Saturday, January 5, 2008

प्लालकट़्टी पट़्टानी मसाला

वर जे काही लिहिलय ते मेन्यु कार्डमध्ये वाचलं आणि म्हणलं हीच ती डिश.

बाकीच्या चौघे अगदी ’घनिष्ठ’ मैत्र असले तरी त्यांच्यात मीच काय तो शुद्ध शाकाहारी. त्यामुळे या आंध्रा-केरळा मेन्युच्या हॉटेलात ते स्टार्टर्सही नॉनवेजच ऑर्डर करणार हे ओघाने आलेच. मग त्यांची कोंबडी आणि माश्यांची ऑर्डर देऊन झाली तरी वेटर आपला माझ्यापुढे उभाच. मी मनातल्या मनात ’दहा-वीस-तीस’ करून ही एकदम एक्झॉटिक नाव असणारी डिश निवडली.

डिशचे वर्णन तर सहीच होते. पनीर काय, कसले कसले मसाले काय, मग त्याचं अजून काय काय करतात वगैरे वगैरे. भरीस भर म्हणून बाकी सगळ्यांच्या ऑर्डर्स आल्या तरी अस्मादिकांच्या ’प्लालकट़्टी पट़्टानी मसाला’चा पत्ता नव्हता. मग सगळ्यांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आणि वेटर मटार-पनीर घेऊन आला!

टोटल पोपट.

आता मटार-पनीरला आंध्रात हे असले काहीतरी भयंकर नाव आहे हे मला काय माहित. बरं जर मटार आणि पनीर जर त्यातले मुख्य घटक असले तरी त्याचं काहीतरी वेगळं नाही का करायचं? चांगला डायरेक्टर मिळाला की शाहरुख खान पण क..क..किरण करीत नाही. मग नाव मारे मोठे असले तरी या हॉटेलातला कूक अगदीच बेचव असावा. आईकडे ट्रेनिंगसाठी पाठवला पाहिजे त्याला. नावडत्या भाज्या एक्झॉटिक करून आमच्या गळी कशा उतरवायच्या यात तिचा हात धरणारे कोणी नाही.

असो.

तर नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा म्हणतात ते काही अगदीच खोटे नाही.

पुढच्या वेळी असल्या नविन ठिकाणी गेल्यावर ’दहा-वीस-तीस’ पेक्षा टॉस केलेला बरा का ’अडम-तडम तडतडबाजा’ जास्त इफ़ेक्टिव रिझल्ट देईल याचाच विचार करतो आहे सध्या.

Tuesday, January 1, 2008

२००८

पुन्हा एक नवे वर्ष

पुन्हा काही नवी स्वप्नं

तीच ती आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा

And the same old me!