Tuesday, December 25, 2007
काही जुने दिवस
म्हणजे सकाळचे चार वाजलेले बघायला लागणं ही एक शिक्षा आहे.
म्हणजे त्याचं असं झालं की आम्ही एका प्रोजेक्टवर काम करीत आहोत. मी अजून तसा नविनच आहे त्यामुळे बरोबरच्या मंडळींवर थोडी जास्त डिपेन्डन्सी. इतर कामाच्या गडबडीत या प्रोजेक्टचं काम थोडं मागे पडलेलं. मग बॉसनं अचानक रिलीज डेट मागितली आणि मी फोन उचलून त्या व्हेंडरला झापला, ’इतकी कामं राहिली आहेत, करताय काय?’ मग पुरेशा तडजोडीनंतर असं ठरलं की मी आणि माझा एक सहकारी अशा दोघांनी बॅंगलोरला त्या व्हेंडरच्या ऑफिसमध्ये जाऊन महत्त्वाची सगळी कामं निपटवायची.
मुहुर्त लगेच दुसऱ्या दिवशीचा होता, आणि माझ्या कोणत्याही काकाच्या मालकीची विमान कंपनी नसल्यामुळे, सकाळी सव्वासहाच्या फ्लाईटची तिकिटं मिळाली. म्हणजे सकाळी चारलाच उठायला लागणार ना?
बॅंगलोरमध्ये उतरलो तर चक्क रिमझिम पाऊस पडत होता आणि मस्त थंडी होती. अगदी बिनकामाच्या चकाट्या पिटत फिरायला योग्य अशी. पण आमच्या डोळ्यासमोर बॉसनं मागितलेली रिलीज डेट! मग मुकाट त्या व्हेंडरचं ऑफिस गाठलं. दिवसभर त्याच्या मेंदूचा पुरता फडशा पाडला. डिमांडिंग पोझिशनमध्ये असल्याचा हाच फायदा होतो. सकाळी नऊला सुरु झालेली मिटींग संध्याकाळी साडेसहाला संपली तेव्हा सगळ्यांचाच टाईम-आऊट झाला होता.
परतण्याआधीचे दोन-तीन तास काय करायचं म्हणून कुठेतरी जाऊन बसायचं असा प्लान होता. माझ्या सहकाऱ्याचा बॅंगलोरमधील मित्र ही जबाबदारी पार पाडणार होता. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर जायला निघालो आणि रिक्षातून बॅंगलोर-दर्शन सुरु झाले. जाता जाता सहज रेसिडेंसी रोड असं नाव वाचलं. थोडं आणखी पुढे गेल्यावर ’कासा पिकोला’ नामक ’द इटालियन वे’ रेस्तरॉं दिसले. ओळख पटायला वेळ अजिबात लागला नाही. कारण बॅंगलोरशी ओळख याआधीच झाली होती.
सात-आठ वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना इंडस्ट्रियल टूरच्या नावाखाली जिवाचे बॅंगलोर करून झाले होते. करीयर, स्पर्धा, असली आयुष्य, इंडस्ट्री, जॉबची समीकरणं असल्या गोष्टींची अजून ओळख व्हायची होती. हिंदुस्थान एरोनॉटिक्स, फिलिप्स, इस्रो च्या भेटी भलत्याच इन्स्पिरेशनल होत्या. शिवाय मला नक्की आठवतं, विप्रो-इन्फोसिस चे कॅम्पस पाहूनच जनता पागल झाली होती. त्यांचे अवाढव्य चकाचक कॅम्पस, आलिशान ऑफिसेस, पॉश कॅंटीन्स, कॉफीशॉप्स कॉलेजच्या पोरांना इम्प्रेस न करतील तरच नवल होते. इन्फोसिसमध्ये तर एका हिरव्यागार कुरणाच्या मध्याशी असणाऱ्या छोट्याशा जलाशयात पाय सोडून बसलेले प्रणयी युगुल (तेही ऑफिसच्या वेळात!) पाहून, इन्फोसिस जॉइन करणे म्हणजे बॉलिवूडच्या सिनेमात हिरो बनण्याइतकेच स्वप्नाळू वाटले होते!
शिवाय दिवसभर अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरून झाल्यावर रात्री श्रमपरिहारार्थ सगळ्या हॅपनिंग ठिकाणांना भेट देणं अपरिहर्यच होतं. एम. जी रोड, ब्रिगेड रोड, रेसिडेन्सी रोड इथली सगळी ठिकाणं पालथी घातली होती. सगळी मॉल्स, दुकानं, हॉटेल्स सगळं फिरून झालं होतं. तेव्हाच कधीतरी त्या ’कासा पिकोला’चा शोध लागला होता..
ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तेथील मजा तर शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. आम्ही पुरते तीन मजले व्यापले असतानाही बहुतांश सगळी जनता केवळ दोन-तीन रूम्समध्येच पडलेली असायची. नाच, गाणी, गप्पा, बौद्धिकं सगळ्याचाच महापूर आला होता! ’प्लॅंचेट’चाही एक फ़ेल्ड अटेंप्ट करून झाला होता. त्या रात्री तर आम्ही एव्हढे हसलो होतो. नुसता धुमाकूळ घातला होता. हॉटेलचा मॅनेजर आम्हाला शांत करता करता वेडापिसा झाला होता..
आईशप्पथ, काय दिवस होते ते..
Sunday, December 16, 2007
नविन ऑफिस
आजचा दिवसही काही फार वेगळा नव्हता.
’नऊ वाजता ऑफिस सुरु होतं, तोपर्यंत पोहोचशील ना?’ एच आर मॅनेजरनं धमकीवजा सूचना केली होती. मग वेळेत न जाण्याचा प्रश्नच नव्हता. सकाळी सकाळी उठून, शाळेचा पहिला दिवस असल्यासारखं आवरून वेळेत गेलो! तरी बरं नविन ऑफिस घरापासून फार लांब नाही. नविन बकरा आहे म्हणल्यावर मला एका कॉन्फरन्स रूममध्ये बसवलं. माझ्याखेरीज अजून तिघेजण होते. सगळ्यांच्या तोंडावर तोच तो बळीच्या बकऱ्याचा निरागसपणा! मीच थोडा एक्स्ट्रा निर्लज्ज आहे की काय असं उगाचच वाटलं. पाच मिनिटांनंतर तर असं वाटायला लागलं की प्रत्येकजण त्या अति-फॉर्मल वातावरणात अगदी तोंडाशी आलेले शब्दही अवघडलेपणाबरोबर गिळून टाकत होता.
काय म्हणताय राव, कुठलं डिपर्टमेंट?, मग मीच बोलता झालो. ’अकाउंट्स’, ’सेल्स’, दोघेजण एकदम वदते झाले. ’मी टेक्नॉलॉजीमध्ये’ मीसुद्धा माझं कुळ सांगून टाकलं! आणि तिसऱ्याचा चेहरा एकदम जपानमध्ये वर्षभर राहिलेल्या गुजराथ्याला मराठी बांधव भेटावा तसा खुलला. मग त्याने स्वत:ची पूर्वकहाणी सांगायला सुरुवात केली आणि तेवढ्यातच एच आर सुंदरी उगवली. आम्हाला पहिला दिवस म्हणून नऊ वाजता हजेरी आणि ही बया पावणेदहाला प्रकट होणार असं मनातल्या मनात म्हणत मी घड्याळ पाहिलं. ’सो सॉरी, मला थोडा उशीर झाला. आता मी तुम्हाला आपल्या कंपनीबद्दल थोडी माहिती सांगते.’ असं म्हणत तिनं पुढचा पाऊण तास आमचं ’आपली कंपनी’ या विषयावर बौद्धिक घेतलं. कंपनी नासडॅकवर लिस्ट झाली तेव्हा सीएनबीसीवर झालेली सीईओची मुलाखत पासून कॅंटीनमध्ये कोणत्या दिवशी काय मेन्यु असतो ते सगळं सांगून झालं.
मग तिनं चार वेगवेगळ्या आकारमानाचे गठ्ठे आम्हा चौघांपुढे टाकले आणि म्हणाली, भरा आता हे. सत्तावीस ठिकाणी पत्ता आणि बावन ठिकाणी सह्या करून झाल्यावर मी बोटं चोळत बसलो, बाकीचे तिघे काही अगम्य फॉर्मसचा अर्थ लावत बसले होते. सुंदरी परत आली आणि मी रिकामा बसलेलो पाहून म्हणाली, अरे वा, बरंच लवकर आटोपलं. निदान पहिल्या दिवशीतरी एच आर च्या शाबासकीसारखी दुर्मिळ गोष्ट मिळावी हे काही कमी नाही. (मी तर विचार करतोय की रिझ्युमीमध्ये ’एच आर’ची शाबासकी मिळाली होती असं लिहून टाकावं!)
त्यानंतर आमची वरात निघाली ते माझ्या डेस्कपर्यंत. किती दिवस इथं बूड टिकणार माझं इथे हा विचार मी ’आवडली का तुझी जागा?’ या प्रश्नाबरोबर झटकला. ठेवणीतलं हास्य झळकावत मी म्हणालो, ती पलिकडची केबिनही चालली असती. या उत्तरावर सुंदरीच्या तोंडावर ’घोरं पापम’ असे भाव आले. माझ्या मुखकमलावरील प्रश्नचिन्ह पाहून ती म्हणाली, ती सीईओची केबिन आहे. मी मनातल्या मनात अद्याप माझ्या स्पर्शाने पावनही न झालेल्या त्या डेस्कवर डोकं आपटलं. नसता चहाटळपणा कोणी सांगितला होता, असं मी माझं मलाच ओरडलोही. सुंदरी नुसतीच हसली. तिच्या हसण्याचा आवाज चोहोबाजूला घुमतोय असं वाटलं. सुंदरीच्या शुभ्र दंतपंक्तींमधील सुळे जरा जास्तच लांब आहेत असंही वाटलं.
