हिंदीतल्या "होली है" चं हे शब्दश: रुपांतर! भारतातील बहुतांश भाषिकांमध्ये साजरा केला जाणारा हा उत्सव. सदभावनेने तिमिरावर मिळवलेल्या विजयाचा हा जल्लोष. आपल्या दुर्गुणांची राखरांगोळी करून फ़िनिक्सप्रमाणे नवीन भरारी घेण्याची एक संधी. कोण्या एका होलिकेला अग्निपासून अभय असतानाही प्रल्हादाला जीवे मारण्याच्या प्रयत्नात तिचीच होळी झाली, या प्रसंगाची आठवण. राजकारण, मुत्सद्दीपणा या गोष्टींचा वारसा आपल्याला पुराणकाळापासूनच लाभलाय!
पण आपणा भारतीयांना घरची मुर्गी नेहमीच दाल बराबर. ढाक्याची मलमल रोमन सम्राट वापरायचे असे समजले की आम्ही खादी ग्रामोद्योगमध्ये चक्कर मारणार. इंग्लंडच्या राणीसाहेब हिवाळ्यात भारतीय सौंदर्यप्रसाधने वापरतात अशी कुणकुण लागली की इथे हर्बल प्रोडक्ट्सचा खप वाढणार. असो. तर आज होळी आहे. आपले पूर्वज म्हणे होळी पेटवताना असणाऱ्या वातावरणाचे, वाऱ्याच्या गती आणि दिशेचे अनुमान घेउन त्या वर्षाच्या हवामानाचे, पीकपाण्याचे अंदाज बांधत. हीच पद्धत जर अशीच विकसित केली असती तर मला वाटते की आपण या वर्षी कोणत्या दिशेने परकीय चलनाची आयात जास्त होईल, कोणत्या दिशेने भारतीयांची निर्यात सर्वात जास्त होईल असे आडाखे होळीच्या दिवशीच बांधू शकलो असतो! या शक्यतेची साधी आवई जरी उठली तरी अर्धे गर्भश्रीमंत-अमेरिकन-गुंतवणूकदार युरोपियन रिसर्च कंपन्यांमध्ये पैसे लावतील, "प्रोजेक्ट होळी" यशस्वी करण्यासाठी! आणि तेही प्रोजेक्टवर भारतीय मंडळी रिक्रुट करून!!
आठवणीत रमणारी जुनी मंडळी त्यांच्या सोशल लाइफ़चा भाग असणाऱ्या या उत्सवाच्या गोष्टी ’होळीच्या कथा रम्या’ च्या तालीवर सांगतात. सण साजरा करण्यामागे उदात्त भावना असली तरी तो साजरा करण्यासाठी ’****च्या बैलाचा ढोल’ च्या चालीवर पंचक्रोशीतील ’प्रसिद्ध’ व्यक्तिंचा उद्धार करण्यामागची भावना आजच्या हायटेक पिढीला समजणे कठीण आहे. शिवाय ढोल हा बैलाचा वाजविल्यामुळे ऍनिमल राइट्सवाले तुमची मानगूट धरायला येतील ते वेगळेच! त्याकाळी आजच्यासारखे ब्लॉग नसल्यामुळे भावनांना मुक्त वाट करून देण्यासाठी होळीचा सण ही एक सुवर्णसंधी असावी. आणि आम्हा आजकालच्या मंडळींनाही होळीच्या नव्हे तर ऑफ़िसमध्ये नानाविध प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने रोजच याच्या-त्याच्या नावाने बोंबाबोंब करायची सवय असतेच. काळ बदलतो पण काही गोष्टी बदलत्या स्वरुपातही कायमच राहतात. पूर्वी केवळ दिवाळीत तयार होणारे फ़राळ आजकाल वर्षभर मुबलक उपलब्ध असतात, हासुद्धा त्यातलाच एक प्रकार. तेव्हा आता ’होळी आणि आधुनिक तंत्रज्ञानतील मानसिकता’ किंवा ’होळीची प्रक्रिया आणि परकीय चलन व बुद्धिनिष्ठ मानवनिर्यात यांच्यातील परस्परसंबंध’ असे विषय पीएचडीसाठी निवडता येण्यास काही हरकत नसावी.
शिवाय होळीनंतर येते ती रंगपंचमी! घाई ही मुंबईकरांच्या मागे सदाचीच लागलेली, त्यामुळे असेल किंवा उत्तर भारतीयांच्या अखंड भरतीमुळे झालेल्या प्रभावामुळे असेल, आम्ही धुळवडीच्या दिवशीच रंगात चिंब होऊन मोकळे. मुंबईतल्या बॉलीवूडची होळी हा एक सगळ्यांच्याच आवडीचा विषय. त्यामुळे अधिकाधिक फ़िल्मी पद्धतीने होळी खेळणे आजकाल अपरिहार्य होत चालले आहे. त्यामुळे मग आता ’होली आयी रे कन्हाई’ किंवा ’आया होली का त्यौहार...., तू है नार नखरेदार मतवाली रे’ कोणाला आठवणार? तेव्हा आम्ही आपले ’रंग बरसे, भीगे चुनरवाली’ म्हणून रंग उडवणार. इंजिनीअरिंगला असताना अशाच एका होळीला चुकून खाल्लेल्या भांगेपायी झालेली एका मित्राची ’अवस्था’ आठवली की हसताना आजही पोटात कळ येते. भांग ही एक जादुई चीज आहे आणि भल्याभल्या सत्पुरुषांचे ती क्षणार्धात माकड करून टाकते या गोष्टीवर तेव्हा जो विश्वास बसला तो आजतागायत.
आजवर बऱ्याच होळ्या खेळून झाल्या. पण आयुष्यात एकदा वृंदावनात जाऊन होळी अनुभवण्याची आस आहे. तिथे म्हणे कुठल्याशा फ़ुलापासून तयार केलेल्या रंगाने होळी खेळतात. सावळ्या मुरारीच्या रंगात भिजलेल्या त्या फ़ुलांपासून भागवती भगवा रंग निघाला नसता तरच नवल. आयुष्यात प्रत्येकाला अशा रंगात भिजण्याची संधी मिळते आणि मग आजवर कधी न देखिलेले रंग खुणावू लागतात, कधी न ऎकिलेल्या अनवट सुरवटी साद घालतात आणि आपला पुनर्जन्म झाला आहे असे वाटू लागते. अगदी स्वत:च्याच राखेतून उठणाऱ्या फ़िनिक्ससारखे. एकाच या जन्मी जणू फ़िरूनी नवे जन्मण्याचे हे काय गौडबंगाल असावे बरे?
Sunday, March 4, 2007
Subscribe to:
Posts (Atom)