राजधानीतला विमानतळ, आपल्या दिल्लीतला हो!
दिवसभर मीटिंग्स् करून जीव शिणला होता. त्यात शेवटची मीटिंग अगदी वेळेत संपल्याने, मुंबईची फ़्लाईट पकडायला बराच वेळ होता. काळ कितीही पुढे गेला, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, भविष्यात अंतराळयानांचा प्रवासही ’पब्लिक’ झाला तरीही हाडाचा मुंबईकर ’अंतराळयान पकडले’ असेच म्हणणार. ट्रेन, बस, टॅक्सी, गाडी पकडली ही विशेष प्रक्रिया किती अर्थगर्भ आहे, ते मुंबईकरच जाणे.
असो. तर विमान सुटण्याआधी पुष्कळ वेळ असला तरी जाम कंटाळा आला होता म्हणून मित्राला म्हणले, मला विमानतळावरच सोड. आजकाल विमानतळांची कळा अगदी ’सार्वजनिक वाहतूकीचा थांबा’ अशीच झाली आहे. हीऽऽ गर्दी. सुदैवाने माझ्याकडे फ़ारसे सामान नव्हते. बरोबर एखादे पुस्तक असतेच म्हणून एखादा निवांत कोपरा शोधून, सॅंटियागो वारा बनू शकेल का ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावे असा विचार केला.
कोणतेही निर्बंध न जुमानता बागडणारी पोरं, ’आम्ही विमानातून फिरतो’ची इस्त्री तोंडावर फिरवलेले काही चेहरे, अमकीच्या लग्नात तमकीने घातलेले दागिने आणि कपडे यावरील चुरचुरीत पंजाबी महिला-संवाद आणि मोठया आवाजात बातम्या ओकणाऱ्या व्रूत्तवाहिन्या टाळून मी एक निवांत अडचणीचा कोपरा शोधला. सार्वजनिक ठिकाणी पुस्तक वाचायला अशी जागा परफ़ेक्ट असते. सुखेनैव टेकून एखादेच पान वाचले असेल आणि,
"इस इंडियन एयरलाईंस्वालों की ऐसी की तैसी! वक्त का कोई खयाल नही. जिस दिन की टीकट खरीदो, उसके दो दिन बाद ये लोग उडान भरेंगे।" असा प्रसन्न पंजाबी तारस्वर ऐकू आला. महाशय रागाने अगदी लालबुंद झाले होते. ऐनवेळी विमानाची वेळ बदलणाऱ्या इंडियन एयरलाइंसचा उद्धार चालूच होता. आवाज कमी झाला असे वाटतानाच महाशयांनी जवळजवळ माझ्यासमोरच आपली बॅग आणि माझ्या शेजारील खुर्चीवर आपले बूड टेकले. स्वारी चांगलीच घुश्शात होती. मग विमानकंपनीवरील रागाचा मुक्तसंवाद त्यांनी माझ्यादिशेने रोखला. त्यांची एकूण शरीरयष्टी पाहता तो संवाद दुर्लक्षित करणे मला परवडणारे नव्हते. माझ्या हातातल्या पुस्तकाप्रमाणेच मलाही भिरकावून देण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. मी पुस्तक मिटले.
ग्रूहस्थ चाळीशीचे तरी असावेत. लांबी, रुंदी दोन्ही भरपूर. तोंडावरील रागाची लाली जरा कमी झाली होती आणि हा गोरापान देखणा माणूस थोडा निवळू लागला. विमानकंपनीच्या निषेधातील माझी सहमती ऐकून साहेब जर खुलले आणि आमचा हिंग्लिश संवाद सुरु झाला. साहेब दिल्लीचेच होते आणि कामानिमित्त कलकत्त्याला निघाले होते. प्रतिथयश कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असल्याने पूर्वनियोजित मीटिंगसाठी वेळेवर कलकत्त्याला पोहोचणे हे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे होते याची मला कल्पना आली. मग इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. मी मूंबईचा आहे म्हणल्यावर तर त्यांना आनंद झाला. त्यांचे बरेच नातेवाईक मुंबई-पुणे भागात होते. शिवाय कामानिमित्तही मुंबईची वारी व्हायचीच. मी काय करतो, करीयरचे काय प्लान्स आहेत वगैरे प्रश्नांची फ़ैरीही झाली. पण मानले पाहिजे, साहेब अगदी हुशार होते.
’नेक्स्ट जनरेशन’शी संवाद साधण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती. राजकारण, अर्थकारण, लेखक, पुस्तके, गाणी, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शीला दीक्षित, कमल हसन, सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे अशा कैक विषयांवरील गप्पात तासभर कसा गेला कळलेच नाही. साहेबांकडे इंडियन एयरलाइंसच्या क्रूपेने वेळच वेळ होता पण माझ्या विमानाची वेळ झाली आणि मी निरोप घ्यायला सुरुवात केली. हिंग्लिशमधील सहजतेमुळे आमचा संवाद केवळ प्रथमनामांवरच चालला होता. एकमेकांच्या कंपनीची नावे जरी समजली होती तरी त्यांनी प्रोफेशनल सराइतपणे खिशातून स्वत:चे बिझनेस-कार्ड काढले. मग मीपण माझे कार्ड त्यांना देऊन, निघताना बोलताबोलता त्यांचे कार्ड वाचले. पहिल्या ओळीतले त्यांचे नाव वाचले.
"मोहित बर्वे"
मनात म्हणले, नक्की काहीतरी गडबड आहे. ह्या नखशिखांत पंजाबी ग्रूहस्थांनी नजरचुकीने दुसऱ्या कोणाचेतरी कार्ड मला दिले.
"जी, आपने मुझे गलतीसे किसी औरका कार्ड दे दिया शायद" माझ्या हिंदीतले मुंबईपण शक्य तितके गाळून मी त्यांना विचारले.
"नही तो. ये मेराही कार्ड है, क्या हुआ?"
"लेकीन आप तो पंजाबी है"
"बिल्कुल मै पंजाबी हूं", त्यांच्या चेहऱ्यावर आता मिष्किल हसू उमटले होते.
माझ्या वाढत्या गोंधळात भर पडत होती. "अगर आप पंजाबी है तो आपका नाम बर्वे कैसे हो सकता है?"
मग हा माणूस अस्सल पंजाब्याप्रमाणे मोठ्ठ्या आवाजात हसला. "तुमने स्कूल मे हिस्टरी पढी थी?"
आता "हिस्टरी" न पढता मी दहावी कसा होईन? दहावी न होता इंजिनियर कसा होईन? "जरूर पढी थी लेकीन आपका नाम तो उसमें नही पढा था" आता मी थोडा त्रासलो होतो.
हा परत एकदा मोठ्ठ्याने हसला, "मेरा नाम नही लेकीन मराठोंकी पानिपतकी लढाईके बारेमें जरूर पढा होगा"
आता हा कोणाचे पानिपत करण्याच्या प्रयत्नात आहे हे मला अजिबात समजत नव्हते. "लेकिन आप इतने बूढे तो नही लगते, वो लढाई तो कमसे कम तीनसौ साल पुरानी होगी" मी माझ्या प्रतिहल्ल्यात पुचाट विनोदाचा आधार घेतला.
आता ह्याच्या पुन्हापुन्हा हसण्याचा मला थोडा राग यायला लागला. "कुछ ऐसा समझो के हमारे हमारे परदादा के परदादा के परदादा पानिपत की लढाई के वक्त यहा आये थे। लढाई तो खत्म हो गयी लेकीन कुछ मराठे यही सेट्ल हो गये। अब तीनसौ साल दिल्लीमे रेहनेवाला एक बर्वे पंजाबीही केहलायेगा ना?"