मी निमूटपणे डेस्कवर बसलो. लॅपटॉपही आला होताच, मग इनबॉक्समध्ये डोकं खुपसलं.
ठीक आहे तर, तु कामाची सुरुवात कर. आपण पुन्हा भेटूच. काही लागलं तर माझी केबिन कुठे आहे ते तुला माहित ’आहेच.’ सुंदरी जाता जाता म्हणाली.
जाता जाता पुन्हा एकदा हसली.
तिचं हसणं सगळीकडे घुमतं कसं? शिवाय ते जरा जास्तच लांब असणारे तीक्ष्ण सुळे! रामाचं नाव घ्यावं का मुंडक्यांच्या माळा घालणाऱ्या कालीमातेचं?
नविन ठिकाणी प्रश्ण पडायला लागले की हमखास समजावं, गाडी मार्गाला लागली.
Sunday, November 25, 2007
माझा वाचक वर्ग!
हे म्हणजे सुक्याबरोबर ओलंही जळतं असा प्रकार झाला. एकाहून एक सरस लिहिणारी मंडळी आणि त्यांचे लिखाण बघूनच खरंतर माझ्या लिहिण्याचा उर्मीचा कडेलोट झाला होता. लता मंगेशकर गाते, तेव्हा गाण्याची ही एकच सोपी पद्धत आहे असा आपला समज होतो आणि तसं गाण्याचा प्रयत्न केला की आपलाच आवाज ऐकून तात्पुरतं बहिरेपण येतं. मराठीतून अत्यंत सुंदर ब्लॉग लिहिणारी मंडळी हा असलाच रोग पसरवतात. त्यांचे लिखाण वाचून लिहिणे म्हणजे सकाळी उठलो, दात घासले, आंघोळ केली, भांग पाडला, शर्ट घातला.... इतकी सोपी गोष्ट वाटते!
पण लिहायचा प्रयत्न तर करून पहा, बोटांचीपण दातखीळ बसते महाराजा.
नव्या नवलाईचे चार दिवस, कधीतरी सणासुदीला येणारा उत्साह किंवा ’केव्हातरी पहाटे’ खरंच काहीतरी लिहावसं वाटणं यापेक्षा चिरंतन आळस केव्हाही मोठा.
काही हुकुमी ब्लॉगर्सची नावं द्यावीत तर इतरांचा मुलाहिजा न ठेवल्यासारखं आणि सगळ्यांची नावं लिहायची म्हणजे आळसाशी प्रतारणा केल्यासारखं. पण सांगायचा मुद्दा असा की ही बडी मंडळी न सुचणाऱ्या विषयावरही इतकं सुंदर लिहितात की लिखाणाच्या नावाखाली पाट्या टाकणाऱ्या तमाम मंडळींनी आपले कीबोर्डस म्यान करावेत. मग आम्हीही म्हणतो, तानसेन नाही म्हणून आम्ही काय गाउच नये?
असल्या गाण्याने इतरांचे कान किटतील ही भीती नाही पण काही वेळा जरा जास्तच विचार केला जातो की लिहितोय यात निदान किमान क्वॉलिटी असावी. कोणी सांगितले आहेत हे उपद्व्याप असंही वाटतं. हे जेव्हा मी एका मैत्रिणीला सांगितलं तर ती म्हणाली की मी जर एव्हढा विचार केला तर लिहूच शकणार नाही. यावर सोपा उपाय म्हणजे जे वाटतंय ते लिहून मोकळं व्हायचं! हे बाकी उत्तम. एकदा खरडून झालं की आपली पोटदुखी बंद. मग इतरांचा विचार? असो, जर पुढेमागे अगदी घरावर मोर्चा वगैरे आला तर त्याचाही विचार करु.
तर माझा वाचक-वर्ग मी पुढची पाटी कधी टाकतो याची वाट बघतो म्हणे. काही मित्र-मैत्रिणींनी कमेंट्सच्या माध्यमातून ’समज’ही दिली! (असल्या कमेंट्स कधी पब्लिक करायच्या नसतात, नाहीतर तो एक जाहीर वस्त्रहरणाचा कार्यक्रम होईल!) शिवाय हा आता आंतरराष्ट्रीय मुद्दा होऊ पाहत आहे. (माझ्या अमेरिकेतल्या बहिणीने पुण्यातल्या भावाला मेल करून, मला वरचेवर लिहित जा, ही ’समज’ प्रत्यक्ष भेटून द्यायला सांगतली आणि त्यानी हा मेल नेमका सिंगापूरमधील दोन दिवसांच्या वास्तव्यात वाचला.)
असो. सध्या मी थोडा उत्साहात आहे. आजच गिटारवरची धूळ झटकली आहे. जिमला निदान पुढचा आठवडा तरी न चुकता जायचं ठरवलंय. थोडं लिहायचंही ठरवलंय. बघूया काय काय पार पडतंय!
Saturday, November 10, 2007
Tuesday, October 9, 2007
एक रम्य संध्याकाळ
ठिकाण: ते तितकेसे महत्त्वाचे नाही.
वेळ: दिवसभर काम करून वैतागल्यावर शेवटच्या मिटींगच्या आधीची वीस मिनिटे.
पात्रे: मी, ती (माझी मराठी सहकारी) आणि ते (माझे दोन डच सहकारी)
उपपात्रे: आणखी एक ती (ही तैवानची आणि असून नसून सारखीच, म्हणून उपपात्र!)
तर आता सुरुवात करु..
मी: ह्या फ़िरंगांच्या धाटणीचे इंग्रजी बोलून मला अगदी वैताग आला आहे.
ती: ठीक आहे, मग आता मिटींग सुरु व्हायच्या आधीची वीस मिनिटे आपण फक्त मराठीत बोलू.
मी: मजा येईल, शिवाय या तिघांना काहीही समजणार नाही.
ती: माझा मूळ उद्देश तोच आहे. इथे परदेशात बरेच दिवसात मला ’बिचिंग’ करायला मिळाले नाही.
पहिला तो (अर्थातच इंग्रजीतून): ’बिचिंग’? तुम्ही दोघे आमच्याबद्दल काय बोलत आहात याचा अंदाज आम्हाला आला आहे असे मी म्हणू का?
ती (इंग्रजीतून): तू फार संशयी आहेस. आम्ही तुमच्याबद्दलच बोलत आहोत असे तुला का वाटते?
दुसरा तो: .......
ती: तर आता आपण या दोन माकडांबद्दल हवे तसे बोलू शकतो.
मी: एकदम धमाल! माझ्यापेक्षा दोन इंच उंच आहे त्याला आपण मोठा माकड आणि एक इंच बुटका आहे त्याला छोटा माकड म्हणू, म्हणजे त्यांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणे सोपे जाईल!
ती: काल तू पाहिलेस का, मोठा माकड हिरव्या रंगाचे मोजे घालून आला होता, तेही घाणेरड्या राखाडी रंगाच्या सूटवर! माणसाची पोषाख करण्याची आवड किती वाईट असू शकते...
मी: आणि काल संध्याकाळी छोटा माकड काळ्या चौकडीचा पांढरा शर्ट आणि अर्धी चड्डी घालून आमच्याबरोबर फिरायला आला होता. जेलमधून पळालेला कैदी वाटत होता. लोक माझ्याकडेही बघायला लागले नंतर, जणू काही तुरुंग फोडून त्याला बाहेर काढण्यात माझाही हात होता.
मोठा माकड (इंग्रजीतून): हे असं नाही करायचं. आपण सगळे इंग्रजीतूनच का बोलू नये, सगळ्यांनाच गप्पा मारता येतील.
ती (इंग्रजीतून): तुम्ही डचमध्ये बोलायच्या आधी आमची परवानगी घेता का? आणि आम्ही कित्येक दिवसांनी आमच्या भाषेत बोलतोय, मला वाटतंय की आम्ही तुझ्याबद्दल बोलतोय हीच शंका तुला जास्त आहे!
दुसरी ती: (तैवानी चायनीजमधून) अय्याऽऽ (म्हणजे मला काही तैवानीज चायनीज समजतं अशातला भाग नाही पण ती जे काही चित्कारली ते मराठी अय्याच्याच जवळचं होतं!) (आणि मग इंग्रजीतून) तुम्ही बोलताय ते कित्ती छान वाटतं आहे. यांना बोलू दे रे त्यांच्या भाषेतून, ऐकायला किती गोड आहे!
मी: घ्या, म्हणजे आपण हीला नावं ठेवायची आणि ही त्याला गोड म्हणणार, ये कहाका इंसाफ है?
ती: अरे, एव्हढं मनावर घेऊ नकोस. तू तिला इंग्रजीतूनही शिव्या घातल्यास तरी तिला समजायला चार दिवस तरी जातील.
मी: खरंच! हीचं नाव खरंतर महामंदा असायला हवं. आतापण बघ, दात काढून हसते आहे. कधी अक्कल येणार काय ते त्या चायनीज भगवंतासच ठाउक.
ती: जाऊ दे रे, असतात अशी काही मंडळी. त्यांना समजून घ्या, त्यांना आपलं म्हणा.
