Sunday, February 27, 2011

Compliment!

तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट!

सोमवार किंवा मंगळवारची सकाळ असेल. आठवड्याची सुरुवात म्हणजे प्रत्येक सकाळ आम्हास युद्धप्रसंग. मी एका start-up मध्ये काम करत होतो. काय दिवस होते ते म्हाराजा! आठवड्याची सुरुवात चार-पाच ठिकाणी लागलेल्या आगी विझवून व्हायची. आमचा बॉसही वेडा होता. टीममधल्या पोरांनी घातलेले गोंधळ तर निस्तरायचेच पण वेड्या बॉसलाही ताळ्यावर आणायचं. मग अशात कोणी मोबाईलवर फोन करून वेळ वाया घालवायला सुरुवात केली की तळपायाचीच नाही तर आजूबाजूचीही आग मस्तकात जायची.

आणि अशाच एका सोमवारी-मंगळवारी मी बॉसला माझा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करीत होतो की हे एकविसावे शतक असले तरीही माणसाने दैनंदिन जीवनात जादूची अपेक्षा करु नये आणि तेव्हढ्यात माझा फोन वाजला. क्षणभर तरी त्या नमुन्यापासून सुटका होईल म्हणून मी तो फोन घेतला.

’सर मी अमूक अमूक कंपनीतर्फे तमूक तमूक बोलते आहे, तुमची दोन मिनिटे घेऊ का?’

कंपनीचं नाव नवीन वाटलं, ’कशासंदर्भात बोलायचं आहे तुम्हाला?’

’सर, आमच्या कंपनीने ‍%ऽ‍* अशी एक कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि तुम्ही याच संदर्भातील काम करता म्हणून...’

स्वत:च्या खिशातले पैसे मोजून लोकांनी क्षुल्लक ज्ञान घ्यायला यावं अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांबद्दल मला फार ममत्त्व नाही, ’मी आत्ता फारच busy आहे आणि नाही बोलू शकत तुमच्याशी.’

असले फोन विसरून जायचे असतात पण त्या बयेनं चार वाजता पुन्हा फोन केला. मी चारच्या प्रथेप्रमणे खास मित्रांबरोबर दहा मिनिटांचा कॉफीपानाचा ब्रेक घेत होतो, ’कोण बोलतंय?’

’सर, मी तुम्हाला सकाळी फोन केला होता? आमची कॉन्फरन्स.. बरोबर पंधरा दिवसांनी आहे.. नामांकित वक्ते...’

बया सुरुच झाली एकदम, ’बरं असं करा ॓ऽ%ऽ हा माझा इमेल आयडी आहे. मला कॉन्फरन्सचे details मेल करा, ते पाहून मी पुढे ठरवेन.’

सहसा अशी सापत्न वागणूक मिळाल्यावर हे मार्केटिंगवाले नाद सोडून देतात. त्यामुळे मीसुद्धा हा प्रसंग लक्षात ठेवायचं काही कारण नव्हतं. पण बया चिकाटीची निघाली. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन.

’सर, मी अमूक अमूक कंपनीकडून तमूक तमूक. मेल मिळाला का तुम्हाला माझा?’

कोणी आपल्याला कारण नसताना उगाचच भाव दिला की आपला तोरा वाढतोच, ’ओह.. मेल केला का तुम्ही? मी मिस केला बहुतेक.’ आता नालायकपणा करायचाच म्हणला की कितीही करता येतो!

’It's okay पण तुम्ही चेक करता का? माझ्या %‍ऽ*! या आयडीवरून तुम्हाला मेल आला असेल.’

मेल खरंच येऊन पडला होता. त्या कॉन्फरन्सला जाण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. पण आता उगाच तोंडावर नाही कशाला म्हणा, ’बरं मी असं करतो, सगळी माहिती नीट वाचतो आणि मग तुम्हाला कळवतो.'

चौथ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन!

’सर, आपण माहिती सगळी पाहिली असेलच. कित्ती छान अमुची कॉन्फरन्स.. नामांकित वक्ते.. netvorking ची संधी...’

