Sunday, November 15, 2009

माननीय राजसाहेब

माननीय राजसाहेब,

खरं सांगायचं तर आमची पिढी माननीय आणि साहेब ह्या दोन्ही प्रकारांना जुमानत नाही. पण निदान जुजबी ओळख होईपर्यंत जुन्या जोखडांचं वेड पांघरायला आमची ना नाही.

सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. तुमच्या मनसेचे तेरा उमेदवार विधानसभेवर निवडून आले. अभिनंदन मात्र तुमचंच कारण एक राजकीय पक्ष म्हणून मनसे अभिनंदनास पात्र आहे किंवा नाही हे तुमच्या तेरा आमदारांची कारकीर्दच ठरवेल.

आम्ही तुम्हाला मनसे जन्माला आल्यापासून नव्हे तर शिवसेनेचा भावी firebrand म्हणून तुमची गणना होत होती तेव्हापासून पाहतोय. कोणत्याही राजकारण्याच्या मागे गतस्मृतींची भुतावळ ही असायचीच. तुम्हीही त्याला अपवाद कसे असणार?

मात्र मुद्दा तो नाही. आमची म्हणजे तरुण पिढी राजकारण, लोकशाही, देशकार्य या गोष्टींची allergy बाळगून आहे असे नाही तर जिद्दीनं अवघं आकाश कवेत घेणारी आहे. पण त्याचबरोबर बदल या जगण्यास अत्यावश्यक अशा घटकास आम्हास अपेक्षित अशा वेगाने प्रतिसाद न मिळाल्यानं काहीशी स्वार्थी झाली आहे. स्वत:च्या प्रगतीआड येणारी बहुतेक प्रत्येक गोष्ट नजरेआड करुन आजचा किंवा फारतर उद्याचा पण स्वत:चाच विचार करायची आम्ही सवय लावून घेतली आहे.

मराठीच्या नावानं चांगभलं करून ऐन निवडणूकीच्या मोक्यावर आपला आवाज सर्वांना व्यवस्थित ऐकू गेला. पण जरठ दिग्गजांच्या मांदियाळीत जे तरुणाईचे अंकुर गेल्या दहा वर्षांत देशभरात उगवले त्यात आम्ही तुम्हाला जरूर शोधतो. त्यामुळेच मराठीचा नारा ही निवडणूकीच्या काळाची गरज होती पण आजच्या महाराष्ट्राची गरज त्याहून थोडी अधिक आहे आणि हे आपण जाणता असा विश्वास आम्ही ठेवायचा का तुमच्यावर?

मुंबई, पुणं, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर वगळलं तरी केव्हढातरी महाराष्ट्र शिल्लक राहतो. आपल्या तेरा आमदारांना हा महाराष्ट्र माहित आहे काय? नंदूरबार, बुलढाणा, रावेर, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, गोंदिया इथेही मराठी लोकंच राहतात आणि आणि प्रगतीची आस त्यांनाही असू शकते हे पक्षाच्या नावातच महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची स्वप्नं दाखविणाऱ्या मंडळींनी विसरू नये. आता गोंदियातल्या विडीचा धूर भरल्याशिवाय भारतात एकही विमान उडत नाही. त्यामुळे नाव जरी मागासलेलं वाटलं तरी प्रगतीची वाट कुठल्याही आडवळणापासून सुरु होते हे विसरून नाही चालत.

आणि आहे काय हो या मुंबईत जे करायचं शिल्लक आहे अजून? महाराष्ट्र नव्यानेच निर्मायचा असेल तर मुंबईलाही हेवा वाटेल अशी दोन-तीन शहरं विकसित करून दाखवा ना. मला माहित आहे की हे वाक्य लिहायला जेव्हढं सोपं होतं तेव्हढं कृतीत आणायला नाही. पण सुरुवात कोणीतरी करायलाच हवी, नाही का? आणि हो मुंबईला हेवा वाटेल अशी ठिकाणं तयार करायची म्हणजे गर्दी, traffic, प्रदूषण, महागाई एव्हढेच नव्हे. चार मेगामॉल्स उघडले म्हणून कुठलंही शहर आंतरराष्ट्रीय नकाशात नावारुपाला आल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. त्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागते. आणि त्यासाठी आधी मुंबई, पुण्यापलिकडे नजर जावी लागते. आपलीही ती जाईलच अशी अपेक्षा आम्ही ठेवायची का?