मी: समजून काय घ्या कपाळ, साधं गणितही येत नाही. रेव्हेन्यू रिपोर्टिंग बनवायच्या मीटिंगमध्ये पाच अधिक अकरा करायला हिला कॅल्कुलेटर लागतो, कसले मार्केटिंग करणार आहे ही कोण जाणे. आणि हिला आपलं म्हणणारा आंधळा-बहिरा किंवा निदान समाजसेवक तरी हवा, रंजल्या-गांजलेल्यांना मदत करणारा.
ती: अरे, मलाही दाट संशय आहे, हिला दिवाळखोरीच्या मार्केटिंगसाठी आणले असावे. आधीच कंपनीकडे पैसा थोडा जास्त झालाय.
मी: मग गोरगरिबात वाटा म्हणावं थोडा. या दोन माकडांनाही द्या थोडा. निदान अंगभर कपडे घेण्यापुरते तरी. अर्ध्या चड्ड्या आणि बनियनवर आयुष्य काढतात बिचारे. आणि तेही खराब होऊन नविन घ्यावे लागू नयेत असा प्रयत्न असतो यांचा बहुतेक.
छोटा माकड: .........
ती: नाहितर काय, समुद्रावर गेलं तर की आधी कपडे काढायची घाई यांना, फक्त बायांनाच नाही तर बाप्यांनासुद्धा. समुद्र दिसला की कपडे काढा एव्हढंच माहित यांना.
मी: नाहितर काय. इथे परदेशात ठीक आहे पण उद्या दादर चौपाटीवर घेऊन गेलो तरी तेच करतील आणि मग सगळे संस्कृती रक्षक माझ्या घरी मोर्चा घेऊन येतील.
ती: जर कधी खरंच घेऊन गेलास यांना दादर चौपाटीवर तर आधी महिनाभर त्यांची मानसिक तयारी करुन घे, की समुद्र दिसला की कपडे काढायचेच असतात असे काही नाही.
मी: हम्म्म.. नाहीतर ’मुंबई बंद’चा मुहुर्तच धरला पाहिजे. तरी बरं, तुझ्या पुण्यात समुद्र नाही.
मोठा माकड (इंग्रजीतून): आता फार झालं. तुम्ही थोडं आम्हालाही समजेल असं बोलाल का?
मी: आता का कुठला न्याय? हे जेव्हा डच बोलतात तेव्हा आपण त्याचा अर्थ लावू शकतो हा काय आपला दोष आहे का?
ती: दुर्लक्ष कर. आणि पुण्यात समुद्र नसला तरी रिक्षा आहेत. ब्रॅंगेलिनाला रिक्षात फिरताना पाहिल्यापासून छोटा माकड माझ्या मागेच लागला आहे की मलापण रिक्षातून फिरव म्हणून. आता हे काय त्याचं वय आहे असले हटट करायचं?
मी: काही भरवसा नाही यांचा, कधीही वेडसर चाळे सुरु करतात. आता संध्याकाळी साडेसहा वाजता कोणता सूज्ञ माणूस काळ्या काचेचा चष्मा घालून खोलीच्या मधोमध सूट घातलेला असतानाही मांडी घालून बसेल? कठीण आहे या छोट्या माकडाचं!
दुसरी ती (इंग्रजीतून): (परत एकदा) अय्याऽऽ मला कित्ती मज्जा येत आहे. मलापण शिकवा ना तुमची भाषा. मग मीपण तुमच्याशी अशा छान गप्पा मारेन!
ती: हिच्याशी गप्पा मारायची वेळच येऊ नये म्हणून आपण मराठीत बोलतो आहोत हे या भवानीला कधी कळणार?
मोठा माकड (इंग्रजीतून): आता फार झालं..
ती (इंग्रजीतून): हे तू गेल्या वीस मिनिटात बावीस वेळा तरी म्हणाला असशील..
मोठा माकड (इंग्रजीतून): आणि तरीही तुला काही वाटत नाही? हे तर फारच झालं!
मी: आपण गेल्या पंधरा-वीस मिनिटात जेव्हढं हसलोय ते ऐकून आता हा मोठा माकड फक्त आजारी पडायचा शिल्लक आहे. (इंग्रजीतून) तेव्हा आता मीटिंगची वेळ झाली आहे म्हणून आपण आता सगळेजण निघू आणि काम लवकर संपेल अशी आशा करु.
छोटा माकड (इंग्रजीतून): मीटिंग कॅन्सल झाली, मला आत्ताच मेसेज आला!
ती: ह्या मुक्याला वाचा आली बघ.
मोठा माकड (इंग्रजीतून): आता फार फार म्हणजे फारच झालं, मी अजून सहन करु शकत नाही.
मी: शेवटी मराठ्यांच्याच गळ्यात विजयश्रीची माला पडली, फ़िरंगांचा पराभव झाला! शिवाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव!!
दुसरी ती (कोणती भाषा ते तिलाही माहित नसावं): *॓(%ऽऽऽऽऽऽऽ (आणि मग इंग्रजीतून) ठरलं तर मग, मीपण तुमची भाषा शिकणार आता!
हे वाक्य ऐकून मोठ्या माकडाच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो आणि तो धावतपळतच बाहेर पडतो.
दुसरी ती मराठी शिकायचा निश्चय करते, छोटा माकड नक्की कोणाची बाजू घ्यावी या गहन विचारात बुडतो आणि आम्ही दोघे अति हसून पोटात दुखत असताना कोणते औषध घ्यावे याचा विचार करु लागतो!
विशेष सूचना : वरील प्रसंग सत्यघटनेवर आधारीत असून त्यातील पात्रे या भूमीतलावर अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे त्यातील परदेशी पात्रे मराठी शिकत आहेत असे तुमच्या कानावर असल्यास अस्मादिकांना अवश्य कळवावे. तोपर्यंत निदान विमा तरी उतरवून ठेवावा म्हणतो.
Monday, September 24, 2007
चक दे इंडिया
टीम इंडियामध्ये सगळी विशी-पंचविशीची पोरं. झिपरा धोनी कर्णधार, कोच गायब. शिवाय ऑस्ट्रेलिया होतीच, म्हणजे खरं तर उपविजेताच निवडायचा होता. अशात ही टीम काय दिवे लावणार असं वाटत असतानाच ही मंडळी चक्क जिंकली फायनलमध्ये. क्या बात है!
ट्वेंटी-ट्वेंटी मध्ये जिंकले आता कसोटीत किती चांगले खेळणार असे प्रश्न कृपया कोणी विचारु नका. बेसबॉल आणि टेनिसची तुलना करतं का कोणी कधी? ट्वेंटी-ट्वेंटी आणि कसोटी, दोन्हीचा पिंड वेगळा. मानसिकता वेगळी. पाच दिवस आणि पाच तास यात जेव्हढा फरक तेव्हढाच यातही.
बाकी फायनल मोठी झकास झाली. जिंकणार की नाही याची गोपनीयता शेवटच्या बॉलपर्यंत राखणं फक्त टीम इंडियालाच जमू शकतं. धोनी, युवराज, पठाण, शर्मा, सिंग सगळेच चमकले.
आणि ट्वेंटी-ट्वेंटी च्या मॅचेस म्हणजे तद्दन फिल्मी प्रकार होता. कमी षटकांबरोबरच मैदानातच कडेला बसलेल्या टीम्स, रॅंडम मेसेजेस दाखविणारा स्कोअरबोर्ड, फटाके इतकं सगळं कमी होतं की काय म्हणून प्रत्येक फ़ोर, सिक्सला नाचायला नाच्ये पण आणलेले. पण मजा आली.
मुख्य म्हणजे आपण पाकिस्तानला हरवून जिंकलो!
गणपती चालले गावाला...
म्हणजे कधी पाच दिवस तर कधी सहा दिवस. मला आठवतं, एकदा गणपती सात दिवस होते. सातही दिवस मी हर्षवायू झाल्यासारखा करत होतो. आणि परत सातव्या दिवशी ’दिवस किती भरभर संपतात’ही कुरकूर!
आमच्याकडचा गणपती हा परंपरेने चालत आलेला. त्यामुळे केवळ हौसेच्या, उत्साहाच्या भरातही आजी, आई सोवळं, काही नियम पाळायला लावायच्या. सोवळ्यात नसताना गणपतीच्या जवळजवळ जायचं नाही, नैवेद्य दाखवायच्या आधी मोदकांवर डोळा ठेवायचा नाही वगैरे वगैरे. या गोष्टी साध्याच असतात पण त्याचं स्तोम न माजवता त्यामागची भावना लक्षात घेतली की उत्सवाचा आनंद वाढतोच.
गणपती बसविण्यापासून ते विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या हातावर दही घालेपर्यंत, सगळं काही साग्रसंगीत होतं. आणि हो, हव्या असणाऱ्या, नको असणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या यादीचं पठण बाप्पासमोर अथर्वशीर्षाच्या आवर्तनांपेक्षा जास्त वेळा झालेलं असतंच. आजकाल बहुतेक सर्वच सर्व गणपती नवसाला पावणारे असतात, पण ह्या घरच्या गणपतीने मात्र नवस न करताच खूप काही भरभरुन दिलं आहे आतापर्यंत!
आमच्याकडचं डेकोरेशनही अगदी ठरलेलं. तेच पडदे, त्याच समया आणि त्याच सुरयांतून लावलेली फुलं. बालसुलभ उत्साहाच्या भरात फार पूर्वी कधीतरी एकदा मखर करायचा ’प्रयत्न’ केला होता. पण शेवटी जे काही तयार झाले होते ते पाहून परत त्याच्या वाटेला काही गेलो नाही. शिवाय पुढं ’थर्मोकोल एको फ़्रेंड्ली नसतो’ अशी सबळ कारणं मदतीला धावून आलीच!
