बाकी हा प्रकार मोठा झकास आहे. सायबरविश्वात माझे विचार मराठीतून मांडणे ही संकल्पना टिळकांनी इंग्रज राज्यकर्त्यांच्या नाकावर टिच्चून जहाल अग्रलेख लिहीण्याएवढीच क्रांतिकारी आहे. शिवाय आजकालच्या दैनंदिन घडामोडी इतक्या इंग्रजाळलेल्या असतात की साधी चार वाक्ये मराठीतून लिहीताना आठ इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय शोधण्याची मेहनत करावी लागते. पण शेवटी हे सगळे मनाचेच खेळ झाले. लेख लिहीताना चार वाक्ये तरी मराठीतून लिहीता येतील की नाही हा विचार करेपर्यन्त पाचव्या वाक्याची प्रगती काही वाईट नाही. मातृभाषा या शब्दाच्या खोलीचा मी आज नव्याने अनुभव घेतो आहे. सहज स्फ़ुरते ती, मनात विचारप्रक्रिया ज्या भाषेतून चालते ती आणि सर्वात सोपे म्हणजे अपार वेदनेच्या क्षणी ज्या भाषेतून आपल्या भावना व्यक्त होतात ती आपली मातृभाषा!
थोडक्यात काय की भर दिवसा डोळ्यांसमोर तारे चमकले की अजूनही मला आईच आठवते. माझ्या व्यक्तिमत्त्वातील मायमराठीच्या अस्तित्त्वाचा याहून अधिक पुरावा कोणता असणार? आणि मला सांगा, "सायंकाळी गोधन गोठयात परतले", "पुरणपोळीवर तुपाची धार सोडली", "त्या कालचा पोर असलेल्या मावळ्याने विजयश्री खेचून आणली", "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी" व "गणपती बाप्पा मोरया" या भावना मराठीखेरीज कोणत्या भाषेतून मांडता येतील? अगदी आपली संतमंडळीही म्हणून गेली, "संस्कृत जर देवे केली, मग प्राकृत काय चोरे केली?" आपली कुवत भले तेवढी नसली, तरी निदान स्वत:च्या भावना मायबोलीतून व्यक्त करताना परभाषेच्या कुबड्यांचा आधार न लागणे हे ही नसे थोडके!
शुद्ध मराठीतून बोलता येणे ही "घटना" आजच्या युगात नैसर्गिक असण्यापेक्षा आश्चर्यजनक, खेदमिश्रित, "कोठून आली ही ब्याद?" अशा विविध नजरेतून पाहिली जाते. माझा एक आत्येभाऊ किती वाजले हे मराठीतून उत्तरतानाच गडबडतो मग ’सव्वा-अकरा रुपयांची दक्षिणा’, ’बारा गावचे पाणी प्यायलेला बहाद्दर’ अशा संकल्पना साहजिकच त्याच्या आकलनापलिकडे असतात. एव्ह्ढेच कशाला जेमतेम दोन आठवड्यांसाठी परदेशी (आता श्रीलंका म्हणजेसुद्धा परदेशच बरं का!) जाऊन आलेली मंडळीसुद्धा ’आजकाल मराठी शब्द आठवणे जिकिरीचे झाले आहे’ याची कारणमीमांसा पुरवतात, तेव्हा मात्र तेव्हढेच थोडे हसून घ्यावे अशी अवस्था होते. आणि याच्या अगदी उलट अनुभव आला एका मित्राच्या काकूला भेटताना. तिचे अस्खलित मराठी ऎकल्यावर, ही बाई गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ अमेरिकेत वास्तव्य करुन आहे यावर विश्वास बसणे कठीण होते.
शेवटी सगळे आपल्याच मनाचे खेळ असतात. आपण एखादी गोष्ट किती स्वीकारतो ही त्यातली खरी गोम असते. या सायबरविश्वातील मराठी भाषिकांची मुसाफ़िरी दिलासा देणारी नव्हे तर आल्हददायक वाटते. सवयीचे घर धुंडाळताना अचानक जुन्या आठवणी हाती लागाव्यात तसेच काहीसे माझे हे मराठी ब्लॉग झाले. काही मंडळींचे ब्लॉग तर ’अरे हा किती दिवसांनी भेटला, ही इतके दिवस होती कुठे?’ असा अनुभव देऊन गेले. यथावकाश सर्वांबरोबर ऒळखी होतीलच पण त्यात केवळ औपचारिकता राहू नये आणि स्नेह वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा.
तेव्हा मंडळी, इतुके दिवस आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतात, तो ब्लॉग आता साक्षात अवतरला आहे. (उन्मळून हसणे, या भावनेचा साक्षात्कार अशाच समयी होत असतो!) आपली भेट होतच राहील. पण त्यातून मराठीची शुद्धता तपासण्यऎवजी (भगवंता, मला निदान चार ओळी न चुकता खरडण्याचे बळ दे!) संवाद साधण्याची इच्छा पूर्ण होवो.
आणि सरतेशेवटी, कॅलिफ़ोर्नियाच्या गव्हर्नरसाहेबांना स्मरून म्हणतो, I will be back!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
वा!
सुरुवात तर झकास आहे :)
नक्कीच! लिहीत रहा.. अगदी दिसामाजी नाही जरी जमले तरी अठवड्यामाजी तरी.. बऱ्याचदा काय लिहावे आणि काय लिहू नये याची कोडी सतावतात, पण जमेल हळूहळू.
शुभेच्छा! :-)
वा! सुरूवात झोकात आहे. पुढील लेखनाला शुभेच्छा!!
ता.क. आपल्या कॅलिफोर्नियाचे गवर्नर "आय आम बाक" (I am back!) असे म्हणतात. पाहा हे इंग्रजीतून सांगणे किती कठीण होते परंतु मराठीतून उच्चारासकट पटकन सांगता आले.
Post a Comment