Saturday, October 3, 2009

बावनकशी

काल पिक्चरला गेलो होतो. Actual पिक्चरबद्दल नंतर बोलू पण सुरुवात कशी झकास झाली त्याबद्दल आधी.

पिक्चरची सुरुवात राष्ट्रगीताने होते हे काही नव्याने सांगायची गरज नाही. पण राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याची सूचना झाली आणि सगळं ध्यान त्या काळ्या पडद्यावर एकवटते न एकवटते तोवर Black&Whiteच्या एका जबरदस्त शेडमध्ये साक्षात लता मंगेशकर पडद्यावर अवतरली. पांढरीशुभ्र साडी, कानात हिऱ्यांच्या कुड्या, गळ्यातल्या सोनेरी चेनवर मध्यात अडकवलेला छोटासा तिरंगा! एखाद्या ध्यानस्थ योगिनीच्या आविर्भावात तिने जन - गण - मन सुरु केले आणि जगातली सर्वात तेजस्वी तलवार सपकन हवेत फिरवल्यावर जशी तेजाची रेखा हवेत दिसावी तसे ते तिचे सूर दिसू लागले. तापल्या मुशीतून शुद्ध सोन्याची धार ओतावी तसे.

साक्षात स्वर्गीय.

पहिली ओळ संपली आणि अस्सल मातीच्या दाणेदार सुरात गीत पुढे सुरु राहिले. आशा भोसले! प्रश्नच नाही.

राष्ट्रगीत पूर्ण म्हणून होईपर्यंत ह्या दोघी बहिणींनी जी करामत केली तिला तोड नाही.

ह्या दोघी गात असताना त्यांना पडद्यावर दाखवा किंवा दाखवू नका, पडद्यावर मधुबाला, माधुरी दिक्षित, वहिदा रेहमान, रेखा, हेमामालिनी अशा सुंदऱ्या असू द्यात किंवा नसू द्यात. ह्या बहिणी जेव्हा गातात तेव्हा त्यांचे सूर नुसते ऐकूच येत नाहित तर दिसतातही!

जय हे! जय हे!

जय जय जय जय हे!