ही सजावट साधीच असली तरीही एकदा का बाप्पा विराजमान झाले की सगळं काही बदलून जातं. जादूची कांडी फिरावी तसं. समयांचा मंद प्रकाश, धूपाचा दरवळणारा गंध, सुबक फुलं आणि सगळी सजावट फिकी पडावी अशी ती गणेशाची प्रसन्न तेजस्वी मूर्ती! क्षणभराचे हे दर्शनही माझी बॅटरी पुढच्या संपूर्ण वर्षासाठी चार्ज करतं.
आठवतंय तेव्हापासून सगळ्या उत्सवात ’गणेशोत्सव’ अति प्रिय. आणि याचं नेमकं कारण शब्दांत मांडणंही कठीण. आस्तिक-नास्तिक वादाची ओळख होण्याआधीच (म्हणजे थोडक्यात पुरेशी व्यावहारिक अक्कल येण्याआधी!) हा बाप्पा जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता. बुद्धीदेवता, सर्व शास्त्रे-विद्या-कलांचा हा स्वामी. शक्तीबरोबरच युक्तीचाही डोस देणारा. माझा एक शंभर टक्के नास्तिक मित्र आहे. तो वर्षातून फक्त गणपतीचे दीड दिवस नास्तिक नसतो. नेमकं कारण त्यालाही सांगता येत नाही.
घरी राहायला आलेले आवडते पाहुणे जायला निघाले की लहान मुलं रडतात. मात्र गणपती निघाले की सगळ्यांच्याच पोटात कालवाकालव होते. त्यावर उपाय एकच, सगळ्यांच्या सुरात आपणही सूर मिसळायचा,
"गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!"
Tuesday, September 18, 2007
Tuesday, August 14, 2007
Monday, June 11, 2007
मुंबईचा पाऊस...
आजकाल रोज सकाळी मी न चुकता इंटरनेटवर मराठी "वर्तमानपत्र" वाचतो. पेपरला वर्तमानपत्र म्हणले की अगदी त्या छापील कागदाचा वास नाकात गेल्यासारखे वाटते. विशेषत: मे महिना संपत आला की एखादे दिवशी हा सकाळी येणारा पेपर किंचित भिजून येतो. कारण पाऊस सुरु झालेला असतो ना! चार दिवसांपूर्वी इंटरनेटवरील पेपरमध्ये "नभ मेघांनी आक्रमिलेल्या" मुंबापुरीचा फोटो पाहिला आणि क्षणभर थेट तोच ओला सुवास मजभवती दरवळला.
मे संपत आला की मुंबईकराचा चातक होतो. बेसुमार गरमी, दमट हवा आणि घामाच्या धारा! किती म्हणून सहन करायचे? मग तापमान किती वर चढले यापेक्षा ते खाली कधी जाईल याचे आडाखे इयत्ता दुसरीतले विद्वान ते प्रोफेशनल भविष्यकार कोणीही मांडू शकतात. जीवाची काहिली होणे याचा अनुभव शब्दश: येतो आणि अशातच एके दिवशी तो येतो. आगाऊ सूचना देणे त्याच्या शब्दकोषात नसावेच. पर्जन्यराजा ना तो! मग अवेळीच तो बरसतो. कोणाचीही फिकीर न बाळगता. सदैव कामाच्या धावपळीत असणारे चाकरमाने, संपत आलेल्या सुटीची मजा लुटणारी पोरेटोरे, न थकता धावणाऱ्या गाड्या-टॅक्सी-बस-ट्रेन्स सगळ्यांना दखल घ्यावीच लागते या पावसाची. न घेऊन जातील कुठे कारण सालाबादप्रमाणे गेल्या वर्षीही या सगळ्यांनी एकदातरी या पावसाचा दणका अनुभवलेला असतो.
मला अगदी स्पष्ट आठवते, आमच्या शाळेला इतर असंख्य सुट्यांमध्ये पावसाची सुटीदेखील मिळायची. आम्हाला शाळा अगदी घराजवळ. भिजत-भिजत शाळेपर्यंत पोहोचले की कळायचे की सुटी जाहीर झाली आहे. मग धम्माल! उरलेला दिवस पावसात उंडारणे हाच काय तो उद्योग. म्हणजे मुंबईभर पावसाने थैमान घातलेले, आम्हा ’निरागस’ बालकांच्या जीवाला अपाय होऊ नये म्हणून शाळेने सुटी दिलेली आणि आम्ही आपले तोंड वर करुन भिजत फिरतोय सगळीकडे! सगळाच आनंदीआनंद.
एरवीची काळवंडलेली मुंबई चार सरी पडून गेल्या की कशी लख्ख होते. प्रत्येक ओल्या श्वासात एक ताजेपणा येतो. शिवाय दरवर्षी एकदातरी पावसाने मुंबई बंद पडण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. तुफानी पाऊस सगळ्यांची दैना उडवत असला तरी मला तो आवडतो. गर्जून धुंवाधार बरसणारा पाऊस कुठेतरी माझ्या अंतर्यामी ओळखीची खूण पटवून देतो आणि जीव सुखावतो. निसर्गाच्या या विराट रूपाचे आणि माझे काही जवळचे नाते असावे. म्हैसूरच्या कृष्णराजसागराचा अथांग जलाशय सायंकालच्या संधिप्रकाशात पाहताना किंवा हरिहरेश्वरच्या प्रदक्षिणा मार्गावरील खवळलेला समुद्र पाहताना माझे अस्तित्त्व माझ्याही पलिकडे असल्याचे प्रकर्षाने जाणवले होते.
तर मुंबई आता पावसात ओलिचिंब होईल आणि मी या वाळवंटात तो पाऊस मनोमन झेलण्याचा प्रयत्न करेन. ’प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असे म्हणतात. इथल्या अरबांनी हा उपाय गेली शेकडो वर्षे प्रत्यक्ष वापरला असावा. तेल स्वस्त आणि पाणी महाग! मग निळ्याकाळ्या आकाशाकडे पाहता पाहता पाऊस पिणे, भिजल्या मातीचा गंध लुटणे, ओल्या हातांवर नवे तुषार झेलणे आणि गळणाऱ्या प्रत्येक जलबिंदूत सृष्टीची असंख्य प्रतिबिंबे पाहणे यंदातरी शक्य वाटत नाही.
ह्म्म्म!
रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मनभिगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
काही गाणी अगदी ’सिम्युलेशन टूल’ सारखी वापरता यावीत. पाऊस पडतोय, ते दोघे पूर्ण भिजले आहेत तरी हातात हात घालून भर रस्त्यात फिरत आहेत, सगळ्यांच्या मध्यात असूनही वेगळ्या विश्वात! बॉलीवूडची एक पावसाळी फॅंटसी. एकदा मलाही घ्यायचा आहे हा अनुभव. (म्हणजेच मी अजून ’एलिगिबल बॅचलर’ आहे हे सूज्ञास सांगणे न लगे!)
किंवा, लगी आज सावन की फिर वो झडी है, वही आग सीने में फिर जल पडी है...
किंवा, बरखा भेरी गयो सजनवा, जाने न दे मोहे..... ’किशोरी’स्वरातील ही मल्हारी-साद केवळ एकमेवाद्वितीय!
माझी खात्री आहे, ज्या दिवशी मला असे गाता येईल त्या दिवशी नक्की पाऊस पडेल.
मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी!
Saturday, June 2, 2007
बर्वे नावाचा पंजाबी!
दिवसभर मीटिंग्स् करून जीव शिणला होता. त्यात शेवटची मीटिंग अगदी वेळेत संपल्याने, मुंबईची फ़्लाईट पकडायला बराच वेळ होता. काळ कितीही पुढे गेला, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, भविष्यात अंतराळयानांचा प्रवासही ’पब्लिक’ झाला तरीही हाडाचा मुंबईकर ’अंतराळयान पकडले’ असेच म्हणणार. ट्रेन, बस, टॅक्सी, गाडी पकडली ही विशेष प्रक्रिया किती अर्थगर्भ आहे, ते मुंबईकरच जाणे.
असो. तर विमान सुटण्याआधी पुष्कळ वेळ असला तरी जाम कंटाळा आला होता म्हणून मित्राला म्हणले, मला विमानतळावरच सोड. आजकाल विमानतळांची कळा अगदी ’सार्वजनिक वाहतूकीचा थांबा’ अशीच झाली आहे. हीऽऽ गर्दी. सुदैवाने माझ्याकडे फ़ारसे सामान नव्हते. बरोबर एखादे पुस्तक असतेच म्हणून एखादा निवांत कोपरा शोधून, सॅंटियागो वारा बनू शकेल का ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावे असा विचार केला.
कोणतेही निर्बंध न जुमानता बागडणारी पोरं, ’आम्ही विमानातून फिरतो’ची इस्त्री तोंडावर फिरवलेले काही चेहरे, अमकीच्या लग्नात तमकीने घातलेले दागिने आणि कपडे यावरील चुरचुरीत पंजाबी महिला-संवाद आणि मोठया आवाजात बातम्या ओकणाऱ्या व्रूत्तवाहिन्या टाळून मी एक निवांत अडचणीचा कोपरा शोधला. सार्वजनिक ठिकाणी पुस्तक वाचायला अशी जागा परफ़ेक्ट असते. सुखेनैव टेकून एखादेच पान वाचले असेल आणि,
"इस इंडियन एयरलाईंस्वालों की ऐसी की तैसी! वक्त का कोई खयाल नही. जिस दिन की टीकट खरीदो, उसके दो दिन बाद ये लोग उडान भरेंगे।" असा प्रसन्न पंजाबी तारस्वर ऐकू आला. महाशय रागाने अगदी लालबुंद झाले होते. ऐनवेळी विमानाची वेळ बदलणाऱ्या इंडियन एयरलाइंसचा उद्धार चालूच होता. आवाज कमी झाला असे वाटतानाच महाशयांनी जवळजवळ माझ्यासमोरच आपली बॅग आणि माझ्या शेजारील खुर्चीवर आपले बूड टेकले. स्वारी चांगलीच घुश्शात होती. मग विमानकंपनीवरील रागाचा मुक्तसंवाद त्यांनी माझ्यादिशेने रोखला. त्यांची एकूण शरीरयष्टी पाहता तो संवाद दुर्लक्षित करणे मला परवडणारे नव्हते. माझ्या हातातल्या पुस्तकाप्रमाणेच मलाही भिरकावून देण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. मी पुस्तक मिटले.