पॉईंट होता. इथे एक महीना अमेरिकेला जाऊन आलेल्या मंडळींना मराठी words remember करायला difficult जाते, तिथे ह्या ग्रूहस्थाचे पूर्वज शेकडो वर्षापासून दिल्लीत स्थायिक झाले होते. तीनशे वर्षे म्हणजे शेकडो वर्षेच म्हणली पाहिजेत. भलताच विनोदी प्रकार वाटला तरी मी बर्वे नावाच्या एका पंजाब्याला भेटलो होतो!
हा प्रसंग जसाच्या तसा आठवायचे कारण म्हणजे मी गेल्याच आठवड्यात दुबईत एका "चिराग पटेल" नावाच्या सदग्रूहस्थांना भेटलो. साहेब नावाप्रमाणेच रंगरूपानेही अस्सल गुजराती होते. पण संवाद मात्र फ़िरंगी वळणाच्या इंग्रजीत. शेवटी मी गुजरातीवर अत्याचार करत म्हणालो, "केम चिरागभाई, गुजराती नथी आव्यो?"
त्यावर हा म्हणाला, "No man, been born and brought up here, been to India hardly anytime. no Gujarati please."
हा एक नविन काळातला नविन धडा. नाव बर्वे असले म्हणून काय किंवा ललाटरेषा "हा गुजराती आहे" असे ओरडून सांगत असली तरी काय, मुद्दल अस्सल असेल याची खात्री नाही.
आणि हो, शांघायमध्ये फक्त चायनीज मंडळी राहतात असा माझा समजच नव्हे तर खात्री होती. माझ्या तिथल्या वास्तव्यात केवळ चायनीजमध्येच बोलणाऱ्या मंडळीमध्ये (यातल्या काहींना इंग्रजी चांगले येत होते अशी मला दाट शंका होती) राहून माझे डोळे बारीक, नाक चपटे होत आहे असे मला वाटू लागले होते. शिवाय अजून काही दिवस इथे राहिलो तर माझ्या मुखकमलातूनही चायनीज स्वरधारा बरसू लागतील इतके चायनीज ऐकून झाले होते. तरी बरं, माझ्याबरोबर चार भारतीय सहकारी होते. चायनीज पामरांनी खचाखच भरलेल्या मेट्रोमधून प्रवास करताना "विशेष" संवाद साधताना राष्ट्रभाषा आमची परवलीची संकेतप्रणाली होती.
एके दिवशी आम्ही चौघे मेट्रोमधून जात असताना शांघायमध्ये नविन हिंदी सिनेमा पहायला मिळू नये ह्या अन्यायाविरुद्ध चायनीज सरकारने कोणते ठोस धोरण अवलंबले पाहिजे या महत्त्वाच्या विषयावर आमची मौलिक चर्चा चालू होती.
"उसमें क्या है, शांगयांग मार्केट जाओ तो हर कोई हिंदी सिनेमा की डीव्हीडी मिलेगी" हा डायलॉग ऐकून आमच्या पोटात खड्डा पडला कारण तो आवाज आमच्या चौघांपैकी कोणाचाही नव्हता! शेजारीच उभ्या असणाऱ्या एका चायनीज पोरग्याने (चायनीज माणूस वयाने कितीही वाढला तरी पोरगेलासाच दिसतो) हा सल्ला भोचकपणे दिला होता. हा प्राणी मुंबईत जन्मला, वाढला होता आणि आता कामानिमित्त पुन्हा मायदेशी आला होता. मग त्यापुढे आमची हिंदी सिनेमा पहायची सोय झाली आणि अस्सल मुंबईचे हिंदी बोलणारा अस्सल चायनीज मित्रही मिळाला.
पण आमच्या राष्ट्रभाषेतील मुक्त संवादावर बंधने आली हे सांगणे न लगे!
वारा निर्गंध असला तरी तो ज्या दिशेने येतो त्या दिशेचे संस्कार त्याच्यावर व्हायचेच.
पिवळाधमक असला तरी प्रत्येक आंबा हापूस नसतो आणि रंग निराळा असला तो मधुर नसेल असेही काही नाही हेच खरे!