Friday, February 23, 2007

नादब्रह्म

मला संगीताचा नाद आहे. सूर आणि तालामध्ये नादावून जाणे मला अगदी सहज जमते. माझी आवड किती उच्च प्रतीची आहे ते मला माहीत नाही पण माझ्या या आवडीला निर्बंध मात्र कोणतेही नाहीत. जे संगीत मनाला भावेल त्याच मनमुराद आनंद लुटावा हा सोपा नियम मी कायम पाळत आलो आहे. आणि याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे, मी असली गाणी ऎकत नाही, मला शास्त्रीय संगीत अजिबात आवडत नाही, पाश्चिमात्य संगीतच सर्वश्रेष्ठ आहे किंवा न समजणाऱ्या भाषेतील गाणी माणसांपेक्षा माकडांना बरी, या भानगडी माझ्या वाटेला जातच नाहीत.

लहानपणापासून आपण नादाचा अनुभव घेतो. काही ताल पटकन मनाचा ठाव घेतात तर काही सूर बऱ्याचदा ’फ़िरुनी एकवार’ भेटल्यावर मनात घर करुन राह्तात. ’इथे इथे बस रे मोरा’ किंवा ’चांदोमामा चांदोमामा भागलास का’ न ऎकता मोठी झालेली मुले कदाचित टारझनसारखी जंगलात वाढली असावीत असा माझा अंदाज आहे. इथे त्या त्या भाषेतील बडबडगीते असा अर्थ अपेक्षित आहे, नाहीतर टारझनचा जन्म मराठी घराण्यात झाला असावा या नवीन प्रवादाचा जन्म व्हायचा. शिवाय बडबडगीते ही घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्यापुढे म्हणून दाखवण्यासाठीच आपल्या मुलाला शिकवायची असतात असा बहुतांश आयांचा (गैर)समज असतो त्यामुळे निदान वय वर्षे तीन पूर्ण होइपर्यंत प्रत्येक बाळ ’शहाण्या बाळासारखे’ सर्वांना बोबडीगीते ऐकवून आपले कवतिक करवून घेतो. मग पुढे जेव्हा बंडखोरी, हट्टीपणा, ’मी नाही जा’ या अस्त्रांचा शोध लागतो, तेव्हा कुठे त्या गुणदर्शनाच्या जाचातून सुटका होते.

तर सांगायचा मुद्दा असा की, जी गोष्ट कोणी लादल्याशिवाय सहज घडते ती मनाला अधिक भावते. किती एक मराठी, हिंदी गाणी अशीच मला त्यांच्या प्रेमात पाडून गेली. लता मंगेशकर नावाच्या बाईची गाणी गेली अनेक दशके अख्ख्या जगाला आवडतात यापेक्षा तिच्या आवाजाचा अनुभव अंतर्यामी जे तरंग उमटवतो ते मला जास्त महत्त्वाचे वाटते. या अशा अनुभवाची तुलना दुसऱ्याशी न करणे म्हणजेच एका नविन आनंदाला न मुकणे हे मी अनुभवांती शिकलो आहे. नाहीतर आतापर्यंत सापडलेल्या संगीतविश्वातील सौंदर्यस्थळांपैकी कितीतरी पाहायची राहूनच गेली असती. आपण इंग्लिश बोललो तर जगबुडी येईल अशी ठाम समजूत असणाऱ्या चायनीज कलिगने ऐकवलेली अगम्य पण सुरेल प्रेमगीते, एका हंगेरियन मित्राने ऐकवलेली त्याच्या मातृभाषेतील बालगीते आणि भीमसेन जोशींच्या एका भक्ताने ऐकवलेला त्यांचा शुद्धकल्याण हे अनुभव आजही आठवतात तेव्हा ’क्या बात है’ अशी दाद घेउन जातात.

शिवाय नादयात्री असणे हे, मला कोणता गायक किंवा गायिका आवडते यावर तर बिलकूल अवलंबून नसते. ती गोष्ट इतकी महत्त्वाची असती तर एका सावळ्या गवळ्याने वाजवलेला पावा झाडून सर्वांच्या ह्रुदयाचा ठाव घेऊ शकला असता? बरं ही झाली जुनी कहाणी. आजच्या घडीलाही, विलायत खानांची सतार, हरिप्रसाद चौरसियांची बासरी, झाकीर हुसेनचा तबला, यान्नीचा पियानो आणि यो-यो-माचा चेल्लो आपल्यावर शुद्ध सुरांची अखंड बरसात करत असतात. केवळ दिग्गजच नाहीत पण असे असंख्य कलाकार आपल्याला जेव्हा नादब्रह्माचा साक्षात्कार घडवतात तेव्हा याचसाठी केला होता हा अट्टाहास असे वाटल्याशिवाय राहत नाही. भाषा, शब्द कशाचेच बंधन नसणारी ही वैश्विक भावना कोणाही दोन सजीवांमध्ये संवाद घडवून आणू शकते खास!

आणि नाद, सूर हे आवाज किंवा वाद्यांच्या पलीकडेही अस्तित्त्वात असतात याचा अलिकडेच मी नव्याने अनुभव घेतला. गेल्या महिन्यातील दांडेलीच्या जंगलातील सहल अनेक कारणांसाठी अविस्मरणीय ठरली. ट्री-हाउसमध्ये राहणे (एकदम टारझन-ईष्टायल) हा जर एक अनुभव होता तर तेथे अखंड तीन दिवस ऐकलेली मैफ़ल ही स्वर्गीय सुरांची परिसीमा होती. नानाविध पक्ष्यांची किलबिल, जंगलाची गंभीर आलापी आणि जोडीला दुथडी भरून वाहणाऱ्या काली नदीचे सुरेल पार्श्वसंगीत! त्या मैफ़लीची आठवण आजही दाद न घेईल तरच नवल.

