Saturday, September 19, 2009

भिकेचे डोहाळे!

सरकारच्या हवाई वाहतूक खात्याने फतवा काढलाय, म्हणे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी एयर इंडियानेच प्रवास करायचा. कारण काय तर याप्रकारे एयर इंडियास वार्षिक दोन हजार कोटींचा महसूल मिळेल आणि दिवाळखोरीच्या दारात उभी असलेली ही सरकारी कंपनी तगेल.

भिकेचे डोहाळे यालाच म्हणतात. एके काळी ही एकच कंपनी भारतीयांना विमान प्रवास घडवायची. गेल्या दहाएक वर्षात चित्र पूर्णपणे बदललं. पण तरीही एयर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मुजोरी काही कमी झाली नाही. Ground staff तरिही ठीक आहे पण cabin crew ची निवड मात्र नसानसात भिनलेल्या उर्मटपणाची खात्री पटल्याखेरीज करत नसावेत.

अपवाद अर्थातच सगळीकडे असतात. एकदा एका हवाई सुंदरीने माझं हसून स्वागत केल्याचं मला नक्की आठवतं. शिवाय ती सर्व्ह करत असलेली कॉफी गार आहे असं सांगितल्यावर चक्क तिनं ती कॉफी गरम करुन वाढली होती! आणि एकदा एका हवाईसुंदराने In-flight entertainment system काम करत नाही म्हणल्यावर आधी ती थोबडावली आणि तरिही ती काम करीत नाही म्हणल्यावर मागच्या सीटवरची सिस्टिम काम करत आहे हे तपासून मग मला तिथे बसण्याची नम्रपणे विनंती केली. माझ्या हातातला मोबाइल फोन पाहून तो अमक्या एका मॉडेलपेक्षा किती चांगला आहे अशासारखे काही smart प्रश्नही विचारले होते.

अर्थातच हे दोघेही साठीच्या अर्ध्या वयातले दिसत होते. नाहीतर सहसा पन्नाशीच्या आतला चेहरा cabin crew मध्ये कुठनं दिसणार? एयर इंडियाचं दार ओलांडून आत गेलं की काहीवेळा अक्षरश: यमपुरीत entry केल्यासारखं वाटतं. Make-upच्या नावाखाली रंगांचे थर तोंडावर थापलेल्या त्या व्रूद्धा आणि पांढऱ्याशुभ्र केसातून टक्कल दाखवणारे आणि पोट सुटलेले ते जरठ यांचे खडूस चेहरे पाहिले की थोडी भीतीच वाटते.

एकदा take-offच्या आधी मी खूप तहान लागली म्हणून पाणी मागितलं होतं. त्या साठीच्या सुंदरीने ज्या प्रकारे ते आणून माझ्यापुढे आदळलं तेव्हा तिच्या मनातले ’गिळ मेल्या एकदाचं’ हे शब्द मला स्पष्टपणे ऐकू आले होते!

तर असल्या ह्या कंपनीला जीवदान देण्याचा प्रयत्न चाललाय त्याला माझा विरोध नाही पण अनिकेत जे काही मला सांगत होता त्यात logic शोधायचा मी बराच वेळ प्रयत्न केला. तो पुढच्या महिन्यात तेहरानला एका conferenceसाठी जाणार आहे. सरकारी तिकिटाने जायचे असल्याने एयर इंडियाने जाणे ओघाने आलेच. आता गंमत अशी की मुंबई - तेहरान असं इराण एयरचं return तिकिट १९ हजारात मिळतं. एयर इंडियाची तेहरानला direct flight नाही म्हणून मग तो आता मुंबई - दुबई एयर इंडियाने आणि दुबई - तेहरान एमिरेट्स, जे एयर इंडियाचे सहकारी flight आहे त्याने जायचा आहे. Return तिकिटाचा खर्च ३८ हजार फक्त! आणि त्याच्या ऑफिसमधून असे एकूण सहाजण जाणार आहेत.

आता logically विचार केला तर सरकारी म्हणजे पर्यायाने जनतेच्या पाठबळावर चालणारी एखादी कंपनी वाचवताना cost-cutting किती केले? Efficiency किती वाढवली? Quality of service किती सुधारली? ह्या गोष्टींचा विचार करायची गरज आहे असंच मला वाटत होतं!

Saturday, August 22, 2009

नावात काय आहे?


वांद्रे-वरळी पूलाचे घाटत होते तेव्हा मी शाळेत होतो. मी किती वयस्कर झालोय यापेक्षा ही गोष्ट फार फार वर्षांपूर्वीची आहे हे महत्त्वाचं!

