Sunday, November 16, 2008

तीन दिवसात दोन पुस्तकं

गेल्या तीन दिवसात मी दोन पुस्तकं वाचून काढली.

गेले काही दिवस (किंवा महिने.. वर्षं म्हणलं तरी चालेल) वाचायला वेळच मिळत नव्हता. वाचायसाठी वेळ न मिळणं हे मला खूप अपमानास्पद वाटतं. वाचायसाठी का वेळ काढावा लागतो? पण रोजचं वर्तमानपत्र वाचणं वेगळं आणि एखाद्या पुस्तकात डुंबणं वेगळं.

खूप दिवस नाही काही वाचलं की आजारी असल्यासारखं वाटायला लागतं. मी काही खूप मोठा रसिक किंवा चोखंदळ वाचक आहे का ते माहित नाही पण वाचकाला काही जात नसते. आणि त्यातही मी हातात पडेल ते वाचतो. केवळ थोर साहित्यिकांचेच सारस्वत लागतं किंवा नवसाहित्याशिवाय तरणोपाय नाही असल्या भानगडी मला सुचत नाहीत. प्रवासात वाचायला अजिबात वेळ मिळणार नाही ही माहित असूनही मी एखादं पुस्तक बरोबर ठेवतो, मग जरा बरं वाटतं.

तर तीन दिवसात दोन पुस्तकं.

दिवाळीमुळे तीन दिवस सलग सुटी होती. त्याआधी संध्याकाळी घरी येताना त्या स्पेशल रद्दीवाल्याच्या दुकानावरून आले. ह्याच्याकडे सगळी पुस्तकं स्वस्तात मिळतात. पायरेटेड प्रिंट्स असोत किंवा कोरी ओरिजिनल, ह्याच्याकडचा रेट सगळ्यात कमी. शिवाय हा वाचून झालेलं पुस्तक पुन्हा विकत घेतो, अर्थातच पैसे आणखी थोडे कमी करून. म्हणून मग One Night at Call Center आणि Five Point Someone उचललं.

ह्या चेतन भगतचा एव्हढा hype झाला आहे की पुस्तक तितकं चांगलं असेल का हा प्रश्ण मनात होताच. घरी आल्यावर हातात पहिल्यांदा Five Point Someone आलं म्हणून तेच वाचायला सुरुवात केली.

हरी, रायन आणि आलोक या तिघांची ही गोष्ट. शिवाय अस्सल उपपात्रंही बरीच. गोष्टीचा plot झकास आहे मात्र चेतन भगतची गोष्ट सांगण्याची पद्धत काही जेव्हढी खरी वाटते तेव्हढीच ती काही वेळेस तद्दन खोटी वाटते, ओढून-ताणून मांड मांडल्यासारखी. म्हणूनच ती अगदी जवळची वाटता वाटता अनोळखी वाटतात. हरी, ज्याच्या तोंडून सगळी कथा सांगितली जाते, तोच इतकं हातचं राखून बोलतो की गोष्टीचा ३६० degree view हवा असेल तर, Five Point Someone, by Ryan आणि Five Point Someone, by Alok वाचावं लागेल. पात्रांची authenticity जर जपता आली नाही तर गोष्टीचं भजं व्हायला कितीसा वेळ लागणार? पुस्तक मस्त आहे पण great वगैरे अजिबात नाही.

One Night at Call Center ही तर एक fantasy. कॉल सेंटरचा डोलारा चेतननं नक्कीच छान उभा केलाय पण त्यातला नायक श्याम - जो ही गोष्ट सांगतो तो अगदी सामान्य असतो. पण नायकाचं सामान्यत्व उभं करताना लेखकाला असामान्य कामगिरी जमली तरच पुस्तक great होतं हे कोणीतरी भगतसाहेबांना सांगायला हवं. त्याने प्रयत्न मनापासून केलेला आहे पण तो प्रयत्न आहे हेसुद्धा जाणवतं. आणि म्हणूनच मला हेही पुस्तक काही खल्लास वाटलं नाही.

पण काही प्रसंग, काही जागा टाळ्या नक्कीच घेतात. अस्सल माणसांची अस्सल दुनिया मोठी अजब असते महाराजा, मग त्यातली साम्यस्थळं दिसली की तोंडातून शिटी येणारच ना!

चेतनचं Three mistakes of my life नाही वाचलं अजून. पण तेही जर याच वळणावर जाणारं असेल तर मात्र त्याला ’व्यक्ती आणि वल्ली’ भेट देईन म्हणतो, home work करायला - माणसं कशी चितारली जातात ह्याचं detailing समजवायला.

दिवाळीचं celebration करून तोंडी लावायला पुस्तकं छानच होती. मुख्य म्हणजे एकेका दिवसात संपणारी. त्यामुळे अख्खं पुस्तक एका दिवसात संपवलं हे समाधान. आता बिल गेट्सचं ’The Road Ahead’ आणून ठेवलंय. But any suggestions?

3 comments:

rayshma said...

i refuse to read anything written by chetan bhagat anymore. 5 point was okay. after that... no plz. not my style.
have u read william dalrymple? i'd recco age of kali and/or city of djinns.
i've been asked to read "Us & Them". it's non-fiction. and supposed to be good. look it up. i will too :)

Monsieur K said...

i have read only "five point someone".. timepass aahe..
i read this book called "the last lecture" recently.. will definitely recommend it.. chk the reviews on amazon before u decide to read it ;-)

rayshma said...

and reply to comments! :D