Sunday, February 18, 2007

नमस्कार मंडळी!

बाकी हा प्रकार मोठा झकास आहे. सायबरविश्वात माझे विचार मराठीतून मांडणे ही संकल्पना टिळकांनी इंग्रज राज्यकर्त्यांच्या नाकावर टिच्चून जहाल अग्रलेख लिहीण्याएवढीच क्रांतिकारी आहे. शिवाय आजकालच्या दैनंदिन घडामोडी इतक्या इंग्रजाळलेल्या असतात की साधी चार वाक्ये मराठीतून लिहीताना आठ इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय शोधण्याची मेहनत करावी लागते. पण शेवटी हे सगळे मनाचेच खेळ झाले. लेख लिहीताना चार वाक्ये तरी मराठीतून लिहीता येतील की नाही हा विचार करेपर्यन्त पाचव्या वाक्याची प्रगती काही वाईट नाही. मातृभाषा या शब्दाच्या खोलीचा मी आज नव्याने अनुभव घेतो आहे. सहज स्फ़ुरते ती, मनात विचारप्रक्रिया ज्या भाषेतून चालते ती आणि सर्वात सोपे म्हणजे अपार वेदनेच्या क्षणी ज्या भाषेतून आपल्या भावना व्यक्त होतात ती आपली मातृभाषा!

थोडक्यात काय की भर दिवसा डोळ्यांसमोर तारे चमकले की अजूनही मला आईच आठवते. माझ्या व्यक्तिमत्त्वातील मायमराठीच्या अस्तित्त्वाचा याहून अधिक पुरावा कोणता असणार? आणि मला सांगा, "सायंकाळी गोधन गोठयात परतले", "पुरणपोळीवर तुपाची धार सोडली", "त्या कालचा पोर असलेल्या मावळ्याने विजयश्री खेचून आणली", "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी" व "गणपती बाप्पा मोरया" या भावना मराठीखेरीज कोणत्या भाषेतून मांडता येतील? अगदी आपली संतमंडळीही म्हणून गेली, "संस्कृत जर देवे केली, मग प्राकृत काय चोरे केली?" आपली कुवत भले तेवढी नसली, तरी निदान स्वत:च्या भावना मायबोलीतून व्यक्त करताना परभाषेच्या कुबड्यांचा आधार न लागणे हे ही नसे थोडके!

शुद्ध मराठीतून बोलता येणे ही "घटना" आजच्या युगात नैसर्गिक असण्यापेक्षा आश्चर्यजनक, खेदमिश्रित, "कोठून आली ही ब्याद?" अशा विविध नजरेतून पाहिली जाते. माझा एक आत्येभाऊ किती वाजले हे मराठीतून उत्तरतानाच गडबडतो मग ’सव्वा-अकरा रुपयांची दक्षिणा’, ’बारा गावचे पाणी प्यायलेला बहाद्दर’ अशा संकल्पना साहजिकच त्याच्या आकलनापलिकडे असतात. एव्ह्ढेच कशाला जेमतेम दोन आठवड्यांसाठी परदेशी (आता श्रीलंका म्हणजेसुद्धा परदेशच बरं का!) जाऊन आलेली मंडळीसुद्धा ’आजकाल मराठी शब्द आठवणे जिकिरीचे झाले आहे’ याची कारणमीमांसा पुरवतात, तेव्हा मात्र तेव्हढेच थोडे हसून घ्यावे अशी अवस्था होते. आणि याच्या अगदी उलट अनुभव आला एका मित्राच्या काकूला भेटताना. तिचे अस्खलित मराठी ऎकल्यावर, ही बाई गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ अमेरिकेत वास्तव्य करुन आहे यावर विश्वास बसणे कठीण होते.

शेवटी सगळे आपल्याच मनाचे खेळ असतात. आपण एखादी गोष्ट किती स्वीकारतो ही त्यातली खरी गोम असते. या सायबरविश्वातील मराठी भाषिकांची मुसाफ़िरी दिलासा देणारी नव्हे तर आल्हददायक वाटते. सवयीचे घर धुंडाळताना अचानक जुन्या आठवणी हाती लागाव्यात तसेच काहीसे माझे हे मराठी ब्लॉग झाले. काही मंडळींचे ब्लॉग तर ’अरे हा किती दिवसांनी भेटला, ही इतके दिवस होती कुठे?’ असा अनुभव देऊन गेले. यथावकाश सर्वांबरोबर ऒळखी होतीलच पण त्यात केवळ औपचारिकता राहू नये आणि स्नेह वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा.

तेव्हा मंडळी, इतुके दिवस आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतात, तो ब्लॉग आता साक्षात अवतरला आहे. (उन्मळून हसणे, या भावनेचा साक्षात्कार अशाच समयी होत असतो!) आपली भेट होतच राहील. पण त्यातून मराठीची शुद्धता तपासण्यऎवजी (भगवंता, मला निदान चार ओळी न चुकता खरडण्याचे बळ दे!) संवाद साधण्याची इच्छा पूर्ण होवो.

आणि सरतेशेवटी, कॅलिफ़ोर्नियाच्या गव्हर्नरसाहेबांना स्मरून म्हणतो, I will be back!!