तर गोष्ट सुरु झाली आणि सर्वांना मुंबईत उद्या सकाळपर्यंत गोल्डन गेट ब्रिज बांधून तयार होईल अशी स्वप्नं पडू लागली. आता आजतागायत भारत वर्षात असला execution speed कोणी पाहिला आहे का? अर्थातच सम्राट अशोक, मुघल सम्राट किंवा अगदी अलिकडचे शिवाजी महाराज अशांचे सन्माननीय अपवाद वगळता. शिवाजीमहाराजांना अलिकडचे म्हणायचा उद्देश एव्हढाच की आज-काल ज्या वेगाने सरकारी कामे होतात त्याने पुढच्या चारशे वर्षात ती नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास वाटतो.

तर सी-लिंकची कल्पना कोणा महाभागाने एका अशुभ वेळी मांडली आणि बांधकामातले सगळे अडथळे एकदम निर्माण झाले. माहिमच्या समुद्राची पातळी धोकादायकरित्या वाढेल येथपासून ते माहिमच्या खाडीतील मत्स्यजनांना वाईट वाटेल पर्यंत पुष्कळ वाद झाले. एव्हाना मी कॉलेजात जायला लागलो होतो. त्यामुळे आयत्याच फुटलेल्या शिंगांमुळे बहाल झालेली अक्कल पुरती धुंडाळूनही, सी-लिंक बांधायला लायक मंडळी अख्ख्या भारतात नाहित का असा प्रश्न मला पडायचा.

असो.

न बांधलेल्या पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि कधीतरी या पूलाचं काम खरंच सुरु झालं. मी चारशे वर्षांचा count-down केव्हाच सुरु केला होता पण महिन्याभरापूर्वी हा ब्रिज चक्क वाहतुकीसाठी खुला झालासुद्धा!

सोनियाबाई उद्घाटनाला आल्या आणि पवारांनी हलकेच पुडी सोडली, पूलाला नाव राजिव गांधींचं द्यायचं! सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

चोवीस तासही उलटले नव्हते बारसं होऊन तर कोणीतरी डरकाळी फोडली, पुलाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुनच ठेवायचं! आता झाली का पंचाईत. एका पुलाची दोन नावं कशी ठेवायची? वांद्र्याच्या बाजुला गांधी आणि वरळीकडच्या टोकाला सावरकर म्हणून प्रश्न सोडवता आला असता पण मग पुलाच्या मध्यात आंबेडकर का नकोत? फुले, सरदार पटेल, नेताजी बोस, रविंद्रनाथ टागोर, मदर तेरेसा, झाशीची राणी यांचं काय मग?

सगळ्यात मोठी गंमत म्हणजे, सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरणावरुन वाद होऊ नयेत म्हणून अशा ठिकाणांच्या नामकरणासच बंदी करणारा कायदा महानगरपालिकेनं कधीचाच केलाय. सगळे कायदे कोळून प्यायलेले आपले मान्यवर नेते हाच तेव्हढा कायदा विसरले होते काय?

Saturday, July 4, 2009

साधर्म्य-वाचक घटना!

नविन गाडी घेतल्यानंतरचा मानसिक प्रवास

पहिला महिना - नविन गाडी drive करायची तेव्हा नव्याची नवलाई तर असतेच पण त्याचबरोबर मनात थोडी धाकधूकही असते. नविन गाडीचं shine जसंच्या तसं राखणं हे म्हणजे परम कर्तव्य. गाडीवर एखादा ओरखडाही उठणं म्हणजे एकदम guilty feeling येतं.

सहावा महिना - ओरखडा वगैरे ठीक आहे, पण शक्यतो मोठा dent नसावा! अगदी वाईट दिसणारे बरेच ओरखडे झाले तर पुढच्या सर्व्हिसिंगला पेंट करून घेता येतं. पण अगदीच dent असला तर मग खरंच वाईट वाटतं. दुसऱ्याची चूक असली तरीही आपल्याला थोडी जास्त काळजी घेता आले असती ही बोचणी मनात राहते.

एका वर्षानंतर - गाडी आहे म्हणजे ओरखडे, dents हे व्हायचंच. पण शक्यतो accidents कसे टाळता येतील हे बघावं. पण ट्रॅफिक किती वाढली आहे आजकाल. बेभरवशाची लोकं कशाही गाड्या हाकणार. मग एखादा येऊन आदळलाच तुमच्यावर तर काय करणार तुम्ही? Damage किती आहे आणि ते कसं manage करता येईल हे पाहणं महत्त्वाचं!

लग्न झाल्यानंतर वेळ पाळतानाचा भावनिक प्रवास

पहिला महिना - आजतागायत ऑफिसमध्ये सहा वाजता फोन करून घरी किती वाजता येणार आहेस असं कोणी विचारला नव्हतं मला. पण कुठेतरी बाहेर जायचं ठरलं होतं. बरं झालं, आठवण करायला बायको आहे आता. वेळ पाळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं!

सहावा महिना - आता चार कामं एकदम करायची म्हणजे वेळ थोडीफार पुढेमागे व्हायचीच. ऑफिसमधून अगदी बाहेर पडताना एक छोटी मीटिंग ठरली तर काय करणार? होम मिनिस्ट्रीबरोबर बाहेर जायची वेळ ठरली असली तरीही थोडा उशीर सगळ्यांनाच माफ असतो. थोडीफार विशेष सत्कार्यं करून ब्राऊनी पॉईंट्स कमावता येतात. ठरवलेला प्लान थोडा पुढे गेला ही बोचणी राहते मनात पण मग पुढच्या वेळी उशीर कसा होणार नाही याची काळजी घेतली की झालं.

एका वर्षानंतर - आता सगळ्याच गोष्टी काय तुमच्या हातात असतात का? ऑफिसमध्ये उशीर होणं नेहमीच टाळता येईल असं नाही. परवा तर एक शाळेतला मित्र कितीतरी वर्षांनी भेटला वाटेत, मग गेला थोडा बोलण्यात वेळ. पण हो, अगदी crucial events वेळ चुकवून चालत नाहीत. नाहीतर मग जिवावर बेततं. वाढदिवस विसरणं हा तर जिवावर बेतणारा accident! आणि समजा तस काही झालंच तर damage control कसं manage करता येईल हे पाहणं महत्त्वाचं!

Monday, February 9, 2009

त्या वळणावर

आयुष्यात ती वेळ येतेच. आणि अर्थातच ती काही सांगून येत नाही.

त्या एका निर्णयावर म्हणलं तर सगळंच काही अवलंबून असतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर ’हो’ किंवा ’नाही’ देणं हे शिंक आल्यावर शिंकून मोकळं होण्याइतकं प्रत्येक वेळीच शक्य नसतं.

आणि ज्या उत्तराने आयुष्याचा डाव मांडला जातो तो प्रश्नच मुळात क्लिष्ट असतो..

हो म्हणावं तर अगदी एखाद्या bollywood flick प्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी, शेहनाई आणि palette मधले सगळेच रंग उधळलेले दिसावेत. पण त्याचबरोबर येणाऱ्या जवाबदाऱ्यांचं extra baggage, स्वातंत्र्याला फासलं जाणारं काळं, प्रत्येक गोष्टीत स्वत:शिवाय आणखी एकाचा विचार करायची mandate.. आणि आणखी हजार गोष्टी..

पण नाही म्हणायला एखदंतरी logical कारण सापडणं आवश्यक असतं. च्यामारी.. गरजेच्या वेळीच एरव्ही unavoidable असणारं logic कुठे गोते खातं त्या परमेश्वरास ठाऊक.

काही गोष्टीतून सुटका नसते हेच खरं!

Thursday, January 29, 2009

एक cool dude

सकाळी सकाळी ऑफिसला पोहोचलो. अजून बॅगही डेस्कवर टेकवली नाही तर नील म्हणाला, ’टॉयलेटच्या दिशेनं बघत रहा, बाहेर कोण येईल बघ.’ आता ही काय Good Morning करायची पद्धत झाली का? पण नाही. त्याला म्हणलं, ’भो***, सकाळी सकाळी चू** बनवायला अजून कोणी मिळालं नाही का?’

त्यानं भिजल्या मांजरावाणी चेहरा करत एक emotional dialogue मारला, ’तुझा माझ्यावर एव्हढाही विश्वास नाही का?’ मग उत्तरादाखल मी जोरात हसून दाखवलं त्याला. पण नजर टॉयलेटच्या दिशेनं गेलीच.

आणि तिथून साक्षात नंदन निलेकणी बाहेर पडले.

मला अगदी कोणा जादूगराने रिकाम्या टोपीतून एकदम जिवंत ससा काढून दाखवावा तसं वाटलं.

नीलच्या पाठीत मी जाऊन एक जोराचा धपाटा घातला. आता हसायची वेळ त्याची होती.

