Monday, September 29, 2008

पाच मिनिटांची अस्वस्थता

डेड्लाईन्स कोणत्याही प्रोजेक्टच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. आणि मी ज्या प्रोजेक्टबद्दल बोलतोय, तो मी कधीही विसरणार नाही.

त्याला कारणंही बरीच आहेत. प्रोजेक्ट सुरु झाला तेव्हा मला नविन ऑफिस जॉइन करून एक-दीड महिनाच झाला होता. एकूण कामाचं स्वरूप पाहता बरीच मेहनत करावी लागणार होती. ऑफिसमधील सगळी थोर मंडळी बऱ्याच मोठ्या रिझल्ट्सची अपेक्षा ठेवून होती. त्यातून मी नविन म्हणजे ही मंडळी दर थोड्या वेळानी मला मायक्रोस्कोपखाली घालायची. शिवाय ’इन-हाउस’ टीम नाही म्हणून हे काम बाहेरच्या एका कंपनीला आउट-सोर्स केलेलं. आणि त्यातच मोठा झोल झाला.

सुरुवातीचे काही दिवस मोठ्या उत्साहात काम झालं आणि ती ऐतिहासिक माशी शिंकली! ज्या कंपनीला काम आउट-सोर्स केलं होतं ती मंडळी पाट्या टाकताहेत हे एव्हाना लक्षात आलंच होतं, पण कामाचा दर्जा, वेग सगळ्याच बाबतीत त्यांनी असे काही रंग दाखवायला सुरुवात केली की मला घाम फुटला. प्रोजेक्ट मॅनेजर बहुतेक वेळा गायब असायचा, त्याची पोरं काम करायला तयार असायची पण त्यांची अवस्था सेनापती घायाळ झालेल्या सैन्यासारखी होती. एव्हीतेव्ही धावायचंच आहे तर वाट फुटेल तिथे धावायचं असं त्यांचं साधं लॉजिक.

नीलशी वेगवेगळ्या तऱ्हेने बोलायचा मी खूप प्रयत्न केला पण पठ्ठ्या तोंड उघडायला तयार नाही. त्याच्यावर असणारं टेंशन दिसत होतं पण तरीही सारं काही आलबेल आहे असं दाखवायचा त्याचा प्रयत्न होता. शेवटी एक दिवस माझाही कडेलोट झाला. मी त्याला फोन करून मजबूत शिव्या घतल्या. तोही काही मूर्ख नव्हता. मी काय बोलतोय हे त्याला समजत होतं. पण माझ्या आरडाओरड्याचा एकूण कामावर काही फारसा फरक पडला नाही.

मग मी संकल्पला धारेवर धरलं. हा नीलचा बॉस, सिनियर पार्टनर. त्याला केलेल्या काही कॉल्सवर तर मी अगदी ’दिल की भडास’ बाहेर काढली होती.... परिस्थिती फारच हाताबाहेर जायला लागली तेव्हा मी सरळ त्यांच्या टीमबरोबर डायरेक्ट काम करायला सुरुवात केली. येनकेन प्रकारेण प्रोजेक्ट उरकला पण त्यानंतर मी त्यांना एकही काम दिलं नाही. हे काम एप्रिलमध्ये संपलं आणि ही मंडळी ऑगस्टपर्यंत इनव्हॉइस पाठवायलाही विसरली होती. मी माझ्या कलीगला म्हणलंही होतं की केलेल्या कामाचा मोबदला मगणंही ज्यांच्या लक्षात रहात नाही त्यांच्याकडून professionally कोणतीच अपेक्षा करु नये..

मागच्या आठवड्यात शेवटचा इन्व्हॉइस क्लियर केला तेव्हा नीलबरोबर एक छोटी मीटिंग झाली. माझ्या कलीगशी बोलता बोलता तो सहज म्हणला की संकल्पची गाडी आता थोडी रूळावर येत आहे. माझ्या तोंडावरचं प्रश्नचिन्ह त्यानेही वाचलं असावं. मीटिंगनंतर मी माझ्या कलीगला रूळावरच्या गाडीचं रहस्य विचरलं. तो म्हणाला आपला प्रोजेक्ट सुरु झाला त्याच सुमारास संकल्पला मुलगा झाला आणि तो जन्मत:च मूकबधीर होता.. संकल्पसाठी हा अनपेक्षित धक्का त्याला almost depression मध्ये घेऊन गेला. याची परिणिती तो पूर्णपणे कामाबाहेर जाण्यात आणि त्यामुळे कामाची सगळी जबाबदारी त्याच्या नवशिक्या टीमवर येऊन पडली..

खोटं कशाला बोला पण त्या दोघांना त्या bad days मध्ये झापताना कुठेतरी मोठ्ठा तीर मारल्याचं समाधान मिळालं होतं, त्याची जागा एकदम एका विचित्र guilt नं घेतली..

मी इतका वाईट कसा वागू शकतो? काहीतरी चुकतंय हे दिसत असताना मी त्याचं खरं कारण शोधायचं सोडून आपलंच घोडं पुढे दामटत होतो.

माझ्या कलीगला ही गोष्ट माहीत होती. त्याने मला ती का सांगितली नाही मला नाही माहीत.

मी ज्याला कामचुकारपणा समजत होतो त्यामागे काही वेगळी कारणं होती. अर्थातच समजण्यासारखी.
आपण केलेली गोष्ट चूक होती हे सिद्ध झालं की ती guilt माझ्या मनात घर करून राहते. Professionally मी काही मोठी चूक नसेलही केली पण तरीही.. कुठेतरी ते सलत राहतं.

Anyway, मी याला पाच मिनिटांची अस्वस्थता म्हणतो. कारण त्यातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतरच नसतं.