जरा जास्त होत होतं. पण ती माझ्या आगाउपणावर जराही न भडकता इतक्या विनम्रतेने बोलत होती की मला प्रश्न पडला की आत हिला कटवायची कशी?, ’Actually याच तारखांना माझ्या दुसऱ्या काही मीटिंग्स ठरलेल्या आहेत. जर त्यात काही बदल झाला तर मी नक्की विचार करेन.’

खरंतर स्पष्ट नाहीच म्हणायला हवं होतं पण उगाच भाव मिळतोय म्हणून जादा नखरे कशाला करा म्हणून मी तो विषय तिथेच सोडून दिला.

एक दिवस सोडून पुन्हा एकदा फोन!

’सर, मी तमूक तमूक!’

आता मात्र कमाल झाली. चार वेळा बोलणं झाल्यावर नुसत्या नावावरून न ओळखण्याइतपत काही माझं वय झालेलं नव्हतं. पण आगाऊपणा मी नाही ती करत होती, ’तुम्ही प्रत्येक invitee बरोबर इतका follow-up करता?’ मी सरळ मुद्द्यालाच हात घातला.

’पण सर, कॉन्फरन्स अमुची कित्ती छान...’

’मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी कळवेन म्हणून, तुम्ही कशाला एव्हढा follow-up...’

’सर, सॉरी जर तुम्हाला त्रास झाला असेल तर. माझा तो उद्देश नव्हताच. पण तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगायची होती.’

देवा.. आता हिची नवी गोष्ट सुरु होणार?, ’हे बघा..’

’सर, मी पहिल्या दिवशी तुमच्याशी बोलले तेव्हा मला तुमचा आवाज अतिशय आवडला. म्हणून मी थोडा जास्त follow-up केला. तुमचा आवाज खरंच खूप छान आहे.’

मी गार! कसंतरी बावळटासारखं, ’ओह थँक्स’ म्हणालो आणि फोन ठेवला.

मित्रमंडळींमध्ये काही दिवस हा प्रसंग अर्थातच चेष्टेसाठी पुरला.

आणि आत्ता हा प्रसंग आठवायचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी दिल्लीला एका क्लायेंट मीटिंगसाठी गेलो होतो. क्लायेंटच्या कोरियन टीममधूनही काही मंडळी आलेली होती या मीटिंगसाठी. तासाभराची मीटिंग तीन तास चालली आणि पुष्कळ वादविवाद घालून आणि एकमेकाची उणीदुणी काढून झाली होती. मीटिंग कधी एकदा संपते याचीच सगळे वाट पाहत होते बहुतेक.

मग finally निरोपाचा hand-shake करताना डोळे मिचकावून तो मुख्य कोरियन मला म्हणाला, ’I am not gay but I really loved your voice!’

मी गार, अजून दोघे टाळ्या वाजवू लागले, तिसऱ्याने ठेवणीतले हसू चेहऱ्यावर आणले आणि चौथा डोळे विस्फारून पाहत होता.

मी पुन्हा एकदा बावळटासारखं थॅंक्स म्हणून बाहेर पडलो!

Wednesday, July 14, 2010

Feeling miserable...


आज भाविकचं लग्न होतं. भाविक माझा कॉलेजमधला मित्र. गेली बारा-तेरा वर्षं आम्ही एकमेकांना ओळखतो. इंजिनीयरिंगनंतर तो इतर बऱ्याच batchmates प्रमाणे MS करायला अमेरिकेत गेला होता आणि आमचा संपर्क कमी झाला.

मी मुंबईतच होतो. मग MS संपवून तो परत आला. बॅंगलोरमध्ये त्याने जॉब जॉईन केला. मेल्स, ओर्कुट वगैरे मधून आम्ही ख्याली-खुशालीची देवाणघेवाण करायचोच पण प्रत्यक्ष भेटणं खूपच कमी होतं.

मग अडीच वर्षांपूर्वी मी एक कंपनी जॉईन केली. विशाल, माझा इंजिनीयरिंगमधला आणखी एक मित्र त्या कंपनीत already होता हे मला माहित होतच. पण भाविकनेही हीच कंपनी काही महिन्यांपूर्वीच जॉइन केली होती. मग काय मला तक्रार करायला किंवा नव्या कंपनीत कोणी फारसं ओळखीचं नाही असं म्हणायला जागाच नव्हती.

