Friday, February 23, 2007

नादब्रह्म

मला संगीताचा नाद आहे. सूर आणि तालामध्ये नादावून जाणे मला अगदी सहज जमते. माझी आवड किती उच्च प्रतीची आहे ते मला माहीत नाही पण माझ्या या आवडीला निर्बंध मात्र कोणतेही नाहीत. जे संगीत मनाला भावेल त्याच मनमुराद आनंद लुटावा हा सोपा नियम मी कायम पाळत आलो आहे. आणि याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे, मी असली गाणी ऎकत नाही, मला शास्त्रीय संगीत अजिबात आवडत नाही, पाश्चिमात्य संगीतच सर्वश्रेष्ठ आहे किंवा न समजणाऱ्या भाषेतील गाणी माणसांपेक्षा माकडांना बरी, या भानगडी माझ्या वाटेला जातच नाहीत.

लहानपणापासून आपण नादाचा अनुभव घेतो. काही ताल पटकन मनाचा ठाव घेतात तर काही सूर बऱ्याचदा ’फ़िरुनी एकवार’ भेटल्यावर मनात घर करुन राह्तात. ’इथे इथे बस रे मोरा’ किंवा ’चांदोमामा चांदोमामा भागलास का’ न ऎकता मोठी झालेली मुले कदाचित टारझनसारखी जंगलात वाढली असावीत असा माझा अंदाज आहे. इथे त्या त्या भाषेतील बडबडगीते असा अर्थ अपेक्षित आहे, नाहीतर टारझनचा जन्म मराठी घराण्यात झाला असावा या नवीन प्रवादाचा जन्म व्हायचा. शिवाय बडबडगीते ही घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्यापुढे म्हणून दाखवण्यासाठीच आपल्या मुलाला शिकवायची असतात असा बहुतांश आयांचा (गैर)समज असतो त्यामुळे निदान वय वर्षे तीन पूर्ण होइपर्यंत प्रत्येक बाळ ’शहाण्या बाळासारखे’ सर्वांना बोबडीगीते ऐकवून आपले कवतिक करवून घेतो. मग पुढे जेव्हा बंडखोरी, हट्टीपणा, ’मी नाही जा’ या अस्त्रांचा शोध लागतो, तेव्हा कुठे त्या गुणदर्शनाच्या जाचातून सुटका होते.

तर सांगायचा मुद्दा असा की, जी गोष्ट कोणी लादल्याशिवाय सहज घडते ती मनाला अधिक भावते. किती एक मराठी, हिंदी गाणी अशीच मला त्यांच्या प्रेमात पाडून गेली. लता मंगेशकर नावाच्या बाईची गाणी गेली अनेक दशके अख्ख्या जगाला आवडतात यापेक्षा तिच्या आवाजाचा अनुभव अंतर्यामी जे तरंग उमटवतो ते मला जास्त महत्त्वाचे वाटते. या अशा अनुभवाची तुलना दुसऱ्याशी न करणे म्हणजेच एका नविन आनंदाला न मुकणे हे मी अनुभवांती शिकलो आहे. नाहीतर आतापर्यंत सापडलेल्या संगीतविश्वातील सौंदर्यस्थळांपैकी कितीतरी पाहायची राहूनच गेली असती. आपण इंग्लिश बोललो तर जगबुडी येईल अशी ठाम समजूत असणाऱ्या चायनीज कलिगने ऐकवलेली अगम्य पण सुरेल प्रेमगीते, एका हंगेरियन मित्राने ऐकवलेली त्याच्या मातृभाषेतील बालगीते आणि भीमसेन जोशींच्या एका भक्ताने ऐकवलेला त्यांचा शुद्धकल्याण हे अनुभव आजही आठवतात तेव्हा ’क्या बात है’ अशी दाद घेउन जातात.