त्याचं काय झालं होतं की, साहेब आमच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित्त आले होते. ते कॉन्फरन्स रूममध्ये निघून गेले आणि आम्ही गप्पात मश्गूल आणि अफवांना उधाण, Infosys आपल्याला takeover करणार की काय?

यथावकाश त्यांची मीटिंग उरकली आणि आमच्या मंडळींनी जाहीर केलं की ते आपल्या employeesनाही address करणार आहेत. मग पुढची वीस मिनिटं एकदम धमाल गेली. किती सहज बोलल्यासारखं बोलले ते. सध्याची परिस्थिती, global slowdown, software क्षेत्राला बसणारे फटके, सत्यम म्हणजे अवघी industry नव्हे, नजिकच्या काळात या क्षेत्राने कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे याचा उल्लेख तर त्यांनी केलाच पण त्याही पलिकडे जाऊन आपला देश, नक्की कोणत्या बाबींमुळे आपल्याला advantage मिळतो आहे, मिळणार आहे, तरुण पिढी कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत, ब्रेन ड्रेन वाईट का नाही, ideas महत्त्वाच्या का असतात. एक ना अनेक, केव्हढ्या गोष्टींचा किती सहज उल्लेख केला त्यांनी. Industry leaders ही ओळख सार्थ करून दाखवणं किती सहज जमतं या लोकांना. आणि हो, जाता जाता आपल्या नविन पुस्तकाचा उल्लेख करण्यासही विसरले नाहीत ते.

एकदम cool dude!

I really wish if one day, some day I could be like them!!

Sunday, December 21, 2008

माकडाच्या हातात शॅंपेन

शाहरुख खानला मी माकडापेक्षा अधिक मानत नाही. जेव्हा तो एखादा सणसणीत performance देतो (कभी हा कभी ना, चक दे वगैरे) किंवा एखद्या मुरलेल्या businessman प्रमाणे वागतो (IPL मध्ये त्याच्याच टीमने सर्वात जास्त नफा कमावला होता!) तेव्हा त्याला उत्क्रांतीमध्ये इतर प्रजातींपेक्षा अधिक प्रगती केलेल्या माकडाइतकाच मानतो!

थोडक्यातच सांगायचं तर स्वत:च्या पैश्यांनी मल्टिप्लेक्सचं महागडं तिकिट काढून शाहरुख नावाची तीन तासांची डोएकेदुखी पदरात पाडून घेणाऱ्यातला मी नक्कीच नव्हे. पण माझ्या टीमने मोठ्या उत्साहाने ’रब ने..’चा प्लान बनवला होता त्यामुळे यावेळी बचाव शक्य नव्हता. आणि शेवटी जे व्हायचे ते झालेच. अनुष्का शर्मा नामक कमनीय बांध्याच्या आणि बऱ्यापैकी बोलका चेहरा असणाऱ्या कुडीसमोर म्हातारा शाहरुख त्याच्या ठराविक त्या पाट्या टाकतो आणि ते तीन तास असह्य करतो.

अनुष्का शर्मा, जी आधी खूप impressive वाटते, ती वेष बदललेल्या माकडाला ओळखायला तीन तास घेते, म्हणजे ती काही ’सगळ्या सुंदर मुली मठ्ठ असतात’ ला अपवाद ठरत नाही. मुळात ती नव्या रुपात आलेल्या cheap शाहरुखच्या प्रेमात पडूच कशी शकेल हा प्रश्ण ना तिला पडतो ना दिग्दर्शकाला. आदित्य चोप्राकडून एव्हढ्या पोकळ अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण शाहरुखला assume केल्यामुळे दिलवाले...चा हा दिग्दर्शक साफ fail गेला आहे.

मला इथे काही चित्रपट परिक्षण लिहायचं नाहिये. पण राहून राहून नुकत्याच एका ’आंखो देखा’ love triangle ची आठवण येते आहे. तो देखणा, हुशार, खानदानी, उत्तम sense of humour असणारा. तीही सुंदर, ambitious आणि lively. आणि तिसरा कोन अर्थातच त्या शाहरुख-सामाईकचा. ती आणि शाहरुख एकाच departmentमध्ये होते आणि आपल्या असली heroची entry होण्या आधी किमान एक वर्ष एकमेकाला ओळखत होते. पण आपला hero आणि ती यांचं understanding अगदी बघण्यासारखं होतं. Cross-departmental functioning दोघंही इतक्या smoothly handle करायचे की क्या बात है! आणि शाहरुख केवळ street-smart, qualification - हुशारी यात आपल्या heroच्या पासंगालाही न पुरणारा.