रोज लंचच्या वेळी आम्ही एकत्र जमायचो आणि धुमाकूळ घालायचो. जुने जोक्स, जुने फ़ंडे, जुन्या आठवणी नित्य नव्याने चघळल्या जायच्या. लंचच्या वेळी माझं डेस्क म्हणजे सगळ्यात जास्त noisy अड्डा व्हायचा.

एकूणच एकाच wavelength मध्ये असल्याने भाविक माझा कॉलेजमध्ये होता त्याहीपेक्षा जवळचा मित्र झाला!

आज त्याचं लग्न होतं आणि मी मुंबईला परतणाऱ्या flight मध्ये बसून हा useless पोस्ट लिहितो आहे. काल संध्याकाळी बऱ्याच उशीरा एक मीटिंग ठरली आणि मी आजचा पूर्ण दिवस दिल्लीत घालवला. Delay झालेलं flight थोड्या वेळाने land होइल आणि तेव्हा त्याचं reception संपवून सगळे घरी गेलेले असतील.

काही गोष्टी निसटून गेल्याची खूप चुटपूट लागून राहते. You really feel miserable. कशाला दोष द्यायचा कळत नाही. आपल्या हाताबाहेर असणाऱ्या गोष्टींना का आयुष्यात कधी-कधीच जमून येणाऱ्या वाईट टायमिंगला.

ते काही असो, भाविकचं लग्न miss केल्याची टोचणी मी सहजासहजी विसरणार नाही.

Sunday, March 28, 2010

शिक्षणाच्या आयचा घो!

आपणा भारतीयांना फिरंगी गोष्टींचं एव्हढं आकर्षण का आहे?

विशेषत: जेव्हा गोऱ्या कातडीतला (मनुष्य) प्राणी आपल्याला काही करायला सांगतो तेव्हा तसे न केल्यास आपल्या सात पिढ्या नरकात जातील असे आपण का वागतो?

कपिल सिबल यांनी परदेशी विद्यापीठांना भारतात दुकान टाकायचा परवाना दिलाय. गेले काही दिवस त्यावरून उलटसुलट चर्चा चालु आहेत. माझी स्वत:ची वर मांडलेली प्रतिक्रिया थोडी अतिशयोक्तीचीच आहे पण मला खरंच काही प्रश्न पडले आहेत...

परदेशी विद्यापीठांचे Brand Name लक्षात घेता त्यांनी मोठ्या संख्येने Qualified मुलं तयार केली तर त्या मुलांना रोजगाराच्या संधी हेच सरकार स्वत: निर्माण करणार आहे काय की जेणेकरून हीच मुलं देशाच्या विकासकार्यात काही योगदान देऊ शकतील?

ही परदेशी विद्यापीठं दुकान टाकणार म्हणजे आपल्याकडच्या शिक्षण आणि संबंधित क्षेत्रातील लोकांना अधिक संधी उपलब्ध होतील पण त्याहीपेक्षा कित्येक मोठ्या संख्येने शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलांना याच मातीत विकासाच्या संधी मिळवून देण्यात या विद्यापीठांचं काय योगदान असणार आहे?

या विद्यापीठात शिक्षण घ्यायचं तर त्यासाठी इथल्या इतर कोणत्याही विद्यापीठात मोजावी लागते त्यापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार. मग आपल्याकडील अधिकतम विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा मिळणार?

उत्तम दर्जाचं शिक्षण आपल्या मुलांना मिळावं हा उदात्त हेतू असला तरीही ते शिक्षण घेवून आपल्या देशाची मूलभूत प्रगती होण्यासाठी त्यांच्या ऊर्जेचा वापर कसा करून घेता येईल यासाठी सरकार या विद्यापीठांना बांधील ठेवेल क?

शिवाय हे साध्य करताना त्या शिक्षणाला भारतीय मातीचा वास आला पाहिजे. त्यासाठी हे परदेशी पाहुणे काय करतील?