ज्या शिवरायांनी सगळ्या जगाला उत्तम राजशासनाचे धडे दिले त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्या जर बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आतापर्यंत बहुतेकांनी ज्या भीषण समस्यांचा महाराष्ट्राला भेडसावणारे प्रश्न म्हणूनही स्वीकार केला नाही अशा समस्यांची कदाचित उत्तरेही सापडतील. शेतकरी आत्महत्या करतात हे खरं आहे, पण ते आत्महत्या का करतात हे कोणाला माहित आहे का? आणि जर माहित असेलच तर केवळ त्या थांबविण्याचा प्रयत्न न करता त्यांची प्रगती कशी होईल याचा विचार करायला आजवर कोणाला सवडच मिळाली नाही. तुम्ही काढाल का ही सवड? महाराष्ट्रातही नक्षलवादी आहेत याची चिंता आम्ही रोज लोकलचे धक्के खात ऑफिस वेळेवर गाठायच्या घाईत कधी करायची? पण मुळात एका सामान्य माणसाचा नक्षलवादी होण्यापर्यंतचा प्रवास फळास जाईपर्यंत शासनकर्ते कोणता मलिदा फस्त करण्यात मग्न होते हे त्यांनाच माहित पण कधीतरी तुम्हीही अशा गोष्टी हाताळण्यासाठी पावले उचललीत तर मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात यादगार ठराल. अशा कामांना glamour नसतंच पण ती केल्याने लोकांचा विश्वास बसतो. निवडणूकांच्या काळात तिकिटाच्या बारिवर हाच विश्वास धमाल उडवून देऊ शकतो.

पुन्हा एकदा मराठी, मराठी माणसांच्या मुद्द्याकडे वळू. तुम्ही एक प्रतिथयश businessman आहात. समजा तुम्हाला एखादा महत्त्वाचा project पूर्णत्त्वास नेऊ शकेल अशा माणसाची गरज असेल तेव्हा तुम्ही non-qualified पण केवळ मराठी म्हणून कोणाची निवड कराल काय? कोणी प्रांतीय मक्तेदारी, शिफारसी चालवू पाहत असेल तर त्यास विरोध जरूर करावा पण प्रत्येक वेळीच आंदोलन करतो म्हणलं तर त्याची किंमत काय हो राहिली? ज्या नोकऱ्यांसाठी आंदोलन करायचं त्यासाठी चर्चेत असणारे मराठी तरुण त्या नोकऱ्यांसाठी लायक आहेत का याचा परखडपणे कोणी विचार करतं का? आणि समजा नसतील तर त्यांच्या उन्नतीसाठी कोणी प्रयत्न करतं का? मुंबईत येणाऱ्या so-called बाहेरच्या लोंढ्यात महाराष्ट्रातील माणसेच जास्त असतात. त्यांनाही परत पाठवायचं का मग? पण मुळात मुंबईत यावं लागतं याचाच अर्थ त्यांना पुरेशा संधी त्यांच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. ते कधी व्हायचं आणि कोणी करायचं?

राजसाहेब, गेल्या बऱ्याच वर्षांत कोणा राजकारण्याला जे जमलं नाही ते तुम्ही करून दाखविलंत. तुम्ही लोकांच्या मनात तुमच्याविषयी अपेक्षा निर्माण केल्यात! या अपेक्षांच्या ओझ्याची ओळख आपल्याला असेलच पण त्या पूर्ण कशा करणार हे रस्त्यावर उतरूनच्या आंदोलनाशिवाय सांगितलेत तर तुम्हाला पाठिंबा नक्कीच वाढेल.

एक शेवटचं, राहत नाही म्हणून सांगतो. शिवरायांचं साडेतीनशे कोटी खर्चून समुद्रात भव्यदिव्य स्मारक उभारायचं घाटतंय. कोणाची स्वातंत्र्यदेवता पाण्यात उभी म्हणून शिवरायांचं स्मारकही समुद्रात? असल्यांना शिवराय आणि त्यांचा महाराष्ट्र कधी समजलाच नाही. साडेतीनशे कोटी खर्चायचेच असतील तर त्यांत उभा रायगड पुन्हा बांधून निघेल! आहे का तयारी कोणाची? आणि जर नसेल तर जनतेने दिलेल्या करातून गोळा झालेल्या साडेतीनशे कोटींची वासलात जनतेसाठीच लावावी. शिवरायांचा यापेक्षा मोठा गौरव दुसरा कोणता असू शकत नाही.

आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा बाळगणारा,
एक मराठी माणूस