ग्रूहस्थ चाळीशीचे तरी असावेत. लांबी, रुंदी दोन्ही भरपूर. तोंडावरील रागाची लाली जरा कमी झाली होती आणि हा गोरापान देखणा माणूस थोडा निवळू लागला. विमानकंपनीच्या निषेधातील माझी सहमती ऐकून साहेब जर खुलले आणि आमचा हिंग्लिश संवाद सुरु झाला. साहेब दिल्लीचेच होते आणि कामानिमित्त कलकत्त्याला निघाले होते. प्रतिथयश कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असल्याने पूर्वनियोजित मीटिंगसाठी वेळेवर कलकत्त्याला पोहोचणे हे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे होते याची मला कल्पना आली. मग इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. मी मूंबईचा आहे म्हणल्यावर तर त्यांना आनंद झाला. त्यांचे बरेच नातेवाईक मुंबई-पुणे भागात होते. शिवाय कामानिमित्तही मुंबईची वारी व्हायचीच. मी काय करतो, करीयरचे काय प्लान्स आहेत वगैरे प्रश्नांची फ़ैरीही झाली. पण मानले पाहिजे, साहेब अगदी हुशार होते.
’नेक्स्ट जनरेशन’शी संवाद साधण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती. राजकारण, अर्थकारण, लेखक, पुस्तके, गाणी, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शीला दीक्षित, कमल हसन, सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे अशा कैक विषयांवरील गप्पात तासभर कसा गेला कळलेच नाही. साहेबांकडे इंडियन एयरलाइंसच्या क्रूपेने वेळच वेळ होता पण माझ्या विमानाची वेळ झाली आणि मी निरोप घ्यायला सुरुवात केली. हिंग्लिशमधील सहजतेमुळे आमचा संवाद केवळ प्रथमनामांवरच चालला होता. एकमेकांच्या कंपनीची नावे जरी समजली होती तरी त्यांनी प्रोफेशनल सराइतपणे खिशातून स्वत:चे बिझनेस-कार्ड काढले. मग मीपण माझे कार्ड त्यांना देऊन, निघताना बोलताबोलता त्यांचे कार्ड वाचले. पहिल्या ओळीतले त्यांचे नाव वाचले.
"मोहित बर्वे"
मनात म्हणले, नक्की काहीतरी गडबड आहे. ह्या नखशिखांत पंजाबी ग्रूहस्थांनी नजरचुकीने दुसऱ्या कोणाचेतरी कार्ड मला दिले.
"जी, आपने मुझे गलतीसे किसी औरका कार्ड दे दिया शायद" माझ्या हिंदीतले मुंबईपण शक्य तितके गाळून मी त्यांना विचारले.
"नही तो. ये मेराही कार्ड है, क्या हुआ?"
"लेकीन आप तो पंजाबी है"
"बिल्कुल मै पंजाबी हूं", त्यांच्या चेहऱ्यावर आता मिष्किल हसू उमटले होते.
माझ्या वाढत्या गोंधळात भर पडत होती. "अगर आप पंजाबी है तो आपका नाम बर्वे कैसे हो सकता है?"
मग हा माणूस अस्सल पंजाब्याप्रमाणे मोठ्ठ्या आवाजात हसला. "तुमने स्कूल मे हिस्टरी पढी थी?"
आता "हिस्टरी" न पढता मी दहावी कसा होईन? दहावी न होता इंजिनियर कसा होईन? "जरूर पढी थी लेकीन आपका नाम तो उसमें नही पढा था" आता मी थोडा त्रासलो होतो.
हा परत एकदा मोठ्ठ्याने हसला, "मेरा नाम नही लेकीन मराठोंकी पानिपतकी लढाईके बारेमें जरूर पढा होगा"
आता हा कोणाचे पानिपत करण्याच्या प्रयत्नात आहे हे मला अजिबात समजत नव्हते. "लेकिन आप इतने बूढे तो नही लगते, वो लढाई तो कमसे कम तीनसौ साल पुरानी होगी" मी माझ्या प्रतिहल्ल्यात पुचाट विनोदाचा आधार घेतला.
आता ह्याच्या पुन्हापुन्हा हसण्याचा मला थोडा राग यायला लागला. "कुछ ऐसा समझो के हमारे हमारे परदादा के परदादा के परदादा पानिपत की लढाई के वक्त यहा आये थे। लढाई तो खत्म हो गयी लेकीन कुछ मराठे यही सेट्ल हो गये। अब तीनसौ साल दिल्लीमे रेहनेवाला एक बर्वे पंजाबीही केहलायेगा ना?"
पॉईंट होता. इथे एक महीना अमेरिकेला जाऊन आलेल्या मंडळींना मराठी words remember करायला difficult जाते, तिथे ह्या ग्रूहस्थाचे पूर्वज शेकडो वर्षापासून दिल्लीत स्थायिक झाले होते. तीनशे वर्षे म्हणजे शेकडो वर्षेच म्हणली पाहिजेत. भलताच विनोदी प्रकार वाटला तरी मी बर्वे नावाच्या एका पंजाब्याला भेटलो होतो!
हा प्रसंग जसाच्या तसा आठवायचे कारण म्हणजे मी गेल्याच आठवड्यात दुबईत एका "चिराग पटेल" नावाच्या सदग्रूहस्थांना भेटलो. साहेब नावाप्रमाणेच रंगरूपानेही अस्सल गुजराती होते. पण संवाद मात्र फ़िरंगी वळणाच्या इंग्रजीत. शेवटी मी गुजरातीवर अत्याचार करत म्हणालो, "केम चिरागभाई, गुजराती नथी आव्यो?"
त्यावर हा म्हणाला, "No man, been born and brought up here, been to India hardly anytime. no Gujarati please."
हा एक नविन काळातला नविन धडा. नाव बर्वे असले म्हणून काय किंवा ललाटरेषा "हा गुजराती आहे" असे ओरडून सांगत असली तरी काय, मुद्दल अस्सल असेल याची खात्री नाही.
आणि हो, शांघायमध्ये फक्त चायनीज मंडळी राहतात असा माझा समजच नव्हे तर खात्री होती. माझ्या तिथल्या वास्तव्यात केवळ चायनीजमध्येच बोलणाऱ्या मंडळीमध्ये (यातल्या काहींना इंग्रजी चांगले येत होते अशी मला दाट शंका होती) राहून माझे डोळे बारीक, नाक चपटे होत आहे असे मला वाटू लागले होते. शिवाय अजून काही दिवस इथे राहिलो तर माझ्या मुखकमलातूनही चायनीज स्वरधारा बरसू लागतील इतके चायनीज ऐकून झाले होते. तरी बरं, माझ्याबरोबर चार भारतीय सहकारी होते. चायनीज पामरांनी खचाखच भरलेल्या मेट्रोमधून प्रवास करताना "विशेष" संवाद साधताना राष्ट्रभाषा आमची परवलीची संकेतप्रणाली होती.
एके दिवशी आम्ही चौघे मेट्रोमधून जात असताना शांघायमध्ये नविन हिंदी सिनेमा पहायला मिळू नये ह्या अन्यायाविरुद्ध चायनीज सरकारने कोणते ठोस धोरण अवलंबले पाहिजे या महत्त्वाच्या विषयावर आमची मौलिक चर्चा चालू होती.
"उसमें क्या है, शांगयांग मार्केट जाओ तो हर कोई हिंदी सिनेमा की डीव्हीडी मिलेगी" हा डायलॉग ऐकून आमच्या पोटात खड्डा पडला कारण तो आवाज आमच्या चौघांपैकी कोणाचाही नव्हता! शेजारीच उभ्या असणाऱ्या एका चायनीज पोरग्याने (चायनीज माणूस वयाने कितीही वाढला तरी पोरगेलासाच दिसतो) हा सल्ला भोचकपणे दिला होता. हा प्राणी मुंबईत जन्मला, वाढला होता आणि आता कामानिमित्त पुन्हा मायदेशी आला होता. मग त्यापुढे आमची हिंदी सिनेमा पहायची सोय झाली आणि अस्सल मुंबईचे हिंदी बोलणारा अस्सल चायनीज मित्रही मिळाला.
पण आमच्या राष्ट्रभाषेतील मुक्त संवादावर बंधने आली हे सांगणे न लगे!
वारा निर्गंध असला तरी तो ज्या दिशेने येतो त्या दिशेचे संस्कार त्याच्यावर व्हायचेच.
पिवळाधमक असला तरी प्रत्येक आंबा हापूस नसतो आणि रंग निराळा असला तो मधुर नसेल असेही काही नाही हेच खरे!
Friday, April 20, 2007
एक डाव नवा..
