Tuesday, October 9, 2007

एक रम्य संध्याकाळ

प्रसंग: जरा वाचायचा धीर तरी धरा!
ठिकाण: ते तितकेसे महत्त्वाचे नाही.
वेळ: दिवसभर काम करून वैतागल्यावर शेवटच्या मिटींगच्या आधीची वीस मिनिटे.
पात्रे: मी, ती (माझी मराठी सहकारी) आणि ते (माझे दोन डच सहकारी)
उपपात्रे: आणखी एक ती (ही तैवानची आणि असून नसून सारखीच, म्हणून उपपात्र!)

तर आता सुरुवात करु..

मी: ह्या फ़िरंगांच्या धाटणीचे इंग्रजी बोलून मला अगदी वैताग आला आहे.
ती: ठीक आहे, मग आता मिटींग सुरु व्हायच्या आधीची वीस मिनिटे आपण फक्त मराठीत बोलू.
मी: मजा येईल, शिवाय या तिघांना काहीही समजणार नाही.
ती: माझा मूळ उद्देश तोच आहे. इथे परदेशात बरेच दिवसात मला ’बिचिंग’ करायला मिळाले नाही.
पहिला तो (अर्थातच इंग्रजीतून): ’बिचिंग’? तुम्ही दोघे आमच्याबद्दल काय बोलत आहात याचा अंदाज आम्हाला आला आहे असे मी म्हणू का?
ती (इंग्रजीतून): तू फार संशयी आहेस. आम्ही तुमच्याबद्दलच बोलत आहोत असे तुला का वाटते?
दुसरा तो: .......
ती: तर आता आपण या दोन माकडांबद्दल हवे तसे बोलू शकतो.
मी: एकदम धमाल! माझ्यापेक्षा दोन इंच उंच आहे त्याला आपण मोठा माकड आणि एक इंच बुटका आहे त्याला छोटा माकड म्हणू, म्हणजे त्यांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणे सोपे जाईल!
ती: काल तू पाहिलेस का, मोठा माकड हिरव्या रंगाचे मोजे घालून आला होता, तेही घाणेरड्या राखाडी रंगाच्या सूटवर! माणसाची पोषाख करण्याची आवड किती वाईट असू शकते...
मी: आणि काल संध्याकाळी छोटा माकड काळ्या चौकडीचा पांढरा शर्ट आणि अर्धी चड्डी घालून आमच्याबरोबर फिरायला आला होता. जेलमधून पळालेला कैदी वाटत होता. लोक माझ्याकडेही बघायला लागले नंतर, जणू काही तुरुंग फोडून त्याला बाहेर काढण्यात माझाही हात होता.
मोठा माकड (इंग्रजीतून): हे असं नाही करायचं. आपण सगळे इंग्रजीतूनच का बोलू नये, सगळ्यांनाच गप्पा मारता येतील.
ती (इंग्रजीतून): तुम्ही डचमध्ये बोलायच्या आधी आमची परवानगी घेता का? आणि आम्ही कित्येक दिवसांनी आमच्या भाषेत बोलतोय, मला वाटतंय की आम्ही तुझ्याबद्दल बोलतोय हीच शंका तुला जास्त आहे!
दुसरी ती: (तैवानी चायनीजमधून) अय्याऽऽ (म्हणजे मला काही तैवानीज चायनीज समजतं अशातला भाग नाही पण ती जे काही चित्कारली ते मराठी अय्याच्याच जवळचं होतं!) (आणि मग इंग्रजीतून) तुम्ही बोलताय ते कित्ती छान वाटतं आहे. यांना बोलू दे रे त्यांच्या भाषेतून, ऐकायला किती गोड आहे!
मी: घ्या, म्हणजे आपण हीला नावं ठेवायची आणि ही त्याला गोड म्हणणार, ये कहाका इंसाफ है?
ती: अरे, एव्हढं मनावर घेऊ नकोस. तू तिला इंग्रजीतूनही शिव्या घातल्यास तरी तिला समजायला चार दिवस तरी जातील.
मी: खरंच! हीचं नाव खरंतर महामंदा असायला हवं. आतापण बघ, दात काढून हसते आहे. कधी अक्कल येणार काय ते त्या चायनीज भगवंतासच ठाउक.
ती: जाऊ दे रे, असतात अशी काही मंडळी. त्यांना समजून घ्या, त्यांना आपलं म्हणा.
मी: समजून काय घ्या कपाळ, साधं गणितही येत नाही. रेव्हेन्यू रिपोर्टिंग बनवायच्या मीटिंगमध्ये पाच अधिक अकरा करायला हिला कॅल्कुलेटर लागतो, कसले मार्केटिंग करणार आहे ही कोण जाणे. आणि हिला आपलं म्हणणारा आंधळा-बहिरा किंवा निदान समाजसेवक तरी हवा, रंजल्या-गांजलेल्यांना मदत करणारा.
ती: अरे, मलाही दाट संशय आहे, हिला दिवाळखोरीच्या मार्केटिंगसाठी आणले असावे. आधीच कंपनीकडे पैसा थोडा जास्त झालाय.
