क्ष एक नंबरचा कामचुकार आहे.
क्षशी पहिल्यांदा भेट झाली तेव्हा तो बऱ्यापैकी ठिकठाक वाटला होता. आम्ही एकाच टीममध्ये काम करणार असं ऐकताना माझाच उत्साह जरा जास्त होता.
मग कामाचं रुटीन सुरु झालं. हळूहळू माणसं, कामं आणि त्या माणसांच्या काम करायच्या पद्धती सगळं काही जवळून पहायला मिळालं. आणि तेव्हाच हा क्ष अगदी अंतर्बाह्य बघायला मिळाला.
दिवसाची सुरुवात केवळ पेपर वाचूनच करावी असं काही नसतं तर ती वेगवेगळ्या न्यूज-साईट्सवर व्हिडीओ पाहूनही करता येते असं त्याला वाटतं.
जीमेल, रेडिफ़्फ़ आणि याहू यांची निर्मिती देवाने दिवसभर माणसाला काहीतरी चालना मिळावी म्हणून केली आहे असं त्याला वाटतं. जरा विचार करून बघा, एकच मेल सर्विस दिवसातून शंभर वेळा चेक करायला किती कंटाळा येईल? पण तीन मेल सर्विस निर्माण करून देवाने विश्वनिर्मितीत कितीतरी वैविध्य आणले आहे.
व्हिडिओ पायरसी करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं त्याला वाटतं. आणि त्यासाठी ऑफिसची बॅंडविड्थ वापरणं म्हणजे पुण्यकर्म आहे असंही त्याला वाटतं!
चोरून डाउनलोड केलेले सिनेमे सगळ्यांना वाटणं आणि ऑफिसच्या डीव्हीडीजवर हे सिनेमे बर्न करून घरच्या डीव्हीडी प्लेयरवर पाहणं हेसुद्धा तितकच महत्त्वाचं आहे यात त्याला कोणतीही शंका नाही.
आपला सिनियर आपल्याच काहीच न करण्यानं वैतागतो आहे असं लक्षात आल्यावर काहीतरी थातूरमातूर डिटेल्स सांगून त्याच्या तोंडाला पानं पुसण्यात क्षचा हात कोणीही धरू शकत नाही.
आपण कंपनीत दुसऱ्यांपेक्षा थोडा जास्त वेळ आहोत याचा उपयोग नवीन मंडळींना करून देताना त्यांना साठ टक्के बिनचूक माहिती आणि चाळीस टक्के केवळ चुकीची माहिती देणं त्याला आपण न करत असलेल्या कामापेक्षाही जास्त महत्त्वाचं वाटतं.
देशविदेशात होणाऱ्या विविध परिषदा आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतो या दोन गोष्टींचा दूरान्वयेही संबंध नसला तरी त्यात उपस्थित राहता यावं म्हणून प्रयत्न करणं हा सेल्फ-इनिशिएटिव्ह्चा भाग आहे असं त्याला वाटतं.
कोण जॉब बदलणार आहे, कोणाला किती पगारवाढ मिळाली, कोण कोणत्या राजकारणात किती सक्रीय आहे, पाय खेचण्याच्या शर्यतीत ’अ’ने ’ब’ला नक्की काय केले तर ’ब ’चा पुरता बीमोड होईल, ’क’ला हैराण करण्याचे पंच्याऎशी प्रकार...असल्या कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्याचे एकच ठिकाण, क्ष!
फारसं काहीच न करता प्रचंड व्यस्त असल्याचा आव आणता येतो तुम्हाला? ’क्ष’ला जाऊन भेटा.
इतके सदगुण एकाच ठिकाणी साचलेली व्यक्ती या कलियुगात मिळणं तर कठीणच आहे.
मीच काय तो पामर, इतक्या दिवसात फारसं काही शिकू शकलो नाही.
आणि हो, चार दिवसांचं काम सहा महिन्यात पूर्ण न करून आपल्यावर असलेल्या कामाच्या ओझ्याची सांगोपांग चर्चा तुम्हाला करता येते? आता मात्र ’क्ष’शिवाय तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही.