Friday, April 20, 2007

एक डाव नवा..

एअरपोर्टला गाडी पोहोचते आणि नेहमीप्रमाणे गर्दी दिसते. अगदी एस.टी. स्टॅंडवर असते तशी. प्रवासी, त्यांना सोडायला आलेली मंडळी, त्यांची सामान गाडीतून उतरवण्याची लगबग, सूचनांची देवाणघेवाण, निरोप घेण्याची घाई आणि साथीला जड झालेल्या आवाजांबरोबर ओलसर होणारे डोळे... मलाही पुढचे चित्र दिसते.

मी निमूटपणे गाडीतून उतरून ट्रॉली आणायला पळतो. बोजड बॅग त्यावर ठेवेपर्यंत ट्रॅफ़िकवाल्या मामांची ’गाडी इथे लावू नका’ अशी हाकाटी सुरुपण होते. घर ते एअरपोर्ट हा अर्धा-पाऊण तासाचा वेळ कितीही हसत-खेळत गेलेला असला तरी टर्मिनलमध्ये आत शिरण्याची दोन मिनिटे सर्वात कठीण असतात!
मग सगळ्यांना टाटा करायचा. आई, भाऊ, वहिनी, मावशी, बहिणाबाई आणि अदी - माझा पुतण्या, जेमतेम दोन वर्षांचे हे प्रकरण दूर गेल्यावर मला बरेच जड जाणार आहे असे एकदमच आणि उगाचच वाटते. शेवटच्या क्षणापर्यंत कामात बुडवून घेणं म्हणजे संभाव्य होमसिकनेसचा विचार टाळण्याचा हमखास उपाय आहे हे आता मे अनुभवाने शिकलो आहे. सर्वांच्याच नजरा माझ्यावर खिळलेल्या असतात. बाहेरच्या जगात आपली किंमत शून्य असली तरीही जिवलगांसाठी मात्र आपण सुपरस्टार असतो याचा हा पुन:प्रत्यय. अदीची मस्ती चालुच राहते. कोणी गावाला चाललय हे फ़ारसे कळत नाही तेच बरे आहे त्यामुळे तो ’एअरपोर्ट हे खास त्याच्यासाठी एक नविन बालोद्यान आहे’च्या चालीवर इकडे-तिकडे बघत असतो.

सर्वात शेवटी आई पुन्हा एकदा भेटते. ओलसर होणारे तिचे सुंदर डोळे पाहून क्षणभर काहीच सुचत नाही. मग उगाच परत घड्याळ बघायचे. लवकर पळायला हवे म्हणत अलगद तिच्यापासून दूर व्हायचे. ही चार वाक्ये अनुभवणे किती कठीण असते ते अनुभवल्याशिवाय नाही समजायचे. पुढे होऊन गर्दीत मिसळल्यावरही मला शोधणरी तिची नजर माझ्या पाठीवरून फ़िरणाऱ्या तिच्या हातासारखी मला जाणवते.

मग गेल्या काही दिवसात झालेल्या प्रश्नोत्तरांची माझ्या मनात पुन्हा एकदा उजळणी होते. ’चांगला जॉब सुरळीत चाललेला असताना तुला काहीतरी दुसरे सुचतेच कसे?’ असे प्रश्न माझ्या स्थैर्यवादी बाबांना सहज पडतात. आणि त्यावर मी दिलेली उत्तरे त्यांच्या आकलनापलिकडची असतात. किंवा ते तसे निदान भासवतात तरी. कंपनी चांगली आहे, काम चांगले आहे, भरभर मिळालेल्या वाढीव जवाबदाऱ्या केलेल्या कामाची पावती देत आहेत, पगार बरा आहे (हा कितीही असला तरी चांगला नसतो!) मग आता तुझे हे काय नविन?

परंतु, आपण तेचतेच, पुन्हापुन्हा करतो आहे, चाकोरीबद्ध जीवन यांत्रिकपणे जगतो आहे ही जाणिव मला आतून अस्वस्थ करत असते. मी केवळ निमित्तमात्र आहे, आधीच लिहिलेल्या, ज्याला विधीलिखितही म्हणतात अशा नाटकतील केवळ एक मोहरा आहे हे खरे असले तरीही प्रत्येक क्षण जगण्याची, स्वत:लाच चॅलेंज करण्याची आणि दिवसाढवळ्या दिसणाऱ्या स्वप्नांमागेही जिवापाड धावण्याची माझी हौस काही कमी होत नाही. ठेच लागून पडण्याची भिती गाठीशी अनुभव असतानाही नव्या उमेदीच्या जोषात आणखी एक चॅलेंज देते. मग त्या भरात काही निर्णय घेतले जातात जे बाबांना क्रांतिकारक वगैरे वाटतात.

आयुष्य म्हणजे एक वर्तुळ आहे. पण त्याची त्रिज्या म्हणजे आपली कुवत असली तरी ती किती वापरायची हे आपल्या हातात आहे. मला मनापासून एखादी गोष्ट करायची आहे. ती करताना नेहमीप्रमाणे सर्वस्वीपणे करणे आणि तेव्हाचा प्रत्येक क्षण जगणे ही नशा कोणत्याही मदीरापानाने मिळणाऱ्या नशेपेक्षा जास्त आहे. स्वत:ची चौकट स्वत:च मोडून पुन्हा नविन सुरुवात करायची आणि आणखी उंच भराऱ्या घ्यायच्या यात मला ’मौज वाटे भारी’ असले माझे फंडे फ़क्त आईला समजतात. शब्दात मांडून सांगितले नाहीत तरीसुद्धा.

मग आपसुकच एक बळ येतं. आपल्याच कल्पना, विचार यावरचा विश्वास द्रुढ होतो. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. मग कधी गाव नवा तर कधी देश. ’हाऊ मच लॅंड डज अ मॅन नीड?’ असे टॉलस्टॉय लिहून गेला खरा पण जगण्यावरील श्रद्धेपेक्षा ऐहिक आसक्तीच त्यातून अधोरेखित होते. मला आत्ता धावायचे आहे. किती जमीन पादाक्रांत होईल यापेक्षा धावताना अनुभवता येणाऱ्या ऊर्जेचा अनुभव अधिक महत्त्वाचा आहे.

आज या दूरदेशच्या सागरजलात उभे राहताना मला मायदेशचा समुद्र आठवतो आहे. ’सागरा प्राण तळमळला’ यात काहीतरी तथ्य आहे हे किंचितसे जाणवते आहे. पण तेव्हढ्यात येथल्या पाण्याचा वेगळा रंग लक्ष वेधून घेतो. वाळूच काय, शंखशिंपलेही वेगळे दिसत आहेत. आता बरेच काही पाहता येईल, बरेच काही शिकता येईल. माझ्या पांचट जोकवर टाळी देईल असा मित्रही आहे बरोबर. माझी भाषा कळायला वेळ लागतोय त्याला, पण शिकेल हळूहळू.

नामवंत गवये स्वत:साठी म्हणजेच दुनियेचा विसर पाडून गातात म्हणे. मलाही आज खुल्या दिलाने गावंसं वाटतंय,
"तेजोनिधी लोहगोल..
भास्कर हे गगनराज....."

8 comments:

कोहम said...

सुंदर....

himan8pd said...

good one... aaibaddal lihilay te agadi khare!

Parag said...

Nice one.. !!
Air port varcha vatavaran baddal lihilay te agadi exact varnan ahe..
Keep writing..

स्वाती आंबोळे said...

वा!
मस्त लिहीता तुम्ही.
मी ही स्वभावतः स्थैर्यवादी (सही शब्द!) आहे. (अबब! केवढा तो शब्द!! मला हे वाक्य लिहील्यावर मी कुणीतरी ग्रेट असल्यासारखं वाटायला लागलं उगाच!!) आणि तुमच्या वडिलांना पडणारा प्रश्न मला नेहेमीच पडत आलाय. तुमचा लेख वाचून आता त्याचं उत्तर सापडल्यासारखं वाटतंय.

इतरही लेख वाचले. झकास.

Nandan said...

ya blog var prathamach aalo, aaNi sagale lekh vaachoon kadhale. tumhi chhaan oghavata lihita.

Monsieur K said...

well written!
when you decide to leave a good, 'well paying' job to seek further education, people (akin to स्थैर्यवादी बाबां) do question the motive.
it is only mom who realises why you make that choice, and she has complete faith in you.
a new place brings its own share of new friends, new experiences.
wish you the very best in this new journey.
follow your dreams.

~ketan

Aspirations said...

Good one. Wish you all the best !

Anish

Tulip said...

खूप छान लिहीलं आहेस!

पुढे काही कां लिहीत नाहीयेस?