शिवाय नादयात्री असणे हे, मला कोणता गायक किंवा गायिका आवडते यावर तर बिलकूल अवलंबून नसते. ती गोष्ट इतकी महत्त्वाची असती तर एका सावळ्या गवळ्याने वाजवलेला पावा झाडून सर्वांच्या ह्रुदयाचा ठाव घेऊ शकला असता? बरं ही झाली जुनी कहाणी. आजच्या घडीलाही, विलायत खानांची सतार, हरिप्रसाद चौरसियांची बासरी, झाकीर हुसेनचा तबला, यान्नीचा पियानो आणि यो-यो-माचा चेल्लो आपल्यावर शुद्ध सुरांची अखंड बरसात करत असतात. केवळ दिग्गजच नाहीत पण असे असंख्य कलाकार आपल्याला जेव्हा नादब्रह्माचा साक्षात्कार घडवतात तेव्हा याचसाठी केला होता हा अट्टाहास असे वाटल्याशिवाय राहत नाही. भाषा, शब्द कशाचेच बंधन नसणारी ही वैश्विक भावना कोणाही दोन सजीवांमध्ये संवाद घडवून आणू शकते खास!

आणि नाद, सूर हे आवाज किंवा वाद्यांच्या पलीकडेही अस्तित्त्वात असतात याचा अलिकडेच मी नव्याने अनुभव घेतला. गेल्या महिन्यातील दांडेलीच्या जंगलातील सहल अनेक कारणांसाठी अविस्मरणीय ठरली. ट्री-हाउसमध्ये राहणे (एकदम टारझन-ईष्टायल) हा जर एक अनुभव होता तर तेथे अखंड तीन दिवस ऐकलेली मैफ़ल ही स्वर्गीय सुरांची परिसीमा होती. नानाविध पक्ष्यांची किलबिल, जंगलाची गंभीर आलापी आणि जोडीला दुथडी भरून वाहणाऱ्या काली नदीचे सुरेल पार्श्वसंगीत! त्या मैफ़लीची आठवण आजही दाद न घेईल तरच नवल.

4 comments:

स्नेहल said...

खरं आहे... संगीत मग ते कुठल्याहि प्रकारचे, प्रदेशातले असो... मनाला भिडलं तर उच्च आनंद देऊन जाते.

लिहित रहा...

Tulip said...

dandelichya jangalatil anubhavan baddal suddha lihi na ekada.
chhaan post ahe he. sangitatil naad ani lay kharach shabdaatit asatat.

A woman from India said...

संगीताचा आनंद घेण्यासाठी संस्कार महत्वाचे असतात. ते संस्कार कानावर होऊ देण्यासाठी हृदयाची दारं उघडी असावी लागतात. त्यानंतर वैयक्तिक आवड निवड असू शकते. सूर सच्चा असेल तर भाषेची सीमा सहजगत्या ओलांडली जाऊ शकते, मात्रं कधी कधी भाषा समजली तर त्याची गोडी आणखी वाढते. "हुई और भी मुलायम मेरी शाम ढलते ढलते" हे एक उदाहरण देता येईल.
निसर्गात तर संगीत ओतप्रोत भरलेलं आहे. पाखरांची साद, पानांची सळसळ, वार्‍याचा अनाहत नाद - ही यादी नं संपणारी आहे. आदी-मानव संगीत निसर्गाकडूनच संगीत शिकला असावा.

TheKing said...

क्या बात है!

I cannot agree more. आणि हो, "हुई और भी मुलायम मेरी शाम ढलते ढलते" हे प्रेमात आकंठ बुडलेल्या ’समस्त अमिताभ आणि रेखा’ मंडळींसाठीचे गाणे आहे अशी माझी समजूत होती. पण खरंच ते गाणारा स्वर भाषा वगैरे प्रकरणात अडकणारा नाही हेच खरे!

अशा प्रतिक्रिया वाचण्यासाठी तरी मी ब्लॉगप्रांतातील प्रयोग चालु ठेवले पाहिजेत :-)