी सुखात वाढतील याचा पाढा वाचायला सुरुवात केली. आपला dude कमलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असतानाच विदेशी सुंदरीच्या चेहऱ्यावरील भाव आश्चर्यमिश्रित धक्क्यापासून कुतूहलमिश्रित ’आता करु तरी काय’ पर्यंत तीन सेकंदात बदलले.

पण तिनं वेळ न दवडता आपल्या छोट्याश्या बॅगमधून अगदी छोटासा कॅमेरा काढला आणि पटकन कमलाचे दोन-चार फोटो काढले. कमला जातिवंत अदाकारा त्यामुळे शेवटच्या फोटोला तिनं (म्हणजेच त्यानं) ठेवणीतलं हास्य टाळी मारतानाच्या पोजबरोबर दिलं. विदेशी ललना एकदम खुष!

सिग्नल सुटायची वेळ झाली होती त्यामुळं प्रकरण इथेच संपेल असं वाटतानाच कमलानं पदराखालून मोबाईल काढला आणि मोबाईलवरच्या कॅमेऱ्यावर त्या दोघांचे दोन-तीन फोटो काढले!

आपला dude एकदम चूप. आणि विदेशी पाहुणी आत्ता नक्की काय झालं याचा अदमास लावण्यात गुंतली. एवढ्यात सिग्नल सुटला आणि कमला मोबाईलवर बोलत क्रॉस करून निघून गेली.

बाईक वेगात पुढे जात होती पण विदेशी सुंदरी काही मागे वळून पहायची थांबत नव्हती.

India is shining boss!

Sunday, November 16, 2008

तीन दिवसात दोन पुस्तकं

गेल्या तीन दिवसात मी दोन पुस्तकं वाचून काढली.

गेले काही दिवस (किंवा महिने.. वर्षं म्हणलं तरी चालेल) वाचायला वेळच मिळत नव्हता. वाचायसाठी वेळ न मिळणं हे मला खूप अपमानास्पद वाटतं. वाचायसाठी का वेळ काढावा लागतो? पण रोजचं वर्तमानपत्र वाचणं वेगळं आणि एखाद्या पुस्तकात डुंबणं वेगळं.

खूप दिवस नाही काही वाचलं की आजारी असल्यासारखं वाटायला लागतं. मी काही खूप मोठा रसिक किंवा चोखंदळ वाचक आहे का ते माहित नाही पण वाचकाला काही जात नसते. आणि त्यातही मी हातात पडेल ते वाचतो. केवळ थोर साहित्यिकांचेच सारस्वत लागतं किंवा नवसाहित्याशिवाय तरणोपाय नाही असल्या भानगडी मला सुचत नाहीत. प्रवासात वाचायला अजिबात वेळ मिळणार नाही ही माहित असूनही मी एखादं पुस्तक बरोबर ठेवतो, मग जरा बरं वाटतं.

तर तीन दिवसात दोन पुस्तकं.

दिवाळीमुळे तीन दिवस सलग सुटी होती. त्याआधी संध्याकाळी घरी येताना त्या स्पेशल रद्दीवाल्याच्या दुकानावरून आले. ह्याच्याकडे सगळी पुस्तकं स्वस्तात मिळतात. पायरेटेड प्रिंट्स असोत किंवा कोरी ओरिजिनल, ह्याच्याकडचा रेट सगळ्यात कमी. शिवाय हा वाचून झालेलं पुस्तक पुन्हा विकत घेतो, अर्थातच पैसे आणखी थोडे कमी करून. म्हणून मग One Night at Call Center आणि Five Point Someone उचललं.

ह्या चेतन भगतचा एव्हढा hype झाला आहे की पुस्तक तितकं चांगलं असेल का हा प्रश्ण मनात होताच. घरी आल्यावर हातात पहिल्यांदा Five Point Someone आलं म्हणून तेच वाचायला सुरुवात केली.

हरी, रायन आणि आलोक या तिघांची ही गोष्ट. शिवाय अस्सल उपपात्रंही बरीच. गोष्टीचा plot झकास आहे मात्र चेतन भगतची गोष्ट सांगण्याची पद्धत काही जेव्हढी खरी वाटते तेव्हढीच ती काही वेळेस तद्दन खोटी वाटते, ओढून-ताणून मांड मांडल्यासारखी. म्हणूनच ती अगदी जवळची वाटता वाटता अनोळखी वाटतात. हरी, ज्याच्या तोंडून सगळी कथा सांगितली जाते, तोच इतकं हातचं राखून बोलतो की गोष्टीचा ३६० degree view हवा असेल तर, Five Point Someone, by Ryan आणि Five Point Someone, by Alok वाचावं लागेल. पात्रांची authenticity जर जपता आली नाही तर गोष्टीचं भजं व्हायला कितीसा वेळ लागणार? पुस्तक मस्त आहे पण great वगैरे अजिबात नाही.