साखर असते तिथेच मुंग्या येतात. आपली मोठ्ठी लोकसंख्या आणि त्यातही किमान ५० टक्के लोकसंख्या पुढील २० वर्षं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शिक्षण घेणारी असेल. ही पिढी आजपासून पन्नास वर्षांनी दिसणारा भारत घडवणार आहे. मग शिक्षणक्षेत्राशी संबंधित चर्चा केवळ परदेशी विद्यापीठांबद्दल मर्यादित असून कसे चालेल?

जिथे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतात तिथे दुकान टाकणं आणि चालवणं सोपं असतं. परदेशी विद्यापीठांकडून भारताच्या प्रगतीला हातभार लावण्याची अपेक्षा असेल तर त्यांना सगळी महानगरं आणि प्रमुख शहरं सोडून इतर ठिकाणी स्वत:चा कारभार सुरु करण्यास का सांगू नये? त्यांची Brand Value खरंच एव्हढी मोठी असेल तर विद्यार्थी ते कुठेही असतील तिथे जाणार नाहित का? शिवाय त्या त्या शहरांचा, गावांचा विकास होण्यास मदत होणार नाही का?

घडीव साच्यातल्या आकर्षक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त भारताच्या प्रगतीला पोषक असे अभ्यासक्रम सुरु करण्याची सक्ती या विद्यापीठांवर का असू नये? आणि असे करण्यास चुकणारी विद्यापीठांना गाशा गुंडाळण्याची सूचना करण्याची हिंमत सरकार दाखवेल का?

भरमसाठ फी भरून ऍडमिशन घेणाऱ्या दर दहा विद्यार्थ्यांमागे एक (केवळ) आर्थिकदृष्ट्या मागास पण अत्यंत लायक विद्यार्थी मोफत शिकवण्याची सक्ती का असू नये? अर्थातच असे लायक विद्यार्थी कोणतीही जातपात मधे न आणता अत्यंत पारदर्शक प्रक्रियेतून निवडण्याचे साहस सरकार दाखवेल काय?

आणि सगळ्यात शेवटी, एकूण उत्पन्नाचा ठराविक हिस्सा देशाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी इथेच खर्च करण्याची अट सरकार घालेल? आणि गोरे पाहुणे ती अट जुमानतील?

Sunday, January 17, 2010

Teach for India!

मिलिंद काल जवळपास सात-आठ वर्षांनी भेटला. एक वर्षाने सिनियर होता मला कॉलेजमध्ये. Extracurricular activities मध्ये भाग घेताना त्याची ओळख झाली होती. इंजिनीयरिंग संपलं. सगळेच करतात त्याप्रमाणे तो MS करायला US ला गेला आणि इतर मित्रांकडून अधनंमधनं त्याची खबर मिळायची.

पंधरवड्यापूर्वी कॉलेजमधले मैत्र भेटलो होतो तेव्हा तनुश्री म्हनाली की मिलिंद दोन-तीन वर्षांपूर्वीच भारतात परत आला. त्यानं बंगलोरला जॉब घेतला होता. पण सध्या तो मुंबईतच आहे आणि सध्या तो Teach for India मधून शाळामास्तर झालाय.

माझ्या डोळ्यासमोर पटकन एक sketch उभं राहिलं. एका संपन्न मारवाडी घरातला मुलगा. इंजिनीअर झाला, US ला गेला, MS केलं. आता चांगली मारवाडी मुलगी बघून पंचतारांकित लग्न करायचं आणि झालंच तर family business जॉइन करायचा. आता हे काय भलतच.

मग काल जेव्हा मिलिंद भेटला तेव्हा सगळी कहाणी ऐकली. एखाद्या मूलभूत कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायची इच्छा तो नेहमी घरच्यांसमोर बोलून दाखवायचा. मग एके दिवशी Teach for India ची जाहिरात त्याला त्याच्या आईने दाखविली. महाशय जॉइन देखिल झाले. ज्या वयात पैश्याच्या मागे धावायचं तो मोह किमान दोन वर्षं बाजुला ठेवून मुनिसिपाल्टिच्या कुठल्याशा प्राथमिक शाळेत हा माणूस सध्या मास्तर म्हणून काम करतोय.