पण त्याची fielding लाजवाब असणार यात शंकाच नाही. गेल्या रविवारी तिचं आणि त्या so-called शाहरुखचं लग्न झालं. ऑफिसमधून आम्ही सगळे गेलो होतो. आपला heroसुद्धा होता, अगदी comfortable.. व्यक्त न केलेल्या भावना सहज लपवून टाकत असावा किंवा बाकीच्यांनाच त्या दोघांच्या होऊ शकणाऱ्या गोष्टीत खूप जास्त interest होता.

काही असो मला मात्र रब ने.. पाहिल्यावर तिची आठवण आली. अमिताभ समोर असताना कोणी शाहरुख prefer करतं का? या मुलींची हीच गोष्ट मला समजत नाही बुवा.

Anyway, गोष्टीतल्या तिघांनाही मी अगदी जवळून ओळखतो त्यामुळे मी तिघांचही चांगलच व्हावं असं म्हणणार पण प्रश्ण मात्र मनात राहिलच, प्रेम खरंच आंधळं असतं की या गाठी वरच बांधलेल्या असतात..

Saturday, November 22, 2008

इंडिया शायनिंग

काल ऑफिसला जाताना गाडी सिग्नलवर थांबली होती. हा सिग्नल भीक मागणारे भिकारी, काहीतरी विकायचा प्रयत्न करणारे भिकारी, तृतीयपंथी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि हो, वाहनांसाठी हिरवा सिग्नल चालू असताना रस्ता क्रॉस करायसाठी धावणाऱ्या माणसांसाठीही अर्थातच!

तर गाडी थांबली आणि पुढचे वीस सेकंद काय कारायचं म्हणून इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. शेजारीच एक बाईक येऊन थांबली. चालवणारा आपला देसी dude च होता. भर उन्हात काळ्या गॉगलबरोबरच लेदर जॅकेटही घातलं होतं त्यानं. असले प्रकार सहसा हास्यास्पदच असतात.

पण त्याच्या इतक्या सजण्या-सवरण्याचं कारणही त्याच्या मागेच बसलं होतं. कारण एक सुंदर गौरांगना होती. फॉरेन मेड सुंदरी! मी मनात म्हणलं, नशिब आहे साल्याचं, तेव्हा घालेना का लेदर जॅकेट भर उन्हात..

बाईक थांबली म्हणून लगेच त्या दोघांचं कूजन सुरु झालं आणि मधुर प्रसंगात एका तृतीयपंथीयाने एन्ट्री घेतली, अगदी कमला का हमला स्टाईलमध्ये!

पहिली जोरदार टाळी वाजली आणि आजूबाजूच्या किमान पन्नासजणांना ऐकू जाईल अशा आवाजात कमलानं तिला (किंवा त्याला) पैसे दिल्यास देसी dude आणि फिरंगी ललना यांचा संसार कसा सुखाचा होईल, त्यांची मुलं कशी सुखात वाढतील याचा पाढा वाचायला सुरुवात केली. आपला dude कमलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असतानाच विदेशी सुंदरीच्या चेहऱ्यावरील भाव आश्चर्यमिश्रित धक्क्यापासून कुतूहलमिश्रित ’आता करु तरी काय’ पर्यंत तीन सेकंदात बदलले.

पण तिनं वेळ न दवडता आपल्या छोट्याश्या बॅगमधून अगदी छोटासा कॅमेरा काढला आणि पटकन कमलाचे दोन-चार फोटो काढले. कमला जातिवंत अदाकारा त्यामुळे शेवटच्या फोटोला तिनं (म्हणजेच त्यानं) ठेवणीतलं हास्य टाळी मारतानाच्या पोजबरोबर दिलं. विदेशी ललना एकदम खुष!

सिग्नल सुटायची वेळ झाली होती त्यामुळं प्रकरण इथेच संपेल असं वाटतानाच कमलानं पदराखालून मोबाईल काढला आणि मोबाईलवरच्या कॅमेऱ्यावर त्या दोघांचे दोन-तीन फोटो काढले!

आपला dude एकदम चूप. आणि विदेशी पाहुणी आत्ता नक्की काय झालं याचा अदमास लावण्यात गुंतली. एवढ्यात सिग्नल सुटला आणि कमला मोबाईलवर बोलत क्रॉस करून निघून गेली.

बाईक वेगात पुढे जात होती पण विदेशी सुंदरी काही मागे वळून पहायची थांबत नव्हती.

India is shining boss!