Sunday, June 15, 2008

जाने कहा गये वो दिन...

पोस्टला अशी फिल्मी नावं दिली की वाचणाऱ्यांच्या अपेक्षा एकदम वाढतात. पोस्ट क्लासिक असण्याची शक्यता शून्य असली तरी निदान ते एखाद्या ’क्लासिक’वर असेल अशी आशा असते. ही आशाही फोल ठरेल हे मी आधीच सांगतो. नंतर मग वाचकांच्या पत्रांची (कमेंट्सची!) मारामारी नको. खरंतर वीकेंड संपत आला आहे आणि दोन दिवस पूर्ण वाया घालवल्यावर जे एक चमत्कारिक नैराश्य येतं त्यामुळे असेल.. किंवा शून्यातून नाविन्य निर्माण करणारे न्यूज चॅनेल्स जरा जास्त बघितल्यामुळेही असेल.. पण हे पोस्ट लिहिणं हा वेळेचा निव्वळ अपव्यय आहे. आणि तुम्ही अजूनही वाचत असाल तर तुमच्या हिंमतीची दाद देतो आणि तुमचा वेळही नक्की वाया जाईल याचीही खात्री देतो!

तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे उशीरा उठलो. आता रविवारी सकाळी जाग आल्यावर किमान अर्धा तास तरी बिछान्यात लोळत पडणे क्रमप्राप्त असते. आणि नेमकी याच वेळेस ’recent times’मध्ये केलेल्या पापांची उजळणी मनातल्या मनात सुरु होते. गेले दोन-तीन महिने मी नक्की काय-काय केलं हे आठवतही नाहिये. म्हणजे सकाळी उठलो, दात घासले, आंघोळ केली वगैरे वगैरे झालंच. पण वर्षाच्या सुरुवातीला चुकून एक यादी बनवली होती, ती आठवली आणि स्वत:चाच राग आला. अर्थातच त्या यादीतल्या अनेक गोष्टींचा पत्ता नाहिये आणि त्याला बऱ्याच अंशी माझा बॉस जबाबदार आहे.

आता यात बॉसचा काय संबंध असला illogical प्रश्न विचारू नका. कारण उद्या तुर्कस्थानात एखाद्या अमेरिकन प्रवाशाला बनावट चायनीज वस्तू विकताना बिहारी भैय्या गजाआड गेला तर त्या घटनेशीही बॉसचा संबंध लावता येऊ शकतो! मग माझे गेले दोन-तीन महिने, तेराव्या शतकात आफ्रिकेतून विकत घेतलेल्या गुलामांची डचांनी पिळवणूक करावी, तशी अवस्था करणारा माझा बॉस... जरा अति होतंय..

पण आईशप्पथ, ह्या काळात असे काही अनुभव घेतले की मझा आ गया! वाटलं आयुष्य आयुष्य म्हणतात ते हेच. पराकोटीचा गोंधळ, उच्च्वर्गियांच्या (upper management) अपेक्षा, कामचुकार सहकारी, कामं उरकताना होणारी दमछाक, औत्सौर्चे केलेलं काम पूर्ण करून घेताना ’ही मंडळी वन टू का फोर’ का करतात असे पडणारे प्रश्न, न मागता मिळालेले आणि तितकेच बिन-उपयोगी सल्ले... यादी न संपणारी आहे. पण याबरोबरच न चुकलेल्या डेड्लाईनचा आनंद, ऐनवेळी सहकारी-मित्राने केलेली मदत, वरवर खडूस भासणऱ्या डिपार्टामेंट हेडने आपणहून दिलेली मी केलेल्या कामाची पावती, काही नविन मित्र (की ज्यांच्यामुळे काम करताना तर मजा येतेच पण शीण आणणाऱ्या मंडळींचा त्रासही सुसह्य होतो!) यामुळे इथे आठ महिने कसे गेले कळलेही नाही. सध्या मी फक्त एव्हढंच म्हणतो आहे की,

Probation संपले, Confirmation जाहले।
Appraisal कधी होणार, देव जाणे॥

नव्या नोकरीत जीवतोड मेहनत करून बऱ्यापैकी काळ लोटला की केलेल्या कामाचे appreciation कसे होईल (किंवा होणार की नाही), future growth कशी मिळेल असे प्रश्न पडतातच. I hope you understand what I mean.

मग या सगळ्यातून जाताना ब्लॉगकडे बघायला वेळच मिळाला नाही. तसा मी काही नियमितपणे डायरी लिहिणाऱ्यातला नाही. डायरी लिहिणं मला कायमच थोडं formal वाटायचं. कोणाला शिव्या घालायच्या असतील किंवा मनातली मळमळ बाहेर काढायची असेल, तर ते हाताने लिहून काढणं हे आणखी एक पाप केल्यासारखं. पण computer वर सगळी पापं माफ. शिवाय पोट साफ झाल्यावर मन कसं फुलपाखरासारखं हलकं होतं तसंच feeling येतं.

काही गोष्टींवर खरंच लिहायचं आहे तर काही पोस्ट्स अर्धवट लिहून पडले आहेत. शिवाय बॉसकडून गुलामांची पिळवणूक हा साथीचा रोग जगभर पसरला असावा कारण मी ज्यांचे ब्लॉग्स नेहमी वाचतो त्यांनीही बरेच दिवसात काहीच लिहिलेलं दिसत नाही. सगळ्यांनाच आणि एकाच वेळी नवसाहित्यनिर्मितीचा उबग येणं शक्य नाही. म्हणजे पुन्हा, ’तेराव्या शतकात आफ्रिकेतून विकत घेतलेल्या गुलामांप्रमाणे.....’. आणि असं जर काही नसेल, तर मंडळी पुढचं पोस्ट कधी टाकताय?

3 comments:

rayshma said...

didn't u miss me nagging u to write a new post? :) or for that matter, me nagging u to get married?! lol!!
good to see u back!

TheKing said...

Sure I did! And good to see you coming back with a bang!!

SandeepaChetan said...

Punaragmanabaddal abhindandan! Diwas kase jatat kalat nahi. (vegala aartha kadhu naye). Mala vatata gappa basun padrat padnyache diwas gelet tevha bhindast HR kadhe dhav ghetlis tar blog satkarni lagel :-)