मी निमूटपणे गाडीतून उतरून ट्रॉली आणायला पळतो. बोजड बॅग त्यावर ठेवेपर्यंत ट्रॅफ़िकवाल्या मामांची ’गाडी इथे लावू नका’ अशी हाकाटी सुरुपण होते. घर ते एअरपोर्ट हा अर्धा-पाऊण तासाचा वेळ कितीही हसत-खेळत गेलेला असला तरी टर्मिनलमध्ये आत शिरण्याची दोन मिनिटे सर्वात कठीण असतात!
मग सगळ्यांना टाटा करायचा. आई, भाऊ, वहिनी, मावशी, बहिणाबाई आणि अदी - माझा पुतण्या, जेमतेम दोन वर्षांचे हे प्रकरण दूर गेल्यावर मला बरेच जड जाणार आहे असे एकदमच आणि उगाचच वाटते. शेवटच्या क्षणापर्यंत कामात बुडवून घेणं म्हणजे संभाव्य होमसिकनेसचा विचार टाळण्याचा हमखास उपाय आहे हे आता मे अनुभवाने शिकलो आहे. सर्वांच्याच नजरा माझ्यावर खिळलेल्या असतात. बाहेरच्या जगात आपली किंमत शून्य असली तरीही जिवलगांसाठी मात्र आपण सुपरस्टार असतो याचा हा पुन:प्रत्यय. अदीची मस्ती चालुच राहते. कोणी गावाला चाललय हे फ़ारसे कळत नाही तेच बरे आहे त्यामुळे तो ’एअरपोर्ट हे खास त्याच्यासाठी एक नविन बालोद्यान आहे’च्या चालीवर इकडे-तिकडे बघत असतो.
सर्वात शेवटी आई पुन्हा एकदा भेटते. ओलसर होणारे तिचे सुंदर डोळे पाहून क्षणभर काहीच सुचत नाही. मग उगाच परत घड्याळ बघायचे. लवकर पळायला हवे म्हणत अलगद तिच्यापासून दूर व्हायचे. ही चार वाक्ये अनुभवणे किती कठीण असते ते अनुभवल्याशिवाय नाही समजायचे. पुढे होऊन गर्दीत मिसळल्यावरही मला शोधणरी तिची नजर माझ्या पाठीवरून फ़िरणाऱ्या तिच्या हातासारखी मला जाणवते.
मग गेल्या काही दिवसात झालेल्या प्रश्नोत्तरांची माझ्या मनात पुन्हा एकदा उजळणी होते. ’चांगला जॉब सुरळीत चाललेला असताना तुला काहीतरी दुसरे सुचतेच कसे?’ असे प्रश्न माझ्या स्थैर्यवादी बाबांना सहज पडतात. आणि त्यावर मी दिलेली उत्तरे त्यांच्या आकलनापलिकडची असतात. किंवा ते तसे निदान भासवतात तरी. कंपनी चांगली आहे, काम चांगले आहे, भरभर मिळालेल्या वाढीव जवाबदाऱ्या केलेल्या कामाची पावती देत आहेत, पगार बरा आहे (हा कितीही असला तरी चांगला नसतो!) मग आता तुझे हे काय नविन?
परंतु, आपण तेचतेच, पुन्हापुन्हा करतो आहे, चाकोरीबद्ध जीवन यांत्रिकपणे जगतो आहे ही जाणिव मला आतून अस्वस्थ करत असते. मी केवळ निमित्तमात्र आहे, आधीच लिहिलेल्या, ज्याला विधीलिखितही म्हणतात अशा नाटकतील केवळ एक मोहरा आहे हे खरे असले तरीही प्रत्येक क्षण जगण्याची, स्वत:लाच चॅलेंज करण्याची आणि दिवसाढवळ्या दिसणाऱ्या स्वप्नांमागेही जिवापाड धावण्याची माझी हौस काही कमी होत नाही. ठेच लागून पडण्याची भिती गाठीशी अनुभव असतानाही नव्या उमेदीच्या जोषात आणखी एक चॅलेंज देते. मग त्या भरात काही निर्णय घेतले जातात जे बाबांना क्रांतिकारक वगैरे वाटतात.
आयुष्य म्हणजे एक वर्तुळ आहे. पण त्याची त्रिज्या म्हणजे आपली कुवत असली तरी ती किती वापरायची हे आपल्या हातात आहे. मला मनापासून एखादी गोष्ट करायची आहे. ती करताना नेहमीप्रमाणे सर्वस्वीपणे करणे आणि तेव्हाचा प्रत्येक क्षण जगणे ही नशा कोणत्याही मदीरापानाने मिळणाऱ्या नशेपेक्षा जास्त आहे. स्वत:ची चौकट स्वत:च मोडून पुन्हा नविन सुरुवात करायची आणि आणखी उंच भराऱ्या घ्यायच्या यात मला ’मौज वाटे भारी’ असले माझे फंडे फ़क्त आईला समजतात. शब्दात मांडून सांगितले नाहीत तरीसुद्धा.
मग आपसुकच एक बळ येतं. आपल्याच कल्पना, विचार यावरचा विश्वास द्रुढ होतो. आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. मग कधी गाव नवा तर कधी देश. ’हाऊ मच लॅंड डज अ मॅन नीड?’ असे टॉलस्टॉय लिहून गेला खरा पण जगण्यावरील श्रद्धेपेक्षा ऐहिक आसक्तीच त्यातून अधोरेखित होते. मला आत्ता धावायचे आहे. किती जमीन पादाक्रांत होईल यापेक्षा धावताना अनुभवता येणाऱ्या ऊर्जेचा अनुभव अधिक महत्त्वाचा आहे.
आज या दूरदेशच्या सागरजलात उभे राहताना मला मायदेशचा समुद्र आठवतो आहे. ’सागरा प्राण तळमळला’ यात काहीतरी तथ्य आहे हे किंचितसे जाणवते आहे. पण तेव्हढ्यात येथल्या पाण्याचा वेगळा रंग लक्ष वेधून घेतो. वाळूच काय, शंखशिंपलेही वेगळे दिसत आहेत. आता बरेच काही पाहता येईल, बरेच काही शिकता येईल. माझ्या पांचट जोकवर टाळी देईल असा मित्रही आहे बरोबर. माझी भाषा कळायला वेळ लागतोय त्याला, पण शिकेल हळूहळू.
नामवंत गवये स्वत:साठी म्हणजेच दुनियेचा विसर पाडून गातात म्हणे. मलाही आज खुल्या दिलाने गावंसं वाटतंय,
"तेजोनिधी लोहगोल..
भास्कर हे गगनराज....."
Sunday, April 8, 2007
एक होता राजा
जवळपास सहा फ़ूट उंच, गोरेपान, भारदस्त शरीरयष्टी, बघणाऱ्यावर दरारायुक्त छाप पाडणारे. राजबिंडे या शब्दाला साजेशी सारी लक्षणे ठळकपणे आणि सहजपणे मिरविणारे. पन्नासच्या दशकात ते काश्मिर फ़िरायला गेले होते तेव्हा कोणी गेस्ट हाऊसवाले त्यांना गव्हर्नर समजले होते म्हणे. अर्थात आजोबांच्या सज्जनपणामुळे एकूण प्रसंग फ़ारसा नाट्यमय झाला नाही आणि गेस्ट हाऊसवाल्यांवर दोनातला खरा गव्हर्नर ओळखण्याची अनावस्था आली नाही. पण पु.लं.च्या अंमलदारसारखा हा खरा प्रसंग आईने मला सांगितला होता.
माझी आई तिच्या सर्व भावंडांपेक्षा बरीच मोठी. त्यामुळे माझा मोठा भाऊ आणि मी, आजोळी जायचे कोणतेही निमित्त म्हणजे पर्वणीकाळ, सगळे शुभयोग एकदम आल्यासारखे वाटत. मग आजोबांच्या देखरेखीनुसार आमची बडदास्त ठेवली जायची. त्यांची लाड करायची पद्धतच इतकी राजेशाही की मागायच्या आधीच सगळ्या गोष्टी आमच्यासमोर हजर.
आईसक्रिम खाणे हा अर्थातच एक सोहळा असायचा.
त्यांनी आम्हाला घेतलेले कपडे नेहमीच ’रिच टेस्ट’ चे असायचे.
आजीने घरीच केलेला सुग्रास स्वयंपाक ते आम्हाला गाडीत घालून महाबळेश्वरला नेऊन खाऊ घालायचे. ’तासभरपण लागत नाही तिथे पोहोचायला’ हे वर स्पष्टीकरण.
सगळा कुटुंब-कबिला रेल्वेच्या फ़र्स्ट-क्लासमधून प्रवासाला नेण्यासाठी केवळ पैशाची श्रीमंती लागत नाही हे स्वत:च्या कॄतीतून दाखवून देणार.
पौष्टिक आहार खाल्लाच पाहिजे म्हणून ते आम्हाला समोर बसवून फ़ळं, सुकामेवा, मिठाया आणि इतर असंख्य पदार्थ खाऊ घालणार. मग एखादा पदार्थ आमच्या बाळचवीला मानवणारा नसला तरीही त्यापासून सुटका नाही. ’खाल्लाच पाहिजे!’ आणि त्यांचे असे हे हुकुमत गाजवणे आम्ही सर्वांनीच मान्य केलेले.
मी शाळेत असेपर्यंत मग दरवर्षी सुट्टी सुरु होण्याच्या सुमारास त्यांचे नेटक्या अक्षरातील पत्र येणार. मी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे आणि सुरुवात या सुट्टीपासूनच करावी हा मुद्दा हमखास त्या पत्रात असणार. शिवाय काय काय वाचणार, काय काय खेळणार याची विचारणा, कोणते उपक्रम करावेत याच्या सूचना. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजोळी कधी येणार हा त्या पत्राचा हायलाइट!
