Sunday, April 8, 2007

एक होता राजा

माझे आजोबा म्हणजे एकदम राजा माणूस!

जवळपास सहा फ़ूट उंच, गोरेपान, भारदस्त शरीरयष्टी, बघणाऱ्यावर दरारायुक्त छाप पाडणारे. राजबिंडे या शब्दाला साजेशी सारी लक्षणे ठळकपणे आणि सहजपणे मिरविणारे. पन्नासच्या दशकात ते काश्मिर फ़िरायला गेले होते तेव्हा कोणी गेस्ट हाऊसवाले त्यांना गव्हर्नर समजले होते म्हणे. अर्थात आजोबांच्या सज्जनपणामुळे एकूण प्रसंग फ़ारसा नाट्यमय झाला नाही आणि गेस्ट हाऊसवाल्यांवर दोनातला खरा गव्हर्नर ओळखण्याची अनावस्था आली नाही. पण पु.लं.च्या अंमलदारसारखा हा खरा प्रसंग आईने मला सांगितला होता.

माझी आई तिच्या सर्व भावंडांपेक्षा बरीच मोठी. त्यामुळे माझा मोठा भाऊ आणि मी, आजोळी जायचे कोणतेही निमित्त म्हणजे पर्वणीकाळ, सगळे शुभयोग एकदम आल्यासारखे वाटत. मग आजोबांच्या देखरेखीनुसार आमची बडदास्त ठेवली जायची. त्यांची लाड करायची पद्धतच इतकी राजेशाही की मागायच्या आधीच सगळ्या गोष्टी आमच्यासमोर हजर.

आईसक्रिम खाणे हा अर्थातच एक सोहळा असायचा.

त्यांनी आम्हाला घेतलेले कपडे नेहमीच ’रिच टेस्ट’ चे असायचे.

आजीने घरीच केलेला सुग्रास स्वयंपाक ते आम्हाला गाडीत घालून महाबळेश्वरला नेऊन खाऊ घालायचे. ’तासभरपण लागत नाही तिथे पोहोचायला’ हे वर स्पष्टीकरण.

सगळा कुटुंब-कबिला रेल्वेच्या फ़र्स्ट-क्लासमधून प्रवासाला नेण्यासाठी केवळ पैशाची श्रीमंती लागत नाही हे स्वत:च्या कॄतीतून दाखवून देणार.

पौष्टिक आहार खाल्लाच पाहिजे म्हणून ते आम्हाला समोर बसवून फ़ळं, सुकामेवा, मिठाया आणि इतर असंख्य पदार्थ खाऊ घालणार. मग एखादा पदार्थ आमच्या बाळचवीला मानवणारा नसला तरीही त्यापासून सुटका नाही. ’खाल्लाच पाहिजे!’ आणि त्यांचे असे हे हुकुमत गाजवणे आम्ही सर्वांनीच मान्य केलेले.

मी शाळेत असेपर्यंत मग दरवर्षी सुट्टी सुरु होण्याच्या सुमारास त्यांचे नेटक्या अक्षरातील पत्र येणार. मी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे आणि सुरुवात या सुट्टीपासूनच करावी हा मुद्दा हमखास त्या पत्रात असणार. शिवाय काय काय वाचणार, काय काय खेळणार याची विचारणा, कोणते उपक्रम करावेत याच्या सूचना. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजोळी कधी येणार हा त्या पत्राचा हायलाइट!

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या माणसाने आयुष्यात अनेक टोकाचे प्रसंग पाहिले. सगळे बस्तान बसलेले असताना वेगवेगळ्या कारणांमुळे ’पुनश्च हरिओम’ म्हणून पुन्हा डाव मांडला. पुन्हा शून्यातून सुरुवात केली. पुन्हा सगळं उभं केलं. पहिल्यापेक्षा जास्त चांगलं. फ़िनिक्स केवळ गोष्टीतच नसतात हे मी त्यांना पाहून शिकलो.