तु निर्णय घ्यायला किती वेळ घेतलास? घरच्यांनी निर्णय कसा स्वीकारला? दोन वर्षांनंतर काय? मी, रावी, नयन, गौरी, विवेक, काजल, श्वेता - आमच्या या सगळ्या प्रश्नांची त्याने ज्या उत्साहाने आणि मनापासून उत्तरं दिली त्यावरूनच खात्री पटली की आपल्या मनाने मनापासून एखादा वसा स्वीकारला की sky is the limit!

मिलिंद Teach for India मार्फत जे काम करतोय त्याच्या details लवकरच. सध्या मी दादरमधल्या शिंदेवाडी महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यामाच्या इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक श्रीयुत मिलिंदभैया यांना भेटायचा प्लान करतो आहे.

श्रीयुत मिलिंदभैय्या, I am proud of you!

Sunday, November 15, 2009

माननीय राजसाहेब

माननीय राजसाहेब,

खरं सांगायचं तर आमची पिढी माननीय आणि साहेब ह्या दोन्ही प्रकारांना जुमानत नाही. पण निदान जुजबी ओळख होईपर्यंत जुन्या जोखडांचं वेड पांघरायला आमची ना नाही.

सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. तुमच्या मनसेचे तेरा उमेदवार विधानसभेवर निवडून आले. अभिनंदन मात्र तुमचंच कारण एक राजकीय पक्ष म्हणून मनसे अभिनंदनास पात्र आहे किंवा नाही हे तुमच्या तेरा आमदारांची कारकीर्दच ठरवेल.

आम्ही तुम्हाला मनसे जन्माला आल्यापासून नव्हे तर शिवसेनेचा भावी firebrand म्हणून तुमची गणना होत होती तेव्हापासून पाहतोय. कोणत्याही राजकारण्याच्या मागे गतस्मृतींची भुतावळ ही असायचीच. तुम्हीही त्याला अपवाद कसे असणार?

मात्र मुद्दा तो नाही. आमची म्हणजे तरुण पिढी राजकारण, लोकशाही, देशकार्य या गोष्टींची allergy बाळगून आहे असे नाही तर जिद्दीनं अवघं आकाश कवेत घेणारी आहे. पण त्याचबरोबर बदल या जगण्यास अत्यावश्यक अशा घटकास आम्हास अपेक्षित अशा वेगाने प्रतिसाद न मिळाल्यानं काहीशी स्वार्थी झाली आहे. स्वत:च्या प्रगतीआड येणारी बहुतेक प्रत्येक गोष्ट नजरेआड करुन आजचा किंवा फारतर उद्याचा पण स्वत:चाच विचार करायची आम्ही सवय लावून घेतली आहे.

मराठीच्या नावानं चांगभलं करून ऐन निवडणूकीच्या मोक्यावर आपला आवाज सर्वांना व्यवस्थित ऐकू गेला. पण जरठ दिग्गजांच्या मांदियाळीत जे तरुणाईचे अंकुर गेल्या दहा वर्षांत देशभरात उगवले त्यात आम्ही तुम्हाला जरूर शोधतो. त्यामुळेच मराठीचा नारा ही निवडणूकीच्या काळाची गरज होती पण आजच्या महाराष्ट्राची गरज त्याहून थोडी अधिक आहे आणि हे आपण जाणता असा विश्वास आम्ही ठेवायचा का तुमच्यावर?

मुंबई, पुणं, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर वगळलं तरी केव्हढातरी महाराष्ट्र शिल्लक राहतो. आपल्या तेरा आमदारांना हा महाराष्ट्र माहित आहे काय? नंदूरबार, बुलढाणा, रावेर, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, गोंदिया इथेही मराठी लोकंच राहतात आणि आणि प्रगतीची आस त्यांनाही असू शकते हे पक्षाच्या नावातच महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची स्वप्नं दाखविणाऱ्या मंडळींनी विसरू नये. आता गोंदियातल्या विडीचा धूर भरल्याशिवाय भारतात एकही विमान उडत नाही. त्यामुळे नाव जरी मागासलेलं वाटलं तरी प्रगतीची वाट कुठल्याही आडवळणापासून सुरु होते हे विसरून नाही चालत.