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या माणसाने आयुष्यात अनेक टोकाचे प्रसंग पाहिले. सगळे बस्तान बसलेले असताना वेगवेगळ्या कारणांमुळे ’पुनश्च हरिओम’ म्हणून पुन्हा डाव मांडला. पुन्हा शून्यातून सुरुवात केली. पुन्हा सगळं उभं केलं. पहिल्यापेक्षा जास्त चांगलं. फ़िनिक्स केवळ गोष्टीतच नसतात हे मी त्यांना पाहून शिकलो.
आजोबांना सगळ्या चांगल्या गोष्टींचं व्यसन. त्यांचा पेहराव नेहमीच छाप पाडणारा. झब्बा-लेंगा, धोतर किंवा शर्ट-पॅंट-सूट असो, स्वत: कुठून-कुठून आणणार. साधा मलमलचा कुडता आणि लेंगा घातलेला असला तरिही समोरचा माणूस त्यांच्याशी अदबीनेच वागणार. पण त्यांची खरेदी ही नेहमीच ’बल्क’ मधे असायची. स्वत:ला एखादी गोष्ट घेताना ह्याला हे घे, त्याला ते घे असं सारखं चालूच. मग आमची चंगळ. त्यांची ’टेस्ट’ही अशी होती की एरवी खरेदी प्रक्रिया जटील करणाऱ्या बायका त्यांनी आणलेल्या साड्यांवर बेहद खुष असत.
मित्रपरिवार आधिच मोठा. त्यातही सगळ्या वयोगटातील माणसे त्यांच्याभोवती जमणार. व्यवसाय, व्यापारातील अनुभव, व्यासंग याच्या आधारे प्रत्येकाच्या गरजेनुसार मदत करायची. घरी आलेल्या कोणालाही विन्मुख पाठवायचे नाही, जबरदस्तीने का होईना पण खाऊ-पिऊ घालायचे, खुष करायचे व्यसनच त्यांना.
डिगिटल-विश्वात वावरणारा मी. एकदा त्यांनी काढलेले फ़ोटो पाहिले होते. ते ज्या कॅमेऱ्याने काढले होते तो आधी पाहिला होता आणि त्याची भरपूर चेष्टाही करुन झाली होती. फ़ोटो साधेच, कॄष्ण-धवल, घरातच काढलेले. आजी घरातल्या अवतारात काहीतरी काम करताना आजोबांनी ते फ़ोटो काढले होते. आजी सुंदर, देखणी, फ़ोटोजेनिक वगैरे असली तरी त्या डब्बा कॅमेऱ्यातून नॅचरल प्रकाश-सावलीचा मेळ साधत आजोबांनी कसले अफ़लातून रिझल्ट्स मिळवले होते!
साध्या-साध्या गोष्टीही दिलखुलासपणे अनुभवणं ही त्यांची खासियत. मग निव्वळ त्यांच्या अस्तित्त्वाने सगळं वातावरण बदलून जाणार. आयुष्यभर व्यवसाय केला तोही असा की इतरांना वाटावे की ’अरे, ही इतकी सोपी गोष्ट आहे तर!’. पण आजोबांना जवळून पाहिलेली मंडळी ’हे येरागबाळ्याचे काम नोहे राजा!’ या चालीवर त्यांच्या बुद्धिमत्ता, कौशल्य, ’रिस्क’ घेण्याची हिंमत आणि काळापुढे विचार करण्याची क्षमता याच्या चित्तरकथा सांगणार.
सगळं एकदम आठवणंही कठीण असतं आणि सगळ्या आठवणी एकदम हल्ला करून येणंही..
आजोबा आता कोणते ’सरप्राइज’ देणार याची आतुरतेने वाट पाहणारा मी. पण या एक एप्रिलला त्यांनीअ सगळ्यांनाच पूर्णपणे ’फ़ूल’ केले...
सगळेजण त्यांच्याभोवती जमले होते पण एरवी सगळ्या गोंधळात उठून दिसणारा त्यांचा आवाज ऐकूच येत नव्हता. त्यांची स्तब्धता चटका लावून गेली. मैफ़लीचा बादशाह सगळ्यांना चकवा देऊन निघून गेला होता.
आपल्या मनाला कधी काय आठवेल याचा नेम नाही. जुन्या गाण्यांच्या बाबतीत तर असं हमखास होतं..
इक था गाव जहॉंका, इक ऐसा था राजा
सबके दिलों में, वो रेहता था.. उसके जैसा कोई नही था...
Sunday, March 4, 2007
होळी आहे...
पण आपणा भारतीयांना घरची मुर्गी नेहमीच दाल बराबर. ढाक्याची मलमल रोमन सम्राट वापरायचे असे समजले की आम्ही खादी ग्रामोद्योगमध्ये चक्कर मारणार. इंग्लंडच्या राणीसाहेब हिवाळ्यात भारतीय सौंदर्यप्रसाधने वापरतात अशी कुणकुण लागली की इथे हर्बल प्रोडक्ट्सचा खप वाढणार. असो. तर आज होळी आहे. आपले पूर्वज म्हणे होळी पेटवताना असणाऱ्या वातावरणाचे, वाऱ्याच्या गती आणि दिशेचे अनुमान घेउन त्या वर्षाच्या हवामानाचे, पीकपाण्याचे अंदाज बांधत. हीच पद्धत जर अशीच विकसित केली असती तर मला वाटते की आपण या वर्षी कोणत्या दिशेने परकीय चलनाची आयात जास्त होईल, कोणत्या दिशेने भारतीयांची निर्यात सर्वात जास्त होईल असे आडाखे होळीच्या दिवशीच बांधू शकलो असतो! या शक्यतेची साधी आवई जरी उठली तरी अर्धे गर्भश्रीमंत-अमेरिकन-गुंतवणूकदार युरोपियन रिसर्च कंपन्यांमध्ये पैसे लावतील, "प्रोजेक्ट होळी" यशस्वी करण्यासाठी! आणि तेही प्रोजेक्टवर भारतीय मंडळी रिक्रुट करून!!
आठवणीत रमणारी जुनी मंडळी त्यांच्या सोशल लाइफ़चा भाग असणाऱ्या या उत्सवाच्या गोष्टी ’होळीच्या कथा रम्या’ च्या तालीवर सांगतात. सण साजरा करण्यामागे उदात्त भावना असली तरी तो साजरा करण्यासाठी ’****च्या बैलाचा ढोल’ च्या चालीवर पंचक्रोशीतील ’प्रसिद्ध’ व्यक्तिंचा उद्धार करण्यामागची भावना आजच्या हायटेक पिढीला समजणे कठीण आहे. शिवाय ढोल हा बैलाचा वाजविल्यामुळे ऍनिमल राइट्सवाले तुमची मानगूट धरायला येतील ते वेगळेच! त्याकाळी आजच्यासारखे ब्लॉग नसल्यामुळे भावनांना मुक्त वाट करून देण्यासाठी होळीचा सण ही एक सुवर्णसंधी असावी. आणि आम्हा आजकालच्या मंडळींनाही होळीच्या नव्हे तर ऑफ़िसमध्ये नानाविध प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने रोजच याच्या-त्याच्या नावाने बोंबाबोंब करायची सवय असतेच. काळ बदलतो पण काही गोष्टी बदलत्या स्वरुपातही कायमच राहतात. पूर्वी केवळ दिवाळीत तयार होणारे फ़राळ आजकाल वर्षभर मुबलक उपलब्ध असतात, हासुद्धा त्यातलाच एक प्रकार. तेव्हा आता ’होळी आणि आधुनिक तंत्रज्ञानतील मानसिकता’ किंवा ’होळीची प्रक्रिया आणि परकीय चलन व बुद्धिनिष्ठ मानवनिर्यात यांच्यातील परस्परसंबंध’ असे विषय पीएचडीसाठी निवडता येण्यास काही हरकत नसावी.
शिवाय होळीनंतर येते ती रंगपंचमी! घाई ही मुंबईकरांच्या मागे सदाचीच लागलेली, त्यामुळे असेल किंवा उत्तर भारतीयांच्या अखंड भरतीमुळे झालेल्या प्रभावामुळे असेल, आम्ही धुळवडीच्या दिवशीच रंगात चिंब होऊन मोकळे. मुंबईतल्या बॉलीवूडची होळी हा एक सगळ्यांच्याच आवडीचा विषय. त्यामुळे अधिकाधिक फ़िल्मी पद्धतीने होळी खेळणे आजकाल अपरिहार्य होत चालले आहे. त्यामुळे मग आता ’होली आयी रे कन्हाई’ किंवा ’आया होली का त्यौहार...., तू है नार नखरेदार मतवाली रे’ कोणाला आठवणार? तेव्हा आम्ही आपले ’रंग बरसे, भीगे चुनरवाली’ म्हणून रंग उडवणार. इंजिनीअरिंगला असताना अशाच एका होळीला चुकून खाल्लेल्या भांगेपायी झालेली एका मित्राची ’अवस्था’ आठवली की हसताना आजही पोटात कळ येते. भांग ही एक जादुई चीज आहे आणि भल्याभल्या सत्पुरुषांचे ती क्षणार्धात माकड करून टाकते या गोष्टीवर तेव्हा जो विश्वास बसला तो आजतागायत.
