नविन गाडी घेतल्यानंतरचा मानसिक प्रवास
पहिला महिना - नविन गाडी drive करायची तेव्हा नव्याची नवलाई तर असतेच पण त्याचबरोबर मनात थोडी धाकधूकही असते. नविन गाडीचं shine जसंच्या तसं राखणं हे म्हणजे परम कर्तव्य. गाडीवर एखादा ओरखडाही उठणं म्हणजे एकदम guilty feeling येतं.
सहावा महिना - ओरखडा वगैरे ठीक आहे, पण शक्यतो मोठा dent नसावा! अगदी वाईट दिसणारे बरेच ओरखडे झाले तर पुढच्या सर्व्हिसिंगला पेंट करून घेता येतं. पण अगदीच dent असला तर मग खरंच वाईट वाटतं. दुसऱ्याची चूक असली तरीही आपल्याला थोडी जास्त काळजी घेता आले असती ही बोचणी मनात राहते.
एका वर्षानंतर - गाडी आहे म्हणजे ओरखडे, dents हे व्हायचंच. पण शक्यतो accidents कसे टाळता येतील हे बघावं. पण ट्रॅफिक किती वाढली आहे आजकाल. बेभरवशाची लोकं कशाही गाड्या हाकणार. मग एखादा येऊन आदळलाच तुमच्यावर तर काय करणार तुम्ही? Damage किती आहे आणि ते कसं manage करता येईल हे पाहणं महत्त्वाचं!
लग्न झाल्यानंतर वेळ पाळतानाचा भावनिक प्रवास
पहिला महिना - आजतागायत ऑफिसमध्ये सहा वाजता फोन करून घरी किती वाजता येणार आहेस असं कोणी विचारला नव्हतं मला. पण कुठेतरी बाहेर जायचं ठरलं होतं. बरं झालं, आठवण करायला बायको आहे आता. वेळ पाळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं!
सहावा महिना - आता चार कामं एकदम करायची म्हणजे वेळ थोडीफार पुढेमागे व्हायचीच. ऑफिसमधून अगदी बाहेर पडताना एक छोटी मीटिंग ठरली तर काय करणार? होम मिनिस्ट्रीबरोबर बाहेर जायची वेळ ठरली असली तरीही थोडा उशीर सगळ्यांनाच माफ असतो. थोडीफार विशेष सत्कार्यं करून ब्राऊनी पॉईंट्स कमावता येतात. ठरवलेला प्लान थोडा पुढे गेला ही बोचणी राहते मनात पण मग पुढच्या वेळी उशीर कसा होणार नाही याची काळजी घेतली की झालं.
एका वर्षानंतर - आता सगळ्याच गोष्टी काय तुमच्या हातात असतात का? ऑफिसमध्ये उशीर होणं नेहमीच टाळता येईल असं नाही. परवा तर एक शाळेतला मित्र कितीतरी वर्षांनी भेटला वाटेत, मग गेला थोडा बोलण्यात वेळ. पण हो, अगदी crucial events वेळ चुकवून चालत नाहीत. नाहीतर मग जिवावर बेततं. वाढदिवस विसरणं हा तर जिवावर बेतणारा accident! आणि समजा तस काही झालंच तर damage control कसं manage करता येईल हे पाहणं महत्त्वाचं!
Saturday, July 4, 2009
Subscribe to:
Posts (Atom)