Saturday, September 19, 2009

भिकेचे डोहाळे २

मागच्या पोस्ट्मध्ये जो उल्लेख MUST होता पण मी तो करायचं विसरलो म्हणून हे Addendum.
एका मित्राने एक फक्कड जोक ऐकवला होता.

एयर इंडियाने म्हणे जाहिरात केली की आमच्याबरोबर प्रवास करा म्हणजे तुम्हाला आईच्या मायेची ऊब मिळेल.

प्रवासी म्हणाले की झाडून सगळ्या हवाईसुंदऱ्या आमच्या आईच्या वयाच्या असतात आणि AC बहुतेकदा चालत नसल्याने ऊबही मिळतेच!

भिकेचे डोहाळे!

सरकारच्या हवाई वाहतूक खात्याने फतवा काढलाय, म्हणे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी एयर इंडियानेच प्रवास करायचा. कारण काय तर याप्रकारे एयर इंडियास वार्षिक दोन हजार कोटींचा महसूल मिळेल आणि दिवाळखोरीच्या दारात उभी असलेली ही सरकारी कंपनी तगेल.

भिकेचे डोहाळे यालाच म्हणतात. एके काळी ही एकच कंपनी भारतीयांना विमान प्रवास घडवायची. गेल्या दहाएक वर्षात चित्र पूर्णपणे बदललं. पण तरीही एयर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मुजोरी काही कमी झाली नाही. Ground staff तरिही ठीक आहे पण cabin crew ची निवड मात्र नसानसात भिनलेल्या उर्मटपणाची खात्री पटल्याखेरीज करत नसावेत.

अपवाद अर्थातच सगळीकडे असतात. एकदा एका हवाई सुंदरीने माझं हसून स्वागत केल्याचं मला नक्की आठवतं. शिवाय ती सर्व्ह करत असलेली कॉफी गार आहे असं सांगितल्यावर चक्क तिनं ती कॉफी गरम करुन वाढली होती! आणि एकदा एका हवाईसुंदराने In-flight entertainment system काम करत नाही म्हणल्यावर आधी ती थोबडावली आणि तरिही ती काम करीत नाही म्हणल्यावर मागच्या सीटवरची सिस्टिम काम करत आहे हे तपासून मग मला तिथे बसण्याची नम्रपणे विनंती केली. माझ्या हातातला मोबाइल फोन पाहून तो अमक्या एका मॉडेलपेक्षा किती चांगला आहे अशासारखे काही smart प्रश्नही विचारले होते.

अर्थातच हे दोघेही साठीच्या अर्ध्या वयातले दिसत होते. नाहीतर सहसा पन्नाशीच्या आतला चेहरा cabin crew मध्ये कुठनं दिसणार? एयर इंडियाचं दार ओलांडून आत गेलं की काहीवेळा अक्षरश: यमपुरीत entry केल्यासारखं वाटतं. Make-upच्या नावाखाली रंगांचे थर तोंडावर थापलेल्या त्या व्रूद्धा आणि पांढऱ्याशुभ्र केसातून टक्कल दाखवणारे आणि पोट सुटलेले ते जरठ यांचे खडूस चेहरे पाहिले की थोडी भीतीच वाटते.

एकदा take-offच्या आधी मी खूप तहान लागली म्हणून पाणी मागितलं होतं. त्या साठीच्या सुंदरीने ज्या प्रकारे ते आणून माझ्यापुढे आदळलं तेव्हा तिच्या मनातले ’गिळ मेल्या एकदाचं’ हे शब्द मला स्पष्टपणे ऐकू आले होते!

तर असल्या ह्या कंपनीला जीवदान देण्याचा प्रयत्न चाललाय त्याला माझा विरोध नाही पण अनिकेत जे काही मला सांगत होता त्यात logic शोधायचा मी बराच वेळ प्रयत्न केला. तो पुढच्या महिन्यात तेहरानला एका conferenceसाठी जाणार आहे. सरकारी तिकिटाने जायचे असल्याने एयर इंडियाने जाणे ओघाने आलेच. आता गंमत अशी की मुंबई - तेहरान असं इराण एयरचं return तिकिट १९ हजारात मिळतं. एयर इंडियाची तेहरानला direct flight नाही म्हणून मग तो आता मुंबई - दुबई एयर इंडियाने आणि दुबई - तेहरान एमिरेट्स, जे एयर इंडियाचे सहकारी flight आहे त्याने जायचा आहे. Return तिकिटाचा खर्च ३८ हजार फक्त! आणि त्याच्या ऑफिसमधून असे एकूण सहाजण जाणार आहेत.

आता logically विचार केला तर सरकारी म्हणजे पर्यायाने जनतेच्या पाठबळावर चालणारी एखादी कंपनी वाचवताना cost-cutting किती केले? Efficiency किती वाढवली? Quality of service किती सुधारली? ह्या गोष्टींचा विचार करायची गरज आहे असंच मला वाटत होतं!