वांद्रे-वरळी पूलाचे घाटत होते तेव्हा मी शाळेत होतो. मी किती वयस्कर झालोय यापेक्षा ही गोष्ट फार फार वर्षांपूर्वीची आहे हे महत्त्वाचं!
तर गोष्ट सुरु झाली आणि सर्वांना मुंबईत उद्या सकाळपर्यंत गोल्डन गेट ब्रिज बांधून तयार होईल अशी स्वप्नं पडू लागली. आता आजतागायत भारत वर्षात असला execution speed कोणी पाहिला आहे का? अर्थातच सम्राट अशोक, मुघल सम्राट किंवा अगदी अलिकडचे शिवाजी महाराज अशांचे सन्माननीय अपवाद वगळता. शिवाजीमहाराजांना अलिकडचे म्हणायचा उद्देश एव्हढाच की आज-काल ज्या वेगाने सरकारी कामे होतात त्याने पुढच्या चारशे वर्षात ती नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास वाटतो.
तर सी-लिंकची कल्पना कोणा महाभागाने एका अशुभ वेळी मांडली आणि बांधकामातले सगळे अडथळे एकदम निर्माण झाले. माहिमच्या समुद्राची पातळी धोकादायकरित्या वाढेल येथपासून ते माहिमच्या खाडीतील मत्स्यजनांना वाईट वाटेल पर्यंत पुष्कळ वाद झाले. एव्हाना मी कॉलेजात जायला लागलो होतो. त्यामुळे आयत्याच फुटलेल्या शिंगांमुळे बहाल झालेली अक्कल पुरती धुंडाळूनही, सी-लिंक बांधायला लायक मंडळी अख्ख्या भारतात नाहित का असा प्रश्न मला पडायचा.
असो.
न बांधलेल्या पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि कधीतरी या पूलाचं काम खरंच सुरु झालं. मी चारशे वर्षांचा count-down केव्हाच सुरु केला होता पण महिन्याभरापूर्वी हा ब्रिज चक्क वाहतुकीसाठी खुला झालासुद्धा!
सोनियाबाई उद्घाटनाला आल्या आणि पवारांनी हलकेच पुडी सोडली, पूलाला नाव राजिव गांधींचं द्यायचं! सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
चोवीस तासही उलटले नव्हते बारसं होऊन तर कोणीतरी डरकाळी फोडली, पुलाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुनच ठेवायचं! आता झाली का पंचाईत. एका पुलाची दोन नावं कशी ठेवायची? वांद्र्याच्या बाजुला गांधी आणि वरळीकडच्या टोकाला सावरकर म्हणून प्रश्न सोडवता आला असता पण मग पुलाच्या मध्यात आंबेडकर का नकोत? फुले, सरदार पटेल, नेताजी बोस, रविंद्रनाथ टागोर, मदर तेरेसा, झाशीची राणी यांचं काय मग?
सगळ्यात मोठी गंमत म्हणजे, सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरणावरुन वाद होऊ नयेत म्हणून अशा ठिकाणांच्या नामकरणासच बंदी करणारा कायदा महानगरपालिकेनं कधीचाच केलाय. सगळे कायदे कोळून प्यायलेले आपले मान्यवर नेते हाच तेव्हढा कायदा विसरले होते काय?