आणि आहे काय हो या मुंबईत जे करायचं शिल्लक आहे अजून? महाराष्ट्र नव्यानेच निर्मायचा असेल तर मुंबईलाही हेवा वाटेल अशी दोन-तीन शहरं विकसित करून दाखवा ना. मला माहित आहे की हे वाक्य लिहायला जेव्हढं सोपं होतं तेव्हढं कृतीत आणायला नाही. पण सुरुवात कोणीतरी करायलाच हवी, नाही का? आणि हो मुंबईला हेवा वाटेल अशी ठिकाणं तयार करायची म्हणजे गर्दी, traffic, प्रदूषण, महागाई एव्हढेच नव्हे. चार मेगामॉल्स उघडले म्हणून कुठलंही शहर आंतरराष्ट्रीय नकाशात नावारुपाला आल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. त्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागते. आणि त्यासाठी आधी मुंबई, पुण्यापलिकडे नजर जावी लागते. आपलीही ती जाईलच अशी अपेक्षा आम्ही ठेवायची का?

ज्या शिवरायांनी सगळ्या जगाला उत्तम राजशासनाचे धडे दिले त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्या जर बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आतापर्यंत बहुतेकांनी ज्या भीषण समस्यांचा महाराष्ट्राला भेडसावणारे प्रश्न म्हणूनही स्वीकार केला नाही अशा समस्यांची कदाचित उत्तरेही सापडतील. शेतकरी आत्महत्या करतात हे खरं आहे, पण ते आत्महत्या का करतात हे कोणाला माहित आहे का? आणि जर माहित असेलच तर केवळ त्या थांबविण्याचा प्रयत्न न करता त्यांची प्रगती कशी होईल याचा विचार करायला आजवर कोणाला सवडच मिळाली नाही. तुम्ही काढाल का ही सवड? महाराष्ट्रातही नक्षलवादी आहेत याची चिंता आम्ही रोज लोकलचे धक्के खात ऑफिस वेळेवर गाठायच्या घाईत कधी करायची? पण मुळात एका सामान्य माणसाचा नक्षलवादी होण्यापर्यंतचा प्रवास फळास जाईपर्यंत शासनकर्ते कोणता मलिदा फस्त करण्यात मग्न होते हे त्यांनाच माहित पण कधीतरी तुम्हीही अशा गोष्टी हाताळण्यासाठी पावले उचललीत तर मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात यादगार ठराल. अशा कामांना glamour नसतंच पण ती केल्याने लोकांचा विश्वास बसतो. निवडणूकांच्या काळात तिकिटाच्या बारिवर हाच विश्वास धमाल उडवून देऊ शकतो.

पुन्हा एकदा मराठी, मराठी माणसांच्या मुद्द्याकडे वळू. तुम्ही एक प्रतिथयश businessman आहात. समजा तुम्हाला एखादा महत्त्वाचा project पूर्णत्त्वास नेऊ शकेल अशा माणसाची गरज असेल तेव्हा तुम्ही non-qualified पण केवळ मराठी म्हणून कोणाची निवड कराल काय? कोणी प्रांतीय मक्तेदारी, शिफारसी चालवू पाहत असेल तर त्यास विरोध जरूर करावा पण प्रत्येक वेळीच आंदोलन करतो म्हणलं तर त्याची किंमत काय हो राहिली? ज्या नोकऱ्यांसाठी आंदोलन करायचं त्यासाठी चर्चेत असणारे मराठी तरुण त्या नोकऱ्यांसाठी लायक आहेत का याचा परखडपणे कोणी विचार करतं का? आणि समजा नसतील तर त्यांच्या उन्नतीसाठी कोणी प्रयत्न करतं का? मुंबईत येणाऱ्या so-called बाहेरच्या लोंढ्यात महाराष्ट्रातील माणसेच जास्त असतात. त्यांनाही परत पाठवायचं का मग? पण मुळात मुंबईत यावं लागतं याचाच अर्थ त्यांना पुरेशा संधी त्यांच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. ते कधी व्हायचं आणि कोणी करायचं?