आजवर बऱ्याच होळ्या खेळून झाल्या. पण आयुष्यात एकदा वृंदावनात जाऊन होळी अनुभवण्याची आस आहे. तिथे म्हणे कुठल्याशा फ़ुलापासून तयार केलेल्या रंगाने होळी खेळतात. सावळ्या मुरारीच्या रंगात भिजलेल्या त्या फ़ुलांपासून भागवती भगवा रंग निघाला नसता तरच नवल. आयुष्यात प्रत्येकाला अशा रंगात भिजण्याची संधी मिळते आणि मग आजवर कधी न देखिलेले रंग खुणावू लागतात, कधी न ऎकिलेल्या अनवट सुरवटी साद घालतात आणि आपला पुनर्जन्म झाला आहे असे वाटू लागते. अगदी स्वत:च्याच राखेतून उठणाऱ्या फ़िनिक्ससारखे. एकाच या जन्मी जणू फ़िरूनी नवे जन्मण्याचे हे काय गौडबंगाल असावे बरे?
Friday, February 23, 2007
नादब्रह्म
लहानपणापासून आपण नादाचा अनुभव घेतो. काही ताल पटकन मनाचा ठाव घेतात तर काही सूर बऱ्याचदा ’फ़िरुनी एकवार’ भेटल्यावर मनात घर करुन राह्तात. ’इथे इथे बस रे मोरा’ किंवा ’चांदोमामा चांदोमामा भागलास का’ न ऎकता मोठी झालेली मुले कदाचित टारझनसारखी जंगलात वाढली असावीत असा माझा अंदाज आहे. इथे त्या त्या भाषेतील बडबडगीते असा अर्थ अपेक्षित आहे, नाहीतर टारझनचा जन्म मराठी घराण्यात झाला असावा या नवीन प्रवादाचा जन्म व्हायचा. शिवाय बडबडगीते ही घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्यापुढे म्हणून दाखवण्यासाठीच आपल्या मुलाला शिकवायची असतात असा बहुतांश आयांचा (गैर)समज असतो त्यामुळे निदान वय वर्षे तीन पूर्ण होइपर्यंत प्रत्येक बाळ ’शहाण्या बाळासारखे’ सर्वांना बोबडीगीते ऐकवून आपले कवतिक करवून घेतो. मग पुढे जेव्हा बंडखोरी, हट्टीपणा, ’मी नाही जा’ या अस्त्रांचा शोध लागतो, तेव्हा कुठे त्या गुणदर्शनाच्या जाचातून सुटका होते.
तर सांगायचा मुद्दा असा की, जी गोष्ट कोणी लादल्याशिवाय सहज घडते ती मनाला अधिक भावते. किती एक मराठी, हिंदी गाणी अशीच मला त्यांच्या प्रेमात पाडून गेली. लता मंगेशकर नावाच्या बाईची गाणी गेली अनेक दशके अख्ख्या जगाला आवडतात यापेक्षा तिच्या आवाजाचा अनुभव अंतर्यामी जे तरंग उमटवतो ते मला जास्त महत्त्वाचे वाटते. या अशा अनुभवाची तुलना दुसऱ्याशी न करणे म्हणजेच एका नविन आनंदाला न मुकणे हे मी अनुभवांती शिकलो आहे. नाहीतर आतापर्यंत सापडलेल्या संगीतविश्वातील सौंदर्यस्थळांपैकी कितीतरी पाहायची राहूनच गेली असती. आपण इंग्लिश बोललो तर जगबुडी येईल अशी ठाम समजूत असणाऱ्या चायनीज कलिगने ऐकवलेली अगम्य पण सुरेल प्रेमगीते, एका हंगेरियन मित्राने ऐकवलेली त्याच्या मातृभाषेतील बालगीते आणि भीमसेन जोशींच्या एका भक्ताने ऐकवलेला त्यांचा शुद्धकल्याण हे अनुभव आजही आठवतात तेव्हा ’क्या बात है’ अशी दाद घेउन जातात.
शिवाय नादयात्री असणे हे, मला कोणता गायक किंवा गायिका आवडते यावर तर बिलकूल अवलंबून नसते. ती गोष्ट इतकी महत्त्वाची असती तर एका सावळ्या गवळ्याने वाजवलेला पावा झाडून सर्वांच्या ह्रुदयाचा ठाव घेऊ शकला असता? बरं ही झाली जुनी कहाणी. आजच्या घडीलाही, विलायत खानांची सतार, हरिप्रसाद चौरसियांची बासरी, झाकीर हुसेनचा तबला, यान्नीचा पियानो आणि यो-यो-माचा चेल्लो आपल्यावर शुद्ध सुरांची अखंड बरसात करत असतात. केवळ दिग्गजच नाहीत पण असे असंख्य कलाकार आपल्याला जेव्हा नादब्रह्माचा साक्षात्कार घडवतात तेव्हा याचसाठी केला होता हा अट्टाहास असे वाटल्याशिवाय राहत नाही. भाषा, शब्द कशाचेच बंधन नसणारी ही वैश्विक भावना कोणाही दोन सजीवांमध्ये संवाद घडवून आणू शकते खास!
आणि नाद, सूर हे आवाज किंवा वाद्यांच्या पलीकडेही अस्तित्त्वात असतात याचा अलिकडेच मी नव्याने अनुभव घेतला. गेल्या महिन्यातील दांडेलीच्या जंगलातील सहल अनेक कारणांसाठी अविस्मरणीय ठरली. ट्री-हाउसमध्ये राहणे (एकदम टारझन-ईष्टायल) हा जर एक अनुभव होता तर तेथे अखंड तीन दिवस ऐकलेली मैफ़ल ही स्वर्गीय सुरांची परिसीमा होती. नानाविध पक्ष्यांची किलबिल, जंगलाची गंभीर आलापी आणि जोडीला दुथडी भरून वाहणाऱ्या काली नदीचे सुरेल पार्श्वसंगीत! त्या मैफ़लीची आठवण आजही दाद न घेईल तरच नवल.
Sunday, February 18, 2007
नमस्कार मंडळी!
थोडक्यात काय की भर दिवसा डोळ्यांसमोर तारे चमकले की अजूनही मला आईच आठवते. माझ्या व्यक्तिमत्त्वातील मायमराठीच्या अस्तित्त्वाचा याहून अधिक पुरावा कोणता असणार? आणि मला सांगा, "सायंकाळी गोधन गोठयात परतले", "पुरणपोळीवर तुपाची धार सोडली", "त्या कालचा पोर असलेल्या मावळ्याने विजयश्री खेचून आणली", "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी" व "गणपती बाप्पा मोरया" या भावना मराठीखेरीज कोणत्या भाषेतून मांडता येतील? अगदी आपली संतमंडळीही म्हणून गेली, "संस्कृत जर देवे केली, मग प्राकृत काय चोरे केली?" आपली कुवत भले तेवढी नसली, तरी निदान स्वत:च्या भावना मायबोलीतून व्यक्त करताना परभाषेच्या कुबड्यांचा आधार न लागणे हे ही नसे थोडके!
शुद्ध मराठीतून बोलता येणे ही "घटना" आजच्या युगात नैसर्गिक असण्यापेक्षा आश्चर्यजनक, खेदमिश्रित, "कोठून आली ही ब्याद?" अशा विविध नजरेतून पाहिली जाते. माझा एक आत्येभाऊ किती वाजले हे मराठीतून उत्तरतानाच गडबडतो मग ’सव्वा-अकरा रुपयांची दक्षिणा’, ’बारा गावचे पाणी प्यायलेला बहाद्दर’ अशा संकल्पना साहजिकच त्याच्या आकलनापलिकडे असतात. एव्ह्ढेच कशाला जेमतेम दोन आठवड्यांसाठी परदेशी (आता श्रीलंका म्हणजेसुद्धा परदेशच बरं का!) जाऊन आलेली मंडळीसुद्धा ’आजकाल मराठी शब्द आठवणे जिकिरीचे झाले आहे’ याची कारणमीमांसा पुरवतात, तेव्हा मात्र तेव्हढेच थोडे हसून घ्यावे अशी अवस्था होते. आणि याच्या अगदी उलट अनुभव आला एका मित्राच्या काकूला भेटताना. तिचे अस्खलित मराठी ऎकल्यावर, ही बाई गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ अमेरिकेत वास्तव्य करुन आहे यावर विश्वास बसणे कठीण होते.
शेवटी सगळे आपल्याच मनाचे खेळ असतात. आपण एखादी गोष्ट किती स्वीकारतो ही त्यातली खरी गोम असते. या सायबरविश्वातील मराठी भाषिकांची मुसाफ़िरी दिलासा देणारी नव्हे तर आल्हददायक वाटते. सवयीचे घर धुंडाळताना अचानक जुन्या आठवणी हाती लागाव्यात तसेच काहीसे माझे हे मराठी ब्लॉग झाले. काही मंडळींचे ब्लॉग तर ’अरे हा किती दिवसांनी भेटला, ही इतके दिवस होती कुठे?’ असा अनुभव देऊन गेले. यथावकाश सर्वांबरोबर ऒळखी होतीलच पण त्यात केवळ औपचारिकता राहू नये आणि स्नेह वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा.
तेव्हा मंडळी, इतुके दिवस आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतात, तो ब्लॉग आता साक्षात अवतरला आहे. (उन्मळून हसणे, या भावनेचा साक्षात्कार अशाच समयी होत असतो!) आपली भेट होतच राहील. पण त्यातून मराठीची शुद्धता तपासण्यऎवजी (भगवंता, मला निदान चार ओळी न चुकता खरडण्याचे बळ दे!) संवाद साधण्याची इच्छा पूर्ण होवो.
आणि सरतेशेवटी, कॅलिफ़ोर्नियाच्या गव्हर्नरसाहेबांना स्मरून म्हणतो, I will be back!!