तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट!
सोमवार किंवा मंगळवारची सकाळ असेल. आठवड्याची सुरुवात म्हणजे प्रत्येक सकाळ आम्हास युद्धप्रसंग. मी एका start-up मध्ये काम करत होतो. काय दिवस होते ते म्हाराजा! आठवड्याची सुरुवात चार-पाच ठिकाणी लागलेल्या आगी विझवून व्हायची. आमचा बॉसही वेडा होता. टीममधल्या पोरांनी घातलेले गोंधळ तर निस्तरायचेच पण वेड्या बॉसलाही ताळ्यावर आणायचं. मग अशात कोणी मोबाईलवर फोन करून वेळ वाया घालवायला सुरुवात केली की तळपायाचीच नाही तर आजूबाजूचीही आग मस्तकात जायची.
आणि अशाच एका सोमवारी-मंगळवारी मी बॉसला माझा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करीत होतो की हे एकविसावे शतक असले तरीही माणसाने दैनंदिन जीवनात जादूची अपेक्षा करु नये आणि तेव्हढ्यात माझा फोन वाजला. क्षणभर तरी त्या नमुन्यापासून सुटका होईल म्हणून मी तो फोन घेतला.
’सर मी अमूक अमूक कंपनीतर्फे तमूक तमूक बोलते आहे, तुमची दोन मिनिटे घेऊ का?’
कंपनीचं नाव नवीन वाटलं, ’कशासंदर्भात बोलायचं आहे तुम्हाला?’
’सर, आमच्या कंपनीने %ऽ* अशी एक कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि तुम्ही याच संदर्भातील काम करता म्हणून...’
स्वत:च्या खिशातले पैसे मोजून लोकांनी क्षुल्लक ज्ञान घ्यायला यावं अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांबद्दल मला फार ममत्त्व नाही, ’मी आत्ता फारच busy आहे आणि नाही बोलू शकत तुमच्याशी.’
असले फोन विसरून जायचे असतात पण त्या बयेनं चार वाजता पुन्हा फोन केला. मी चारच्या प्रथेप्रमणे खास मित्रांबरोबर दहा मिनिटांचा कॉफीपानाचा ब्रेक घेत होतो, ’कोण बोलतंय?’
’सर, मी तुम्हाला सकाळी फोन केला होता? आमची कॉन्फरन्स.. बरोबर पंधरा दिवसांनी आहे.. नामांकित वक्ते...’
बया सुरुच झाली एकदम, ’बरं असं करा ॓ऽ%ऽ हा माझा इमेल आयडी आहे. मला कॉन्फरन्सचे details मेल करा, ते पाहून मी पुढे ठरवेन.’
सहसा अशी सापत्न वागणूक मिळाल्यावर हे मार्केटिंगवाले नाद सोडून देतात. त्यामुळे मीसुद्धा हा प्रसंग लक्षात ठेवायचं काही कारण नव्हतं. पण बया चिकाटीची निघाली. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन.
’सर, मी अमूक अमूक कंपनीकडून तमूक तमूक. मेल मिळाला का तुम्हाला माझा?’
कोणी आपल्याला कारण नसताना उगाचच भाव दिला की आपला तोरा वाढतोच, ’ओह.. मेल केला का तुम्ही? मी मिस केला बहुतेक.’ आता नालायकपणा करायचाच म्हणला की कितीही करता येतो!
’It's okay पण तुम्ही चेक करता का? माझ्या %ऽ*! या आयडीवरून तुम्हाला मेल आला असेल.’
मेल खरंच येऊन पडला होता. त्या कॉन्फरन्सला जाण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. पण आता उगाच तोंडावर नाही कशाला म्हणा, ’बरं मी असं करतो, सगळी माहिती नीट वाचतो आणि मग तुम्हाला कळवतो.'
चौथ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन!
’सर, आपण माहिती सगळी पाहिली असेलच. कित्ती छान अमुची कॉन्फरन्स.. नामांकित वक्ते.. netvorking ची संधी...’
जरा जास्त होत होतं. पण ती माझ्या आगाउपणावर जराही न भडकता इतक्या विनम्रतेने बोलत होती की मला प्रश्न पडला की आत हिला कटवायची कशी?, ’Actually याच तारखांना माझ्या दुसऱ्या काही मीटिंग्स ठरलेल्या आहेत. जर त्यात काही बदल झाला तर मी नक्की विचार करेन.’
खरंतर स्पष्ट नाहीच म्हणायला हवं होतं पण उगाच भाव मिळतोय म्हणून जादा नखरे कशाला करा म्हणून मी तो विषय तिथेच सोडून दिला.
एक दिवस सोडून पुन्हा एकदा फोन!
’सर, मी तमूक तमूक!’
आता मात्र कमाल झाली. चार वेळा बोलणं झाल्यावर नुसत्या नावावरून न ओळखण्याइतपत काही माझं वय झालेलं नव्हतं. पण आगाऊपणा मी नाही ती करत होती, ’तुम्ही प्रत्येक invitee बरोबर इतका follow-up करता?’ मी सरळ मुद्द्यालाच हात घातला.
’पण सर, कॉन्फरन्स अमुची कित्ती छान...’
’मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी कळवेन म्हणून, तुम्ही कशाला एव्हढा follow-up...’
’सर, सॉरी जर तुम्हाला त्रास झाला असेल तर. माझा तो उद्देश नव्हताच. पण तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगायची होती.’
देवा.. आता हिची नवी गोष्ट सुरु होणार?, ’हे बघा..’
’सर, मी पहिल्या दिवशी तुमच्याशी बोलले तेव्हा मला तुमचा आवाज अतिशय आवडला. म्हणून मी थोडा जास्त follow-up केला. तुमचा आवाज खरंच खूप छान आहे.’
मी गार! कसंतरी बावळटासारखं, ’ओह थँक्स’ म्हणालो आणि फोन ठेवला.
मित्रमंडळींमध्ये काही दिवस हा प्रसंग अर्थातच चेष्टेसाठी पुरला.
आणि आत्ता हा प्रसंग आठवायचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी दिल्लीला एका क्लायेंट मीटिंगसाठी गेलो होतो. क्लायेंटच्या कोरियन टीममधूनही काही मंडळी आलेली होती या मीटिंगसाठी. तासाभराची मीटिंग तीन तास चालली आणि पुष्कळ वादविवाद घालून आणि एकमेकाची उणीदुणी काढून झाली होती. मीटिंग कधी एकदा संपते याचीच सगळे वाट पाहत होते बहुतेक.
मग finally निरोपाचा hand-shake करताना डोळे मिचकावून तो मुख्य कोरियन मला म्हणाला, ’I am not gay but I really loved your voice!’
मी गार, अजून दोघे टाळ्या वाजवू लागले, तिसऱ्याने ठेवणीतले हसू चेहऱ्यावर आणले आणि चौथा डोळे विस्फारून पाहत होता.
मी पुन्हा एकदा बावळटासारखं थॅंक्स म्हणून बाहेर पडलो!
Sunday, February 27, 2011
Subscribe to:
Posts (Atom)