राजसाहेब, गेल्या बऱ्याच वर्षांत कोणा राजकारण्याला जे जमलं नाही ते तुम्ही करून दाखविलंत. तुम्ही लोकांच्या मनात तुमच्याविषयी अपेक्षा निर्माण केल्यात! या अपेक्षांच्या ओझ्याची ओळख आपल्याला असेलच पण त्या पूर्ण कशा करणार हे रस्त्यावर उतरूनच्या आंदोलनाशिवाय सांगितलेत तर तुम्हाला पाठिंबा नक्कीच वाढेल.

एक शेवटचं, राहत नाही म्हणून सांगतो. शिवरायांचं साडेतीनशे कोटी खर्चून समुद्रात भव्यदिव्य स्मारक उभारायचं घाटतंय. कोणाची स्वातंत्र्यदेवता पाण्यात उभी म्हणून शिवरायांचं स्मारकही समुद्रात? असल्यांना शिवराय आणि त्यांचा महाराष्ट्र कधी समजलाच नाही. साडेतीनशे कोटी खर्चायचेच असतील तर त्यांत उभा रायगड पुन्हा बांधून निघेल! आहे का तयारी कोणाची? आणि जर नसेल तर जनतेने दिलेल्या करातून गोळा झालेल्या साडेतीनशे कोटींची वासलात जनतेसाठीच लावावी. शिवरायांचा यापेक्षा मोठा गौरव दुसरा कोणता असू शकत नाही.

आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा बाळगणारा,
एक मराठी माणूस

Saturday, October 3, 2009

बावनकशी

काल पिक्चरला गेलो होतो. Actual पिक्चरबद्दल नंतर बोलू पण सुरुवात कशी झकास झाली त्याबद्दल आधी.

पिक्चरची सुरुवात राष्ट्रगीताने होते हे काही नव्याने सांगायची गरज नाही. पण राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याची सूचना झाली आणि सगळं ध्यान त्या काळ्या पडद्यावर एकवटते न एकवटते तोवर Black&Whiteच्या एका जबरदस्त शेडमध्ये साक्षात लता मंगेशकर पडद्यावर अवतरली. पांढरीशुभ्र साडी, कानात हिऱ्यांच्या कुड्या, गळ्यातल्या सोनेरी चेनवर मध्यात अडकवलेला छोटासा तिरंगा! एखाद्या ध्यानस्थ योगिनीच्या आविर्भावात तिने जन - गण - मन सुरु केले आणि जगातली सर्वात तेजस्वी तलवार सपकन हवेत फिरवल्यावर जशी तेजाची रेखा हवेत दिसावी तसे ते तिचे सूर दिसू लागले. तापल्या मुशीतून शुद्ध सोन्याची धार ओतावी तसे.

साक्षात स्वर्गीय.

पहिली ओळ संपली आणि अस्सल मातीच्या दाणेदार सुरात गीत पुढे सुरु राहिले. आशा भोसले! प्रश्नच नाही.

राष्ट्रगीत पूर्ण म्हणून होईपर्यंत ह्या दोघी बहिणींनी जी करामत केली तिला तोड नाही.

ह्या दोघी गात असताना त्यांना पडद्यावर दाखवा किंवा दाखवू नका, पडद्यावर मधुबाला, माधुरी दिक्षित, वहिदा रेहमान, रेखा, हेमामालिनी अशा सुंदऱ्या असू द्यात किंवा नसू द्यात. ह्या बहिणी जेव्हा गातात तेव्हा त्यांचे सूर नुसते ऐकूच येत नाहित तर दिसतातही!

जय हे! जय हे!

जय जय जय जय हे!

Saturday, September 19, 2009

भिकेचे डोहाळे २

मागच्या पोस्ट्मध्ये जो उल्लेख MUST होता पण मी तो करायचं विसरलो म्हणून हे Addendum.
एका मित्राने एक फक्कड जोक ऐकवला होता.

एयर इंडियाने म्हणे जाहिरात केली की आमच्याबरोबर प्रवास करा म्हणजे तुम्हाला आईच्या मायेची ऊब मिळेल.

प्रवासी म्हणाले की झाडून सगळ्या हवाईसुंदऱ्या आमच्या आईच्या वयाच्या असतात आणि AC बहुतेकदा चालत नसल्याने ऊबही मिळतेच!