Saturday, November 15, 2008

बचेंगे तो Monday भी मिलेंगे

"बचेंगे तो और भी लढेंगे" असं कोणीतरी ऐतिहासिक पुरुष म्हणून गेला होता.

किंवा कोणी पुरुषीही म्हणाली असेल. आता स्त्रीला पुरुषी का म्हणत नाहीत हा वादाचा मुद्दा आहे आणि मी वादात पडत नाही. तसं लहानपणी मला, विदुषी हे विदुषकाचे स्त्रीलिंगी रूप आहे असं वाटायचं. असो..

तर मुद्द्याची गोष्ट म्हणजे, बचेंगे तो और भी लढेंगे हे आत्ताच आठवायचं कारण म्हणजे सध्याची जागतिक परिस्थिती!

लेहमन बंधूंनी स्वत:चीच अब्रू स्वत:च्याच हाताने वेशीवर टांगली आणि बॉलीवूडमध्ये Item Songs करायला so called मादक ललनांची रांग लागते तशी मोठमोठ्या अर्थसंस्थांची स्पर्धा सुरु आहे. शेयर बाजाराचा विषय काढला की तर माझ्या काळजात एक स्पष्ट कळ उमटते. उत्साहाच्या भरात लाखाचे बारा हजार नाहीत (माझ्याकडे कुठले लाख रुपये असणार शेयर बाजारात फुकायला) पण बारा हजाराचे बाराशे नक्कीच झाले आहेत. म्हणजे नुकसान जरा जास्तच.

विप्रो, इन्फोसिस वगैरे मंडळींनी निरोपाचे नारळ देताना नारळांची खरेदी घाऊकरित्या केल्याचं ऐकलं आणि आमच्या गोटातही थोडा काळजीचा सूर उमटला. जेमतेम तीनशे साडेतीनशे लोकं असताना आपली कंपनी नारळ खरेदीच्या भानगडीत पडणार नाही असं स्पष्ट मत नीलनं मांडलं होतं. काढायचंच असेल तर त्या निकम्म्या परप्रांतीयाला का काढू नये असंही एका मराठी बांधवाचं मत पडलं. विशालचा मात्र जो तो आपल्या कर्माने येतो आणि जातो यावर गाढ विश्वास! त्याने असं म्हणल्यावर सगळ्यांचीच हवा टाईट. कारण नेमकं कोणतं कर्म यावेळी आडवं येईल याची गॅरंटी नाही.

दबक्या आवाजातल्या चर्चांना तोंड फुटलंय आणि गॉसिप कॉलम भरून वाहतोय. त्यातच एकाला नारळ मिळाल्याची पक्की खबर आहे. उडत्य्या पाखरानं आणखीही काही नावं कानात सांगितली आहेत. तेव्हा शुक्रवारी निरोप घेताना हेच म्हणणं क्रमप्राप्त आहे,

बचेंगे तो Monday भी मिलेंगे!

2 comments:

rayshma said...

LOL!! loved this piece. does it mean i need to worry if u're not online on monday morng!? ;)

btw. maajhya cousin ni "maata" cha gender change karun "maati" lihila hota exam madhye ekda. :D
pucca me nahi lihila. theoreticaly, my marathi was good in school! ;)

यशोधरा said...

खरय. आज जात्यात, उद्या सुपात असू शकू अशी परिस्थिती आहे!