मी: मग गोरगरिबात वाटा म्हणावं थोडा. या दोन माकडांनाही द्या थोडा. निदान अंगभर कपडे घेण्यापुरते तरी. अर्ध्या चड्ड्या आणि बनियनवर आयुष्य काढतात बिचारे. आणि तेही खराब होऊन नविन घ्यावे लागू नयेत असा प्रयत्न असतो यांचा बहुतेक.
छोटा माकड: .........
ती: नाहितर काय, समुद्रावर गेलं तर की आधी कपडे काढायची घाई यांना, फक्त बायांनाच नाही तर बाप्यांनासुद्धा. समुद्र दिसला की कपडे काढा एव्हढंच माहित यांना.
मी: नाहितर काय. इथे परदेशात ठीक आहे पण उद्या दादर चौपाटीवर घेऊन गेलो तरी तेच करतील आणि मग सगळे संस्कृती रक्षक माझ्या घरी मोर्चा घेऊन येतील.
ती: जर कधी खरंच घेऊन गेलास यांना दादर चौपाटीवर तर आधी महिनाभर त्यांची मानसिक तयारी करुन घे, की समुद्र दिसला की कपडे काढायचेच असतात असे काही नाही.
मी: हम्म्म.. नाहीतर ’मुंबई बंद’चा मुहुर्तच धरला पाहिजे. तरी बरं, तुझ्या पुण्यात समुद्र नाही.
मोठा माकड (इंग्रजीतून): आता फार झालं. तुम्ही थोडं आम्हालाही समजेल असं बोलाल का?
मी: आता का कुठला न्याय? हे जेव्हा डच बोलतात तेव्हा आपण त्याचा अर्थ लावू शकतो हा काय आपला दोष आहे का?
ती: दुर्लक्ष कर. आणि पुण्यात समुद्र नसला तरी रिक्षा आहेत. ब्रॅंगेलिनाला रिक्षात फिरताना पाहिल्यापासून छोटा माकड माझ्या मागेच लागला आहे की मलापण रिक्षातून फिरव म्हणून. आता हे काय त्याचं वय आहे असले हटट करायचं?
मी: काही भरवसा नाही यांचा, कधीही वेडसर चाळे सुरु करतात. आता संध्याकाळी साडेसहा वाजता कोणता सूज्ञ माणूस काळ्या काचेचा चष्मा घालून खोलीच्या मधोमध सूट घातलेला असतानाही मांडी घालून बसेल? कठीण आहे या छोट्या माकडाचं!
दुसरी ती (इंग्रजीतून): (परत एकदा) अय्याऽऽ मला कित्ती मज्जा येत आहे. मलापण शिकवा ना तुमची भाषा. मग मीपण तुमच्याशी अशा छान गप्पा मारेन!
ती: हिच्याशी गप्पा मारायची वेळच येऊ नये म्हणून आपण मराठीत बोलतो आहोत हे या भवानीला कधी कळणार?
मोठा माकड (इंग्रजीतून): आता फार झालं..
ती (इंग्रजीतून): हे तू गेल्या वीस मिनिटात बावीस वेळा तरी म्हणाला असशील..
मोठा माकड (इंग्रजीतून): आणि तरीही तुला काही वाटत नाही? हे तर फारच झालं!
मी: आपण गेल्या पंधरा-वीस मिनिटात जेव्हढं हसलोय ते ऐकून आता हा मोठा माकड फक्त आजारी पडायचा शिल्लक आहे. (इंग्रजीतून) तेव्हा आता मीटिंगची वेळ झाली आहे म्हणून आपण आता सगळेजण निघू आणि काम लवकर संपेल अशी आशा करु.
छोटा माकड (इंग्रजीतून): मीटिंग कॅन्सल झाली, मला आत्ताच मेसेज आला!
ती: ह्या मुक्याला वाचा आली बघ.
मोठा माकड (इंग्रजीतून): आता फार फार म्हणजे फारच झालं, मी अजून सहन करु शकत नाही.
मी: शेवटी मराठ्यांच्याच गळ्यात विजयश्रीची माला पडली, फ़िरंगांचा पराभव झाला! शिवाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव!!
दुसरी ती (कोणती भाषा ते तिलाही माहित नसावं): *॓(%ऽऽऽऽऽऽऽ (आणि मग इंग्रजीतून) ठरलं तर मग, मीपण तुमची भाषा शिकणार आता!

हे वाक्य ऐकून मोठ्या माकडाच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो आणि तो धावतपळतच बाहेर पडतो.

दुसरी ती मराठी शिकायचा निश्चय करते, छोटा माकड नक्की कोणाची बाजू घ्यावी या गहन विचारात बुडतो आणि आम्ही दोघे अति हसून पोटात दुखत असताना कोणते औषध घ्यावे याचा विचार करु लागतो!

विशेष सूचना : वरील प्रसंग सत्यघटनेवर आधारीत असून त्यातील पात्रे या भूमीतलावर अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे त्यातील परदेशी पात्रे मराठी शिकत आहेत असे तुमच्या कानावर असल्यास अस्मादिकांना अवश्य कळवावे. तोपर्यंत निदान विमा तरी उतरवून ठेवावा म्हणतो.