One Night at Call Center ही तर एक fantasy. कॉल सेंटरचा डोलारा चेतननं नक्कीच छान उभा केलाय पण त्यातला नायक श्याम - जो ही गोष्ट सांगतो तो अगदी सामान्य असतो. पण नायकाचं सामान्यत्व उभं करताना लेखकाला असामान्य कामगिरी जमली तरच पुस्तक great होतं हे कोणीतरी भगतसाहेबांना सांगायला हवं. त्याने प्रयत्न मनापासून केलेला आहे पण तो प्रयत्न आहे हेसुद्धा जाणवतं. आणि म्हणूनच मला हेही पुस्तक काही खल्लास वाटलं नाही.

पण काही प्रसंग, काही जागा टाळ्या नक्कीच घेतात. अस्सल माणसांची अस्सल दुनिया मोठी अजब असते महाराजा, मग त्यातली साम्यस्थळं दिसली की तोंडातून शिटी येणारच ना!

चेतनचं Three mistakes of my life नाही वाचलं अजून. पण तेही जर याच वळणावर जाणारं असेल तर मात्र त्याला ’व्यक्ती आणि वल्ली’ भेट देईन म्हणतो, home work करायला - माणसं कशी चितारली जातात ह्याचं detailing समजवायला.

दिवाळीचं celebration करून तोंडी लावायला पुस्तकं छानच होती. मुख्य म्हणजे एकेका दिवसात संपणारी. त्यामुळे अख्खं पुस्तक एका दिवसात संपवलं हे समाधान. आता बिल गेट्सचं ’The Road Ahead’ आणून ठेवलंय. But any suggestions?

Saturday, November 15, 2008

बचेंगे तो Monday भी मिलेंगे

"बचेंगे तो और भी लढेंगे" असं कोणीतरी ऐतिहासिक पुरुष म्हणून गेला होता.

किंवा कोणी पुरुषीही म्हणाली असेल. आता स्त्रीला पुरुषी का म्हणत नाहीत हा वादाचा मुद्दा आहे आणि मी वादात पडत नाही. तसं लहानपणी मला, विदुषी हे विदुषकाचे स्त्रीलिंगी रूप आहे असं वाटायचं. असो..

तर मुद्द्याची गोष्ट म्हणजे, बचेंगे तो और भी लढेंगे हे आत्ताच आठवायचं कारण म्हणजे सध्याची जागतिक परिस्थिती!

लेहमन बंधूंनी स्वत:चीच अब्रू स्वत:च्याच हाताने वेशीवर टांगली आणि बॉलीवूडमध्ये Item Songs करायला so called मादक ललनांची रांग लागते तशी मोठमोठ्या अर्थसंस्थांची स्पर्धा सुरु आहे. शेयर बाजाराचा विषय काढला की तर माझ्या काळजात एक स्पष्ट कळ उमटते. उत्साहाच्या भरात लाखाचे बारा हजार नाहीत (माझ्याकडे कुठले लाख रुपये असणार शेयर बाजारात फुकायला) पण बारा हजाराचे बाराशे नक्कीच झाले आहेत. म्हणजे नुकसान जरा जास्तच.

विप्रो, इन्फोसिस वगैरे मंडळींनी निरोपाचे नारळ देताना नारळांची खरेदी घाऊकरित्या केल्याचं ऐकलं आणि आमच्या गोटातही थोडा काळजीचा सूर उमटला. जेमतेम तीनशे साडेतीनशे लोकं असताना आपली कंपनी नारळ खरेदीच्या भानगडीत पडणार नाही असं स्पष्ट मत नीलनं मांडलं होतं. काढायचंच असेल तर त्या निकम्म्या परप्रांतीयाला का काढू नये असंही एका मराठी बांधवाचं मत पडलं. विशालचा मात्र जो तो आपल्या कर्माने येतो आणि जातो यावर गाढ विश्वास! त्याने असं म्हणल्यावर सगळ्यांचीच हवा टाईट. कारण नेमकं कोणतं कर्म यावेळी आडवं येईल याची गॅरंटी नाही.

दबक्या आवाजातल्या चर्चांना तोंड फुटलंय आणि गॉसिप कॉलम भरून वाहतोय. त्यातच एकाला नारळ मिळाल्याची पक्की खबर आहे. उडत्य्या पाखरानं आणखीही काही नावं कानात सांगितली आहेत. तेव्हा शुक्रवारी निरोप घेताना हेच म्हणणं क्रमप्राप्त आहे,

बचेंगे तो Monday भी मिलेंगे!