आजोबांना सगळ्या चांगल्या गोष्टींचं व्यसन. त्यांचा पेहराव नेहमीच छाप पाडणारा. झब्बा-लेंगा, धोतर किंवा शर्ट-पॅंट-सूट असो, स्वत: कुठून-कुठून आणणार. साधा मलमलचा कुडता आणि लेंगा घातलेला असला तरिही समोरचा माणूस त्यांच्याशी अदबीनेच वागणार. पण त्यांची खरेदी ही नेहमीच ’बल्क’ मधे असायची. स्वत:ला एखादी गोष्ट घेताना ह्याला हे घे, त्याला ते घे असं सारखं चालूच. मग आमची चंगळ. त्यांची ’टेस्ट’ही अशी होती की एरवी खरेदी प्रक्रिया जटील करणाऱ्या बायका त्यांनी आणलेल्या साड्यांवर बेहद खुष असत.

मित्रपरिवार आधिच मोठा. त्यातही सगळ्या वयोगटातील माणसे त्यांच्याभोवती जमणार. व्यवसाय, व्यापारातील अनुभव, व्यासंग याच्या आधारे प्रत्येकाच्या गरजेनुसार मदत करायची. घरी आलेल्या कोणालाही विन्मुख पाठवायचे नाही, जबरदस्तीने का होईना पण खाऊ-पिऊ घालायचे, खुष करायचे व्यसनच त्यांना.

डिगिटल-विश्वात वावरणारा मी. एकदा त्यांनी काढलेले फ़ोटो पाहिले होते. ते ज्या कॅमेऱ्याने काढले होते तो आधी पाहिला होता आणि त्याची भरपूर चेष्टाही करुन झाली होती. फ़ोटो साधेच, कॄष्ण-धवल, घरातच काढलेले. आजी घरातल्या अवतारात काहीतरी काम करताना आजोबांनी ते फ़ोटो काढले होते. आजी सुंदर, देखणी, फ़ोटोजेनिक वगैरे असली तरी त्या डब्बा कॅमेऱ्यातून नॅचरल प्रकाश-सावलीचा मेळ साधत आजोबांनी कसले अफ़लातून रिझल्ट्स मिळवले होते!

साध्या-साध्या गोष्टीही दिलखुलासपणे अनुभवणं ही त्यांची खासियत. मग निव्वळ त्यांच्या अस्तित्त्वाने सगळं वातावरण बदलून जाणार. आयुष्यभर व्यवसाय केला तोही असा की इतरांना वाटावे की ’अरे, ही इतकी सोपी गोष्ट आहे तर!’. पण आजोबांना जवळून पाहिलेली मंडळी ’हे येरागबाळ्याचे काम नोहे राजा!’ या चालीवर त्यांच्या बुद्धिमत्ता, कौशल्य, ’रिस्क’ घेण्याची हिंमत आणि काळापुढे विचार करण्याची क्षमता याच्या चित्तरकथा सांगणार.

सगळं एकदम आठवणंही कठीण असतं आणि सगळ्या आठवणी एकदम हल्ला करून येणंही..

आजोबा आता कोणते ’सरप्राइज’ देणार याची आतुरतेने वाट पाहणारा मी. पण या एक एप्रिलला त्यांनीअ सगळ्यांनाच पूर्णपणे ’फ़ूल’ केले...

सगळेजण त्यांच्याभोवती जमले होते पण एरवी सगळ्या गोंधळात उठून दिसणारा त्यांचा आवाज ऐकूच येत नव्हता. त्यांची स्तब्धता चटका लावून गेली. मैफ़लीचा बादशाह सगळ्यांना चकवा देऊन निघून गेला होता.

आपल्या मनाला कधी काय आठवेल याचा नेम नाही. जुन्या गाण्यांच्या बाबतीत तर असं हमखास होतं..

इक था गाव जहॉंका, इक ऐसा था राजा

सबके दिलों में, वो रेहता था.. उसके जैसा कोई नही था...

4 comments:

प्रमोद देव said...

बरं का राजेसाहेब(द किंग) आपल्या आजोबांचे व्यक्तिचित्र शब्दांतून मस्तच रेखाटलंय तुम्ही. तुमची अनुदिनी सगळी वाचली. तुमच्या लेखनाची अनौपचारिक पध्दत आवडली.असेच लिहिते राहा.
आता इथे नियमित येणे होईल.

प्रमोद देव

himan8pd said...

nice post.

Unknown said...

There aren't enough words in my mouth to express the overwhelmed feeling that I get when I read this post. All I can say is 'Thanks' for bringing the feelings of our entire family into words. Now our Aajoba will always be remembered as the King of our family.

rayshma said...

i rly liked this post. like d way u write - it's narrative, yet personal! :)
and btw, u shud write more often!